दूधरामची दुर्दम्य उमेद

अशी झाली बागकामाची सुरुवात

दूधराम पाल. गाव वाकडी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. पंधरा वर्षांपूर्वी; नाही, त्याच्या अगोदर म्हणजे २००५ साली मुंबईला आला. केवळ स्वत:च्या कष्ट करण्याच्या, शिकत रहाण्याच्या आणि जिद्दीच्या बळावर काहीतरी मिळवण्याच्या आकांक्षेने. त्याची ही गोष्ट. खरीच सगळी.

सर्वात अगोदर त्याच्या मूळ पत्त्यामधल्या ‘गडचिरोली’ या नावाबद्दल. हा जिल्हा आपणा सर्वांना माहीत आहे तो नक्षलवादी जिल्हा म्हणून. लोक असंही समजतात की तिथे जंगल आहे, त्या जंगलात नक्षलवादी लपलेले असतात आणि त्यांच्या दहशतीमुळे तिथे मोकळेपणाने हिंडता फिरता येत नाही. गडचिरोली जिल्हा ग्रामीण आहे, तिथे जंगल आहे, तिथल्या बहुसंख्य लोकांच्या उदरनिर्वाहाचा आधार शेती, हाच आहे; हे सगळं खरं आहे. पण तिथे गावातल्या प्रत्येक नाक्यावर आणि गावाबाहेर प्रत्येक वळणावर नक्षलवादी दबा धरून बसलेले नसतात. तसं म्हटलं तर मुंबईबाहेरच्या अनेकांना वाटतं, मुंबईत फिरताना इथे शहारुख खान, तिथे अमिताभ बच्चन दिसत असणार. पण मुंबईकरांना माहीत आहे की नाही दिसत. त्यांच्या बंगल्यांच्या भोवती घुटमळत राहिलं तरी नाही दिसत. तरी हे फिल्म स्टार. त्यांना बघायला लोक आसुसलेले. याउलट नक्षलवादी जंगलात दडणारे. ओळख लपवणारे. ते अजिबातच नाही दिसत.

तरीही गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातला सर्वात पूर्वेकडचा जिल्हा, हे तर खरंच. मुंबई ही राज्याची राजधानी पश्चिम किनाऱ्यावर. गडचिरोली आणि मुंबई यांच्यात जसं भौगोलिक अंतर मोठं, तसंच सांस्कृतिक अंतरसुद्धा मोठं. ते भलंमोठं अंतर पार करून दूधराम पाल नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला.

पण तो काही अगदीच भविष्य नशिबाच्या खुंटीवर टांगून नक्कीच आला नाही! तो कसा आला, येण्यापूर्वी कसा होता, आल्यावर कसा झाला याची ही कहाणी.

दूधरामचा जन्म वाकडी गावात झाला. जन्मतारीख २५ जुलै १९७८. वाकडी गावातली शाळा पाचवीपर्यंत. पाचवी झाल्यावर तो गडचिरोलीच्या शाळेत दाखल झाला. गडचिरोली वाकडीपासून ५ किलोमीटर अंतरावर. पण ते पाच किलोमीटर ओलांडण्यासाठी त्याला चालणं भाग होतं. अगदी दहावी होईपर्यंत दूधरामकडे सायकल नव्हती. गावातल्या बहुतेक मुलांकडे नव्हती. रोज पाच दुणे दहा किलोमीटर चालून शाळा शिकणे त्याला भाग होतं. त्यालाच नाही, त्याच्या गावातल्या सगळ्या मुलांना. तो आणि त्याचे सवंगडी सकाळी सहा वाजता घराबाहेर पडायचे आणि सात वाजता शाळेत पोहोचायचे. क्वचित जाताना एखादी गाडी, जीप, ट्रक असं काही भेटलं की त्याला हात करायचा आणि तो मेहेरबान झाला, तर गडचिरोलीपर्यंत आराम! पण हे क्वचित. एरवी कुणाच्या तरी सायकलवर आपापली दप्तरं टाकून मुलं पाठीवरचं वजन हलकं करून चालत असत.

पण त्या वयात आपण शिक्षणासाठी फार मोठे कष्ट घेत आहोत, असं कोणालाच वाटत नसे!  त्या वयात नाही वाटत. महाराष्ट्रात अशी कितीतरी गावं असतील, जिथली मुलं रोज अशी पायपीट सहज करत असतील. मुंबईतसुद्धा असतील. शाळकरी वयात अशा चालण्याचा काही त्रास होत नाही आणि शाळेत जाण्याला पर्याय आहे, असंही मनात येत नाही.

