पुण्यातले डॉ दिलीप देशपांडे, वय ७०. पेशानं चार्टर्ड इंजिनिअर. EDARCH – Entrepreneurship Development And Rehabilitation center for the Handicapped या संस्थेचे ते संस्थापक. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार,काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या हस्ते हेलन केअर पुरस्कार, उद्योगश्री, पुणे भूषण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित.

साधारण ३२ वर्ष औद्योगिक सुरक्षितता मार्गदर्शक म्हणून मुंबई,पुणे,गोवा इथं त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला. त्यानंतर कामातून पूर्ण वेळ सुट्टी घेऊन त्यांनी EDARCH चं काम सुरू केलं. संस्था १६ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींमधील गुणांचा विकास करून त्यांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन करते. प्रत्येक गट ५ ते ८ व्यक्तींचा. त्यात कर्णबधिर,आंधळे, भिन्नक्षम(मतिमंद) आणि इतर अपंगत्व असलेली मुलंअसतात. बाजाराला कायम आवश्यक असणाऱ्या उत्पादनाची माहिती घेऊन संस्था संबंधित कंपनीशी चर्चा करते. त्यानुसार गटातील प्रत्येकाला क्षमतेनुसार प्रशिक्षण. जसं की, शारीरिकरित्या अपंग अ व्यक्तीला यंत्रामध्ये डाय टाकण्याचं काम दिलं जातं. ते त्याला सहज जमतं. अंधव्यक्ती स्पर्शज्ञानानं स्पिंडल फिरवून डाय योग्य जागी बसवतो. भिन्नक्षम (मतिमंद) व्यक्ती शारीरिक बलाचा वापर करून मटेरियल डाय टाकतो.कर्णबधिर व्यक्ती एकाग्रतेमुळे कच्चा माल मशीनमध्ये सतत टाकू शकतो.अशाप्रकारे त्या त्या व्यक्तीचे गुण हेरून सरांनी ही प्रशिक्षण पद्धती आखली आहे.प्रशिक्षण देताना संयमाची गरज असते.एखादा विद्यार्थी दोन महिन्यात तयार होतो तर काहींना दोन वर्षे लागतात. उत्पादनाची निर्मिती नियमित सुरू झाल्यानं गटाला त्याचा नियमित मोबदला मिळतो.
संस्थेत सगळ्या प्रकारचे अपंग असल्यानं एकत्र राहून सामाजिक – मानसिकरित्या व्यक्ती सक्षम होतो. योग्य प्रशिक्षण घेऊन त्याचा मोबदला मिळाल्यानं व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. वागण्याबोलण्यात, विचार करण्यात चांगले बदल होतात. संस्था किर्लोस्कर ऑईल इंजिन्,महाले फिल्टर,कादंबरी अशा कंपन्यांसाठी प्लास्टिक वस्तू,कागदी पिशव्या अशा उत्पादनांची निर्मिती करते.
मोहन धारिया यांच्या हस्ते संस्थेला आयएसओ मानांकन मिळालं आहे.
पुण्याच्या बाहेर आठ हेक्टर माळरान मिळवून ४००-५०० अपंगांना प्रशिक्षण देता येईल असं केंद्र सुरू करण्याचा सरांचा मानस आहे.
– संतोष बोबडे, पुणे
Related