धाकलीतल्या बचतगटांनी सावरल्या शाळा
अकोला जिल्हा. बार्शी टाकळीतील धाकली इथली जिल्हा परिषद शाळा. कोविड लॉकडाऊमुळे इथंही शाळा सुरू झाली ऑनलाईन. पण धाकली जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 70 मुलांपैकी केवळ 17 जणांकडे मोबाईल होता. अर्थातच बाकी विद्यार्थी शाळेपासून, अभ्यासापासून वंचित राहणार होते. गावचे सरपंच महेंद्र गाढवे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना फुलारी यांच्या हे लक्षात आलं. त्यांनी ठरवलं की शाळाच मुलांच्या घरी न्यायची. या निर्णयाला साथ दिली ती गावातल्या बचतगटांनी. काय केलं असेल या बचतगटांनी?
गावातल्या बचतगटांच्या सुशिक्षित महिलांना यात निवडलं गेलं. त्यातून शिक्षणसारथी उपक्रम सुरू केला. मुख्य म्हणजे कुठल्याही वेतनाशिवाय स्वयंस्फूर्तीने या महिलांनी ज्ञानदानाच्या कार्यात सहभाग घेतला. गावात कोरोना रुग्ण नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुलांच्या घराजवळ गटशाळा सुरू झाल्या. स्वतःचं काम ओटोपून दोन ते तीन तास या महिला विद्यार्थ्यांचे वर्ग घेतात. यासाठी ७० मुलांचे १४ गट करण्यात आले. यासाठी १४ प्रशिक्षित स्वंयसेविकांची निवड करण्यात आली. एका वर्गात पाच ते सहा विद्यार्थाचा समावेश करण्यात आला.
तेव्हापासूनच शाळेचं मार्गदर्शन आणि बचत गटाच्या महिला यांच्यात नियमित संवाद होत असतो. मागील दीड वर्षांपासून हे वर्ग सुरू आहेत. या संदर्भात सरपंच महेंद्र गाढवे म्हणतात, “गावात नेटवर्कची समस्या कायम असते, त्यातही अनेकांना मोबाईल परवडत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा उपक्रम हाती घेतला. स्वंयसेविका व विद्यार्थ्यांचे यासाठी उत्तम सहकार्य मिळत असल्याने हा प्रयोग यशस्वी झाला.”
– दिनेश मुडे, अकोला

Leave a Reply