दूधरामने असं दहावीपर्यंत केलं. तेव्हा दहावीत पुष्कळ मुलं नापास होत. दूधराम नापास होऊ नये म्हणून घरच्यांनी त्याला थोडं दूर असलेल्या चामोर्शी या गावातल्या मावशीकडे रहायला पाठवलं. तिथे नीट अभ्यास करून तो दहावी झाला आणि घरी परत आला.

दहावीनंतर अकरावीला काही महत्त्वच नाही. अकरावी इतकी कमी महत्त्वाची होती की मुलं शाळेतच जात नसत. दूधरामही गेला नाही. पण शाळेत न जाता काय करायचं, याचं उत्तर त्याने इतरांपेक्षा वेगळं शोधलं. वाकडी गावाजवळ एक सरकारी फलोद्यान होतं. तिथे जाण्याचं त्याने ठरवलं. वय होतं सोळा. नोकरीचं वय नव्हतं. पण रिकामं बसण्यापेक्षा चौदा रुपये रोजावर तो त्या शासकीय फलोद्यानात जाऊ लागला. एवढ्या लहान मुलाला तिथला साहेब कौशल्याची, गुंतागुंतीची कामं सांगणार नव्हताच. कलम बांधण्यासाठी आंब्याच्या काड्या काढून देणे, हे काम तो करू लागला. पण तो मन लावून काम करतो आहे, हे पाहून त्याची रोजंदारी चालू राहिली.

मग बारावी आली. दूधराम पुन्हा चामोर्शीला मावशीकडे गेला आणि बारावी झाला. बारावीनंतर पुढे काय, असा प्रश्न आला. इतर सर्वांप्रमाणे कॉलेजात जाऊन बीए होणे, ही वहिवाट होती. पण इथेच त्याच्या आयुष्याला निर्णायक वळण लागलं. शासकीय फलोद्यानातल्या साहेबाने दूधरामला सल्ला दिला की तू कॉलेजात जाऊ नकोस. तू बीए करू नकोस. तुला बागकामात गती आहे. नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्याच अंतर्गत गडचिरोलीला यशवंतराव चव्हाण कृषी विद्यापीठ आहे; तिथे प्रवेश घे आणि दोन वर्षांचा डिप्लोमा कर! हा डिप्लोमा करून गावागावात ग्रामसेवक म्हणून नोकरी मिळणे सुलभ होत असे. त्यामुळे तिथे मुलांची बऱ्यापैकी गर्दी असे. दूधरामच्या वर्गात चाळीसेक मुलं होती. या कोर्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे रोज जावं लागत नसे. आठवड्यातून तीन दिवस जावं लागायचं. मग दूधरामने आठवड्यातल्या बाकी दिवशी फलोद्यानात जाणं चालू ठेवलं. शिक्षणाबरोबर कमाईसुद्धा होत राहिली!

असा घडला दूधराम

वरवर पाहता वाटतं, की फलोद्यानातल्या साहेबाने दूधरामला घडवलं, त्याच्या भविष्याला आकार दिला. पण हे लक्षात घ्यायला हवं की दूधरामने काम चोख केलं म्हणून साहेबाने त्याच्या करियरमध्ये लक्ष घातलं. दूधरामने कृषीशिक्षणात डिप्लोमा केला हा संयोग नव्हे!

दूधरामने स्वत:चं भविष्य स्वत: घडवलं, याच्या खुणा त्याच्या पुढच्या प्रवासात वारंवार दिसून येतात. उदाहरणार्थ, तो पेपर वाचत असे, पेपरात कुठे काय संधी दिसते, यावर लक्ष ठेवत असे. जाहिराती वाचत असे. एकदा त्याला गोंदिया जिल्ह्यातल्या एका गावच्या फार्महाऊसवर मॅनेजर हवा असल्याची जाहिरात दिसली. तो थेट तिथे गेला. त्याचं काम बघून ती नोकरी त्याला मिळाली. तिथे वर्षभरात त्याने मालकाला चांगली फळबाग तयार करून दिली. मालक अर्थातच खूष झाला.

