वेड्यांना जवळ करणारा ‘ध्येयवेडा’

एरवी रस्त्यात कुठं वेडा इसम दिसला की सगळेच त्याच्यापासून दूर पळतात, त्याला टाळायचा प्रयत्न केला जातो. काही टारगट मुलं त्यांना त्रास देतात, त्यांची मजा घेतात, इतकेच काय तर त्यांच्या अंगावर असले नसलेले कपडे फाडण्यातही धन्यता मानतात. मात्र वेड्यांच्या अंगावरचे हेच फाटलेले किंवा मळलेले कपडे बदलवून त्यांना चांगले कपडे घालायला देणारा एक ‘ध्येयवेडा’ अकोल्यात आहे, आणि त्याचं नाव आहे पुरुषोत्तम शिंदे.
शिंदे मूळचे पातुर तालुक्यातील चरणगांवचे. कामधंद्यानिमित्त बरेच वर्षांपासून अकोल्यातील राऊतवाडी परिसरात त्यांचा मुक्काम आहे. घाऊक औषधी विक्रीचा व्यवसाय. त्यामुळे अकोल्यासह, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात त्यांची सतत फिरती सुरू असते. 

साधारण 15 वर्षांपूर्वीची गोष्ट. शिंदे अशाच एका फिरतीवर होते. रस्त्याने जात असताना त्यांचे लक्ष रस्त्यावरील एका वेड्याकडे गेलं. शहराच्या बाहेर हायवेवर हा माणूस फाटक्या तुटक्या कपड्यात रस्त्याच्या कडेला बसला होता. थंडीचे दिवस होते. शिंदे यांच्या गाडीच्या डिक्कीत त्यांचा स्वतःसाठीचा एक जास्तीचा ड्रेस होता. तो त्यांनी काढला आणि क्षणाचाही विचार न करता त्या वेड्या इसमाला घालून दिला. त्याच्या अंगावरचा घाणेरडा झालेला ड्रेस फेकून दिला. हे सर्व सुरू असतांनाच त्या इसमाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे शिंदे यांच्या लक्षात आलं. याचा अर्थ त्याला हे सर्व कळत होतं. पण, आजपर्यंत इतक्या मायेने कोणी त्याची चौकशीच केली नव्हती. निघतांना त्याने पुरुषोत्तम शिंदेचा हात एवढा घट्ट पकडून ठेवला की शिंदेनाही तिथून निघवत नव्हतं. पण पुढच्या कामाच्या जबाबदारीमुळे त्यांना जावंच लागलं. पण, त्याने घट्ट पकडलेला हात मात्र शिंदेना स्वस्थ बसू देत नव्हता.


त्यानंतर जेव्हाही पुरुषोत्तम शिंदे घराबाहेर पडायचे तेव्हा गाडीच्या डिक्कीत एक-दोन पॅन्ट, शर्ट घेऊनच. आणि इथूनच त्यांचं काम सुरू झालं. जिथं कुठं त्यांना वेडा इसम दिसेल, तिथंच ते त्याला सोबत असलेल्या शर्ट-पॅन्टचा ‘आहेर’ करायचे. मगच पुढंच काम. आतापर्यंत पाचशे पेक्षा जास्त वेड्यांना त्यांनी पॅन्ट-शर्ट घालून दिले आहेत.

एकदा कुणी वेडा किंवा पागल ठरला की मग सगळे लोकं अगदी घरचे सुध्दा त्याला टाळायला लागतात. मग अंगावरच्या कपड्यानिशी जे मिळेल ते खात अशी वेडी माणसं रस्त्याच्या कडेला पडलेली असतात. त्यांच्या अंगावरचे कपडे कित्येक महिन्यांपासून असतात. मळक्या, अस्वच्छ कपड्यांमुळे त्यांना एखादा आजार होण्याची शक्यता हेरून पुरुषोत्तम शिंदे त्यांचे ‘वस्त्रदाता’ झालेत.


शिंदे म्हणतात की, “कुणीही जन्मताच वेडा नसतो. एखादा प्रसंग, एखादी घटना, त्याला वेडा बनवित असते. आणि एकदा का कोणी वेड्यासारखं वागू लागला की मग लोकंही त्याच्यापासून दोन हात दूरच राहतात.” शिंदे मात्र त्यांच्या जवळ जातात, त्यांच्याशी आपुलकीने बोलतात, त्यांना मोकळं होण्यासाठी मदत करतात. या मदतीमुळेच काही वेड्यांना समुपदेशन करून घरी पाठवण्यातही त्यांना यश आलं आहे.
बर्‍याच वेड्यांशी त्यांची चांगली मैत्री झाली आहे. पुरुषोत्तम शिंदे सहजही त्यांना भेटायला जातात. त्यांच्यासाठी खायला काहीतरी नेतात. थंडीच्या दिवसात त्यांना स्वेटर, ब्लँकेट देतात, उन्हा-पावसाळ्यात छत्री देतात.
बरेचजणं आपआपल्या परीने समाजसेवा करीत असतात. मात्र अशी आगळी वेगळी समाजसेवा करणारे पुरुषोत्तम शिंदे बहुदा एकमेव असावेत.
पुरूषोत्तम शिंदे यांचा संपर्क क्र. – ९८२३७९३८२०