४३८ मुलांचा ‘ सिंगल फादर ‘

‘चोर’! – मूल जन्माला आल्यावर त्याला लावलं जाणारं फासेपारधी समाजातलं विशेषण. मतीन भोसले हा या मुलांसारखाच फासेपारधी समाजातला. स्वत:सह या मुलांवरील गुन्हेगारीचा टिळा पुसून काढण्यासाठी तो जिवाचं रान करत आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यातलीही गावं, पारधी बेडे… जिथं असतील तिथून त्यानं मुलं शोधून काढली अन या मुलांना एकत्र केलं. तुटक – फुटकं का असेना, त्यांच्या डोक्यावर छप्पर दिलं.

स्वतः जवळचं होतं-नव्हतं ते सगळं विकून प्रसंगी भीक मागून तो या मुलांच्या शिक्षणासाठी, पोटा-पाण्यासाठी झटत आहे. 
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा हे मतीनचं गाव. त्याचे वडील शिकार करायचे. गावात-परिसरात कार्यक्रम झाल्यानंतर पत्रावळीत राहिलेले उष्टं अन्न जमा करायचे. त्यातून मुलाचं पोट भरायचं. मात्र रोज अन्न मिळेलच याची खात्री नाही. उपासमार ठरलेली. मतीनने दहावी झाल्यावर लगेचच एका सोशल सेंटरमध्ये नोकरी सुरु केली. फासेपारधी समाजातील शाळाबाह्य विद्यार्थी, स्त्री-पुरुष, रोजगार असं सर्वेचं काम त्याला मिळालं. त्याच वेळी गावात राज्य शासनाने पारधी समाजातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या वस्तीशाळेवर निम्न शिक्षक म्हणूनही त्याला काम मिळालं. पुढे २००५ साली त्याने आदीवासी ‘फासेपारधी सुधार समिती’ची स्थापना करून समाजातील लोकांचे जॉब कार्ड, शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लढा सुरु केला. आपल्या समाजातील लहान मुलांना भीक मागताना पाहून, त्यांचे हाल पाहून अस्वस्थ झालेल्या मतीनने आपली शाळेतील नोकरी सोडली.

समाज बदलायचा तर आधी मुलांना शिक्षित करायला हवं, म्हणून मुलांचा शोध सुरू झाला. ही मुलं, त्यांचे आई-वडील काय करतात हे शोधलं. शिकार हेच त्यांच्या रोजगाराचं साधन होतं. पण, वनसंरक्षण कायद्यामुळे तो आधारही गेला. जगायचं कसं? पोरांपासून आई-वडिलांर्पयत सर्वानीच मुंबई, नागपूर पासून चेन्नई, दिल्लीर्पयत मिळेल ते गाव गाठून भीक मागणं सुरू केलेलं. या प्रत्येक शहरांत फिरून मतीनने १६९ मुले गोळा केली. तब्बल नऊ महिने लागले. स्वत:कडील बकऱ्या विकल्या आणि २००९ मध्ये त्याने ‘प्रश्नचिन्ह’ शाळा सुरू केली.

आज जेमतेम ३५० चौरस फुटाच्या जागेत तब्बल ४३८ मुलांचा सांभाळ तो एकटा करत आहे. इथं मुलांना शिक्षण, डोक्यावर छप्पर आणि पोटभर अन्न मिळत आहे. आपणही काहीतरी करू शकतो, हा विश्वास प्रत्येक मुलाला मिळाला आहे. मुलांना आता ‘प्रश्नचिन्ह’ शाळा आपली वाटू लागली आहे.
अथक प्रयत्नानंतर २०१३ साली आदिवासी फासेपारधी सुधार समिती संचालित ‘प्रश्नचिन्ह’ आदिवासी आश्रमशाळाही सुरू झाली. मंगरूळ चव्हाळ्यात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एका हॉलमध्ये ही शाळा भरते. बाजूला एका कुडात अन्न शिजवलं जातं. पूर्वी कचरा-भंगार गोळा करणारी, भीक मागून, शिकार करून खाणारी, अगदी पाकीटमारी-चोऱ्या करणारी मुलं आता शाळेत धडे गिरवताना दिसतात. काही मुलं दहावी झाली. ती मोठ्या पदावरच्या नोकरीचं स्वप्न बघत आहेत. या मुलांनी हे स्वप्न पाहावं, यापेक्षा मोठा बदल कुठला असू शकतो ?