पण नोकरी म्हणजे इतकंच नव्हतं! चांगली वीस एकराची ती जागा गावाबाहेर पाच किलोमीटर अंतरावर नदीकिनारी होती. आसपास अजिबात वस्ती नव्हती. नोकरी चालू असताना एकदा त्याचा भाऊ येऊन गेला. त्याने पाहिलं की हा वर माडीवर झोपतो तेव्हा खाली साप फिरतात. पावसात घरात पाणी शिरतं. काही झालं तर हाक मारून कोणी येण्यासारखं नाही. त्याने परतून घरी सांगितलं की हा रहातो ती जागा भयंकर आहे, कोणी याला मारून नदीत फेकला तर कोणाला कळणारसुद्धा नाही! घरच्यांनी भावाला ताबडतोब उलट पिटाळलं आणि दूधरामला जबरदस्ती उचलून घरी आणलं. त्या फार्महाऊसच्या नोकरीत त्याला महिना २००० रुपये मिळत असत; पण त्यापेक्षा गावाजवळच्या फलोद्यानात तोवर रोजी ३० रुपये झाली होती आणि ते पैसे कमी असले तरी जिवाला धोका नाही, मुलगा डोळ्यांसमोर राहतो, हे त्यांना जास्त सुखाचं वाटलं.

पुन्हा एक ‘संयोग’! डॉ. अभय व राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेच्या वाकडीतल्या कार्यकर्त्याला कामानिमित्त भेटायला सर्चची एक टीम समोर आली. कार्यकर्त्याने दूधरामला थांबवून ओळख करून दिली. त्या वेळी सर्चच्या ‘शोधग्राम’ या वसाहतीत झाडं लावण्याचं काम नुकतंच सुरू झालं होतं. सर्चच्या पाटील सरांनी दूधरामला शोधग्रामला येऊन झाडं लावण्याच्या कामावर सुपरवायजर म्हणून काम करण्याची ऑफर दिली. अर्थात सर्चमध्ये कोणालाही इतक्या सहजी शिरता येत नाही. अभयभाऊंनी दूधरामशी बोलून त्याच्या ज्ञानाविषयी खात्री करून घेतली आणि मग दूधराम सर्चमध्ये आला! तोपर्यंत त्याची फलोद्यानातली रोजी पन्नास रुपयांवर गेली होती, सर्चमध्ये त्याला महिन्याला २५०० मिळू लागले.

एक गंमत झाली. वयाच्या सोळा-सतरा वर्षांपासून तो जिथे काम करत होता ते फलोद्यानसुद्धा गावात नव्हतं, दूर जंगलात होतं. हा पठ्ठ्या तिथे रात्रीच्या वेळी चौकीदार म्हणूनही काम करायला तयार! ही त्याची कीर्ती अभयभाऊंच्या कानावर गेली म्हणून की काय, सर्चमध्येदेखील त्याला बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या घरांपासून दूर, झाडं होती तिथेच घर बांधून देण्यात आलं आणि तो तिथे एकटा राहू लागला.

तेव्हा शोधग्राममध्ये मेसच्या पुढे नुसती मोकळी जमीन होती. त्याने तिथे आंब्याच्या विविध जाती, चिकू, हळद अशी लागवड केली. सगळं अभयभाऊंना विचारून. रोपं अर्थातच फलोद्यानातून आणली. सरकारी योजनेत तेव्हा हेक्टरी १०० झाडांची रोपं शेतकऱ्यांना मिळत. ती जगवण्यासाठी वर २५००० रुपये मिळत. पण लोकांना या योजनेची नीट माहिती नव्हती. अगदी बिगरआदिवासी गावांनासुद्धा काही माहीत नव्हतं. लोकांना वाटे, २५००० रुपये घेतले आणि झाडं जगली नाहीत तर? ते पैसे परत द्यावे लागतील! दूधरामने ही स्थिती अभयभाऊंच्या कानावर घातली. त्यातून त्याचं काम वाढलं. शोधग्राममध्ये झाडांची देखभाल करण्याबरोबर अभयभाऊंच्या सांगण्यावरून गावागावात जाऊन शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती देण्याचं काम तो करू लागला. ‘पैसे परत द्यावे लागत नाहीत, झाडं तीन वर्षं जगवलीत की तुमचीच होऊन जाणार. त्यांची फळं तुम्हालाच मिळणार,’ हे त्यांना पटवून देऊ लागला. गडचिरोलीत शेती धानाची, म्हणजे भाताची. ही झाडं त्यामुळे शेतातल्या बांधांवर लावायची. कुठलीही झाडं. आंब्याची, चिकूची, जी हवी ती.

