मेळघाटमधला आशादायी बदल

मेळघाटात गेल्या वर्षभरात अतीकुपोषित आणि मध्यमकुपोषित मुलांपैकी ३,६९० मुलं पूर्णपणे कुपोषणमुक्त झाली. तर ४,६५८ मुलांच्या कुपोषणश्रेणीत सुधारणा होऊन ही मुलं आता सामान्य श्रेणीत येत आहेत. 
मेळघाटातल्या धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या होती १२,७९१. इथल्या विषम परिस्थितीमुळे या मुलांना आरोग्यसुविधा मिळणं तसं कठीणच. त्याचा परिणाम झाला तो बालमृत्यूवर. या प्रचंड आकड्याची दखल घेऊन सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. 

अमरावती जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांनी या दोन तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ग्राम बालविकास केंद्र प्रकल्प सुरू केला. सुरुवात झाली नोव्हेंबर २०१६ मध्ये . एक महिन्याकरिता हा प्रयोग राबवण्यात आला.

दोन तालुक्यातल्या ४६४ अंगणवाडी केंद्रांमध्येच बालविकास केंद्र सुरू झालं . दूध, केळी,अंडी,कडधान्य असा सकस आहार अतितीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांना दिवसातून ७ वेळा दिला जाऊ लागला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हापरिषदेतर्फे ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून यासाठी तरतूद करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पासाठी निधीची अडचण भासली नाही. पहिल्याच प्रयोगात या दोनही तालुक्यातल्या कुपोषित मुलांच्या आरोग्यात फरक दिसून आला. अतितीव्र कुपोषित श्रेणीतल्या २,२३९ मुलांपैकी १,०२२ मुलं मध्यमतीव्र कुपोषित श्रेणीत आली. मध्यमतीव्र कुपोषित श्रेणीतल्या ५,०४४ मुलांपैकी २,०६६ मुलं सामान्यश्रेणीत आली. ३,६०८ मुलांच्या वजनात सुधारणा झाली. 

पहिल्याच प्रयत्नात मुलांमध्ये सुधारणा दिसून आल्यानं महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . कैलास घोडके यांनी हा ग्राम बालविकास केंद्रांचा प्रकल्प टप्प्याटप्याने पुन्हा राबवविण्याचं ठरविलं.
त्यानंतर लगेच जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१७ मध्ये ३०६ केंद्र सुरु करण्यात आली. २,६२० मुलांना सकस आहार देण्यात आला. त्यापैकी १,२६९ मुलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली.प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी होत असल्याचं पाहून तिसऱ्या टप्प्याची आखणी सुरू झाली. हा टप्पा आव्हानात्मक होता. पावसाळ्यात बाह्य जगाशी मेळघाटचा संपर्क नसल्यातच जमा असतो. दळवळणाची अपुरी साधनं आणि अपुऱ्या आरोग्यसुविधांमुळे पावसाळ्यात बालमृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच तिसरा टप्पा जुलै ते ऑगस्ट २०१७ मध्ये राबविण्यात आला. यावेळेस केंद्रांची संख्या वाढवून ४७५ करण्यात आली. 


६,६३४ मुलांपैकी २,९८२ मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर १७ या शेवटच्या टप्प्यात ४६३ केंद्र सुरू करून ६,१५७ मुलांना याचा लाभ देण्यात आला. त्यापैकी २,७१२ मुलं कुपोषणमुक्त झाली तर २,२४० मुलांचं वजन वाढलं . 
वर्षभरात दिसून आलेला हा बदल निश्चितच आशादायी आहे. मेळघाट कुपोषणमुक्त करणं शक्य आहे.