पण दूधरामचा आवडता विषय कलमं बांधणे हा होता. मग सर्चमध्ये आदिवासी मुलामुलींना कलमं बांधायला शिकवण्याचं प्रशिक्षण सुरू झालं. अभयभाऊंना मुळातच नुसती झाडं लावून जगवण्यात रस नव्हता. त्यांनी हे प्रशिक्षणाचं काम सुरू केलं आणि दूधराम ते आनंदाने करू लागला. त्याबरोबर गांडूळखत, कंपोस्ट खत बनवणे हेसुद्धा तो शिकवू लागला. तीन महिन्यांचा तो ‘कोर्स’ करून गावी परतल्यावर त्या आदिवासी तरुण-तरुणी शिकवलेल्याचा उपयोग करतात की नाही, याची पहाणी होऊ लागली. सर्चच्या परिसरातल्या, सर्चशी संबंध येणाऱ्या आदिवासी गावांमध्ये हळूहळू बदल होऊ लागला. गांडूळखत तर गावागावात तयार होऊ लागलं आणि त्याची विक्रीसुद्धा होऊ लागली.

संधी सोडायची नाही

दूधराम पहिल्यापासून ‘वाचन करणारा’ होताच. सर्चमध्येदेखील त्याने शेतीविषयक नियतकालिकं वाचणं चालू ठेवलं. अभयभाऊसुद्धा त्यांच्या बाकीच्या कामातून वेळ काढून कुठे काय नवीन होतं आहे, यावर लक्ष ठेवून असायचे. तिथे ते दूधरामला पाठवायचे. हिंगणघाट, सातारा, नागपूर, पुणे अशा ठिकाणी जाऊन नवीन प्रयोगांची माहिती दूधरामला मिळत राहिली. त्यातून दूधरामचं चांगलं प्रशिक्षण झालं. साताऱ्याला श्रीपाद दाभोळकरांकडून, वर्ध्याला अशोक बंग यांच्याकडून तो शिकला. हिंगणघाटला टिशू कल्चरपासून रोपं बनवण्याचं शिक्षण मिळालं. हे त्याला घरी बसून किंवा एका ठिकाणी काम करत राहून शिकता आलं नसतं. प्रत्यक्ष काम करून शिकणं जास्त खरं असतं, जास्त कळतं. तेव्हा शिकलेलं दूधरामकहे अजूनही आहे!

आणखी एक. सर्चमध्ये अशी पद्धत आहे की कोणीही कुठल्या निमित्ताने कुठे जाऊन आलं की तिथले अनुभव संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर सगळ्यांना सांगायचे. तसं करताना आपोआपच स्वत:ला स्पष्टता येत जाते. तशी दूधरामलासुद्धा येत गेली. मग तो कुठून कुठून जे शिकून आला, ते त्याच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आदिवासी तरुणतरुणींना शिकवू लागला. हे सगळं करताना त्याचं कधीतरी नाव पेपरात छापूनही आलं. ते गडचिरोलीच्या आयटीआयवाल्यांच्या नजरेस पडलं. त्यांनी सर्चला पत्र पाठवून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना गांडूळ खत, वगैरेची माहिती देण्यासाठी दूधरामने यावं, असं सुचवलं. तो गेला आणि तीन दिवसांच्या अभ्यासक्रमात त्याने त्याचा विषय आयटीआयच्या ८० ते ९० विद्यार्थ्यांना शिकवला! नुसतं काम करण्याच्या पलीकडचा तो अनुभव त्याने जपून ठेवला आहे. कोणाला तरी आपण काहीतरी शिकवलं आणि ते कुठे कुठे जाऊन त्यांच्या आयुष्यात त्या शिक्षणाचा उपयोग करून काहीतरी करणार, ही भावना त्याला अजूनही रोमांचकारी वाटते.

कारण दूधराम अंतर्यामी स्वत:शी प्रामाणिक असलेला आणि कामाशी इमान बाळगणारा मनुष्य आहे. तो एक जबाबदार मनुष्य आहे!

एकदा ऑर्किड हॉटेलचे विठ्ठल कामत सर्चमध्ये आले. शोधग्राममधली बाग त्यांच्या डोळ्यात भरली. जाताना ते दूधरामला म्हणाले, असलं काम करायला मला माणूस हवा आहे. तुला जर इच्छा झाली तर जरूर ये!

दूधरामच्या आयुष्याला नवं वळण मिळण्याचा हा क्षण होता. लगेच नाही; पण पुष्कळ विचार करून त्याने कामतांना प्रतिसाद द्यायचं ठरवलं. हा मोठा निर्णय होता. आयुष्य गडचिरोली आणि आसपास घालवलेलं असताना ते सोडून; घरापासून, सर्व परिचितांपासून दूर, खूप दूर जायचं! संधी समोर होती. ती पकडायची का?

दूधरामने निर्णय घेतला, संधी सोडायची नाही!

पण ते सोपं नव्हतं. विठ्ठल कामत सर्चला भेट देऊन गेल्याला पुष्कळ काळ उलटला होता. ते किती गंभीरपणे म्हणाले होते? अजूनही त्यांना तसंच वाटत होतं का? दूधरामने त्यांना पत्र लिहून आठवण दिली. त्यांचं उत्तर आलं, ये!

दूधराम निघाला. तारीख होती २७ जुलै २००५. ही वेळ मुंबईकरांना विसरता येणार नाही. २५ जुलैला मुंबईत ढगफुटी झाली आणि प्रचंड पाऊस पडून अतोनात हानी झाली. सगळ्या मुंबईचे व्यवहार ठप्प झाले. दूधरामला ट्रेनने नागपूरहून मुंबईला येणं शक्य नव्हतं. जलप्रवाहाच्या जबर वेगामुळे रूळच वाकडे झाले होते. तो बस पकडून पुण्याला गेला. तिथून दुसऱ्या बसने नवी मुंबईपर्यंत पोचला. पुढचा रस्ता बंद होता. बस, ट्रेन काहीही खाडी ओलांडून मुंबईला जात नव्हतं. ज्या परिचिताबरोबर तो आला होता, त्याच्याकडे मुक्काम टाकणं त्याला भाग पडलं. कामतांशी संपर्क होईना. मुंबईला जाणारा रस्ता कधी खुला होईल, हे समजेना. दूधराम निराश झाला. परत जातो, म्हणू लागला. असे पाच दिवस गेले. पाच दिवसांनी शेवटचा प्रयत्न म्हणून कामतांना फोन लावला आणि तो लागला! कामत म्हणाले, लगेच ये!

दूधरामच्या हिंमतीचं नीट मूल्यमापन करण्यासाठी त्याचाच पुढच्या काळातला अनुभव विचारात घ्यायला हवा. त्याचा मुंबईत जम बसल्यावर जेव्हा त्याला माणसांची, मजुरांची गरज वाटू लागली, तेव्हा त्याने गडचिरोली जिल्ह्यातून थोडेथोडे करून जवळ जवळ शंभर मुलग्यांना मुंबईला नेलं आणि काम दिलं. गडचिरोलीपेक्षा कितीतरी जास्त कमाई. काम मिळत रहाण्याची हमी. पण त्यातला एकही जण मुंबईत टिकला नाही! घरून फोन, निरोप आला आणि गावात लग्न आहे, असं त्यांना कळलं की ते लगेच रजा घेऊन निघून जात. आणि मग क्वचितच परत येत! दूधरामवरसुद्धा लग्नासाठी गावी जाण्याची वेळ येत असे. पण मुक्काम वाढवण्याचा मोह टाळून तो दोन दिवसांनी कामावर परत येत असे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही आठवड्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिलात, तर तुमच्या नोकरीची शाश्वती उरत नाही. तुमची जागा दुसरा कोणीतरी घेतो. शंभरापैकी शंभर तरुण कमी जास्त काळाने सोडून परत गेले!

यातलं काय बरोबर हा वेगळा विषय आहे. पण तुम्हाला दोन्ही बाजूंनी फायद्याची मागणी करता येत नाही. गावात राहून, निसर्गाच्या निकट राहून जर तुम्हाला आनंद मिळत असेल, तर पैशामधून लाभणाऱ्या भौतिक सुखांवर पाणी सोडणं भाग आहे. हे हवं आणि तेसुद्धा हवं, असं करता येत नाही. इतर तरुणांनी एक निर्णय घेतला, दूधरामने दुसरा.

ऑर्किडमधले दिवस

तरी दूधरामसमोरची आव्हानं संपायला तयार नव्हती. ‘कामत सरां’चा लोणावळ्याजवळच्या कामशेत इथे बंगला होता.  तिथे त्यांना फार्महाऊस करायचं होतं. पण तिथे कोणी टिकत नव्हता. दूधरामच्या अगोदर दहा बारा लोक तिथे पाठवण्यात आले होते. पण सगळे काम सोडून गेले. कारण बंगल्याच्या परिसरात दोन बहिणींनी आत्महत्या केली होती आणि त्या म्हणे तिथे कोणालाही राहू देत नव्हत्या! बंगला गावापासून दूर होता. गावची लोकं तिथे रहायला, कामाला जाणाऱ्यांना घाबरवायची. मेलेल्या बहिणी तिथे रात्रीच्या ओरडतात, फिरतात, असं सांगायची. कामत सरांना वाटलं, हा गडचिरोलीहून आलेला, याला जंगल माहीत असणार. हा डरणार नाही. ते स्वत: त्याला तिथे घेऊन गेले. बंगला दाखवला. आणि म्हणाले, तीन महिन्यांत इथे सुंदर बाग, फार्म हाऊस तयार करणं हे तुझं काम. ते केलंस तर तुला मुंबईमधल्या गार्डनची कामं देईन.

दूधरामने काम स्वीकारलं. मजुरांची जुळवाजुळव सुरू केली. पाच सहा लोकांना मुंबईवरून नेलं. वाटेत गावकऱ्यांनी अडवलं. तुम्ही तिथे राहूच शकणार नाही, आजवर कोणीच टिकू शकलेला नाही, अशी भीती दाखवल्यावर नेलेले सगळे खरंच घाबरले. परत जायला निघाले. बंगला इंद्रायणी नदीच्या काठी. त्यात तिथे वीजच नव्हती. घाबरणाऱ्यांना दूधरामने दुप्पट पगाराची लालूच दाखवली. ‘एक रात्र तर काढू, मीसुद्धा आहेच सोबतीला,’ असा धीर दिला. आणि रात्र काढली. काळोखात; रानातल्या काटक्या, डहाळ्या पेटवून त्या शेकोटीच्या उजेडात.

लोक थांबले! चार पाच दिवसांत पैसे भरून बंद पडलेलं मीटर दूधरामने चालू करून घेतलं आणि विजेची व्यवस्था झाली. रात्री उजेड राहू लागला. बोअरवेलमधून पाणी मिळू लागलं. तरी नंतरसुद्धा स्थानिक लोक येऊन परत जाण्याचे सल्ले देत राहिले. ‘इथे गर्दुल्ले येतात, त्यांना तुम्ही रहाता हे आवडणार नाही, ते त्रास देणारच,’ असं सांगत राहिले. पण एव्हाना दूधरामचा धीर चेपला होता. त्याने कामाचा अंदाज घेतला आणि आसपासच्या भागातूनच आणखी मजुरांना गोळा करायला सुरुवात केली. गावात बिगारी लोक सकाळी ठरलेल्या जागी काम मिळवण्यासाठी जमतात, तिथे जाऊन दहावीस रुपये जास्त रोजी कबूल करून सगळे बिगारी घेऊन येऊ लागला. कामत सर त्याच्या पाठीशी भक्कम उभे होते. दूधराम पळून जात नाही, काम चालू ठेवतो आहे, हे पाहून तो मागेल तितके पैसे पाठवू लागले. हळूहळू बंगल्याभोवतीची जागा साफ होऊ लागली. बंगल्याचं रिनोव्हेशन होऊ लागलं. बाग आकार घेऊ लागली. आणि तीन महिन्यांच्या आत बंगल्याला एका सुंदर सुबक फार्म हाऊसचं रूप प्राप्त झालं!

कामत सर खूष झाले. त्यांची इच्छा होती, बंगला आणि फार्महाऊस यांची भेट बायकोला तिच्या वाढदिवशी द्यावी, ती पूर्ण झाली. ते इतके खूष झाले की त्यांनी दूधरामला दीड तोळ्याची सोन्याची चेन बक्षीस दिली. आणि मुंबईला अंधेरीला रहायला जागासुद्धा दिली! त्या काळात फोर्ट भागातल्या जवळपास प्रत्येक ट्रॅफिक आयलंडवर असलेल्या बागेची देखभाल ऑर्किड हॉटेल करत असे आणि बदल्यात हॉटेलच्या नावाचा बोर्ड तिथे दिसत असे. कामत सरांना एकूणच निसर्गसंवर्धनात रस होता. त्यांनी त्या सगळ्या बागांचं काम दूधरामवर सोपवलं. ही कामं करायला काँट्रॅक्टर होतेच; दूधराम त्यांच्यावर सुपरविजन करू लागला. त्याला मिळालेलं नवीन काम होतं माहीम वांद्र्याच्या मध्ये कामत सरांच्या आईचा पुतळा आहे, त्याच्या भोवतीच्या बागेचं. त्यानंतर एअरपोर्टच्या बागेचं. दूधरामचं काम चोख होतं, त्यामुळे त्याला महापालिकेकडून, पर्यावरण खात्याकडून बक्षिसं मिळू लागली. कामत सर आणखी खूष झाले!

अशी काही वर्षं गेली.

कामत सरांकडला दूधरामचा काळ अत्यंत सुखात गेला. दर वर्षी पगारवाढ होत होती. सरच त्याच्यावर खूष असल्याने ऑफिसात मान मिळत होता. पगार वाढत २८००० पर्यंत पोचला होता. दर वर्षी ऑर्किडच्या ॲन्युअल डेला सरांकडून उत्तम कर्मचारी म्हणून काहीतरी बक्षीस मिळत होतं.

पण आता दूधराम मुंबईकर झाला होता! म्हणजे त्याला एका जागी नोकरी करत स्वस्थ रहाण्यापेक्षा जास्त काही करण्याची इच्छा होऊ लागली. तेवढ्यात त्याच्या मित्राकडून त्याच्याकडे फिल्म सिटीमधलं काम चालून आलं. ‘क्रिश-३’ या चित्रपटासाठी गार्डन बनवण्याचं. नोकरी चालू ठेवून त्याने ते केलं. त्याचे वेगळे पैसे मिळाले. त्याच्या मनात आलं, असं चोरून काम करत रहाण्यापेक्षा नोकरी सोडून सरळ स्वत: कामं का घेऊ नये?! ऑर्किडने सांभाळलेली दहा गार्डन्स होती. प्रत्येक गार्डनचा काँट्रॅक्टर सांभाळण्याचे पैसे घेत होता. आणि एक, फार तर दोन नोकर ठेवून वरचे पैसे स्वत:च्या खिशात टाकत होता. ही सगळी काँट्रॅक्ट्स एकट्या दूधरामने घेतली, तर तो ऑर्किडकडून कमी पैसे घेईल आणि काम तितकंच चांगलं होत राहील. यात ऑर्किड हॉटेल आणि दूधराम, दोघांचा फायदा होता.

तसंच ठरलं. एकेक काँट्रॅक्ट जसजसं संपत गेलं, तसतसं ते रिन्यू न करता दूधरामच्या बायकोच्या नावाने सुरू झालेल्या नव्या कंपनीला मिळू लागलं. या कंपनीची मासिक उलाढाल लाखांमध्ये होऊ लागली. त्या काळात हॉटेल व्यवसायात मंदी आली होती. खर्च कमी करण्याच्या उपायांमधला एक म्हणून कर्मचारी कमी करण्यात येत होते. ट्रॅफिक आयलंडवरच्या गार्डन्सची देखभाल करण्याचं काम ज्या मॅनेजरच्या अखत्यारीत होतं, त्याला खर्च कमी करण्याचा हा चांगला उपाय वाटला.

उमेद असेल, तर नशीब साथ देणारच!

इथे एक गडबड झाली. मोठीच गडबड. नोकरी चालू ठेवून काँट्रॅक्टर बनणे यात कामत सरांची फसवणूक केल्यासारखं होईल; त्यापेक्षा नोकरी सोडणं बरं, असं वाटून दूधरामने नोकरी सोडली. पण नोकरी का सोडली, हे स्वत: जाऊन कामत सरांना सांगितलं नाही. आणि तो मॅनेजर सांगणार होता, त्यानेसुद्धा सांगितलं नाही. दूधरामला या घोर चुकीची अजून चुटपुट वाटते. यात कामत सर नाराज झाले. त्यांनी दूधरामला सतत मदत केली होती, सतत प्रोत्साहन दिलं होतं. आणि त्यांना काही न सांगता याने तडकाफडकी नोकरी सोडली होती. का, तर एक काँट्रॅक्टर बनण्याकरता. कामत सरांनी पीएफ, वगैरे जी काही त्याची देणी होती ती सगळी चुकती करून टाकली आणि त्याला ऑर्किडमध्ये प्रवेशबंदीच केली!

पण गोष्ट केवळ कामत सर नाराज होण्यावर थांबली नाही. ऑर्किडच्या ट्रॅफिक आयलंड्सची काँट्रॅक्ट्स त्याच्याच कंपनीला मिळाली आहेत, हे कामत सरांना माहीत नव्हतं. दूधरामच नाही, तर ती गार्डन्स मेन्टेन करण्याचं काम ठेवाच कशाला, असा विचार करून त्यांनी सगळी काँट्रॅक्ट्स बंद करून टाकली! नाहीतरी त्यातून हॉटेलला कमाई काही नव्हती; एक जाहीरात तेवढी होत होती. पण काँट्रॅक्ट्स बंद झाल्यावर दूधरामच्या कमाईचा स्रोतच आटला. तो एकदम शून्यावर आला. नंतर एकदा फोनवर त्यांनी दूधरामला सरळच सांगितलं की हे बिनकमाईचं काम त्यांना बंद करायचं होतं पण ते त्यांनी दूधरामसाठीच चालू ठेवलं होतं!

हे वळण कठीण होतं. या मोठ्या शहरात दूधरामची स्वत:ची जागा नव्हती. कमाई नव्हती. फिल्म सिटीतून वर्षातून एखाददुसरं काम मिळणार होतं. असे चक्क पाचेक महिने गेले. या काळात त्याला अनेकदा रडू फुटलं. निराश वाटलं. त्याने कित्येकदा ऑर्किड हॉटेलपाशी जाऊन अश्रूही ढाळले!

ऑर्किड हॉटेल आणि विमानतळ यांच्यात फार अंतर नाही. एकदा दूधरामला तिथे काही मजूर खोदकाम करताना दिसले. चौकशी केल्यावर कळलं की इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी एक जादाचं टर्मिनल उभारण्यात येत आहे आणि त्यासाठी एक एलिव्हेटेड रोड तयार होतो आहे. थोडा पुढे गेल्यावर काही लोक रोपं लावताना दिसले. मग त्याने तिथल्या मॅनेजरला गाठलं. स्वत:च्या कामाचे फोटो दाखवले आणि ऑर्किड सुटल्यावर त्याला पहिलं मोठं काम मिळालं ते मुंबई विमानतळाच्या टी-२ टर्मिनलच्या सुशोभीकरणाचं.

त्याला विचारणा झाली ती सुपरवायजर होण्याची. शेवटी ठरलं की तो सबकाँट्रॅक्टर होणार. तिथल्या कामाला गरज होती दोनतीनशे मजुरांची. हा तयार झाला पन्नासेक मजूर पुरवायला. ठरलं! मग त्याने पुन्हा गडचिरोलीहून पंचवीसेक मुलं आणली. गोरेगावच्या चाळींमध्ये त्यांच्या रहाण्याची सोय केली. त्यासाठी एका रूममागे चाळीस हजार डिपॉझिट भरलं आणि सहा रूम्स बुक केल्या. काम दोन वर्षं चाललं. पण त्याचं काम बघून त्या काँट्रॅक्टरने त्याला सबकाँट्रॅक्ट देणं चालू ठेवलं. दरम्यान त्याने सिनेमासाठी केलेली गार्डन्स सिनेमावाल्यांना पसंत पडली आणि त्याला तिथली कामं मिळू लागली. अगदी करन जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सपासून!

पुन्हा याला नशीब म्हणायचं का? एक म्हण आहे, हिम्मते मर्दा तो मददे खुदा. दूधराम सतत धडपडत राहिला आणि त्याला फळ मिळत राहिलं. ऑर्किडच्या ट्रॅफिक आयलंडचं काम महापालिकेच्या एका मॅडम बॉसने लक्षात ठेवलं होतं. नंतरच्या काँट्रॅक्टरचं काम नीट नाही असं जेव्हा तिच्या लक्षात आलं, तेव्हा तिने दूधरामला बोलावून घेतलं आणि मंत्रालयासमोरचं काम त्याच्याकडे सोपवलं! त्याला लागून नरिमन पॉईंटपासून मुंबादेवीपर्यंतची ट्रॅफिक गार्डन्स दूधराम सबकाँट्रॅक्टर म्हणून सांभाळू लागला.

गोष्ट इथे संपत नाही! सगळं सुरळीत चालू झालं असताना पुन्हा संकट आलं. करोना! सगळे लेबर घाबरून पळून गेले आणि एका फटक्यात सगळी कामं बंद झाली. दोन वर्षं काही नाही. दूधराम स्वत:सुद्धा बायकोमुलांना घेऊन घरी, वाकडीला गेला. दोन वर्षं तिथेच राहिला. पण दोन वर्षं गावी काढूनही नंतर परत आला. पुन्हा कामं मिळवली. करोनाच्या अगोदरच्या स्थितीत पोचला आणि आता आणखी उन्नती करण्याची उमेद बाळगून आहे!

‘‘करोना आला नसता तर आजच कुठच्या कुठे गेलो असतो; ठीक आहे, आज नाही तर उद्या जाऊच.’’

अशी उमेद असेल, तर नशीब साथ देणारच!

  • हेमंत कर्णिक

Leave a Reply