वह दूरी केवल चंद कदमों की थी, किंतू फासला हजारो मिलों का था l

वैशाली, रणजीतच्या आयुष्यात आली आणि रणजीतचं रखरखतं वैशाखासारखं असलेलं आयुष्य बहरून आलं. रणजित राजपूत हा बोलका, धडपडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा युवक. कोणत्याही विषयावर तो भरभरून बोलतो. यामुळेच प्रत्येकाच्या मनावर त्याची वेगळी छाप पडलेली. हाच रणजीत काही वर्षांपूर्वी मात्र पार काळवंडून गेला होता. अर्थात, कारण ही तसंच होतं. कौटुंबिक कलहामुळे २०११ मध्ये त्याचा जयश्रीसोबत घटस्फोट झाला. तेवढ्यावरच न थांबता पत्नीच्या खोटया तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. खूप बदनामी झाली. रणजीतसारख्या मुलावर छळवणूकीचा गुन्हा दाखल व्हावा हे अनेकांना पटलं नाही. आई – वडीलांना झालेला मनस्ताप सहन न झाल्यामुळे रणजीत निराशेच्या गर्तेत गेला. मनं रमावं म्हणून त्याने पुन्हा आपलं शिक्षण सुरू केलं, त्यातही मन रमेना. शेवटी गाव सोडलं. जळगावात नोकरी स्वीकारली. थोडे दिवस तिथं काढूनही करमेना म्हणून तो बुलढाण्याात परतला.

वैशाली इंगळे. स्वभावाने प्रेमळ तेवढीच करारी. वडील गेल्यानंतर घराची जबाबदारी स्वीकारली, घर चालविण्यासाठी 2004 पासून एनजीओमध्ये काम करू लागली. दिवसरात्र मेहनत घेऊन तिने घर उभं केलं. महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीत तिची निवड झाली. आणि तिथंच वैशालीची रणजीतशी भेट झाली. दोघे अनेकवेळा सामाजिक उपक्रमात सोबत होते. यातून त्यांची मैत्री झाली. रणजीतच्या वेदना जपत तिने त्याच्या सोबत लग्नाचा निर्णय घेतला. रणजीतचं रखरखतं आयुष्य बहरून आलं. आता सगळं सुरळीत होणार, पण…
रणजीतच्या घरातले आणि नातेवाईकांवर रूढी, संस्कृतीचा मोठा पगडा. समाजातील विवाहित व तरूण मुली जेठ, सासरा, अनोळखी व्यक्तीसमोर पडद्याशिवाय येण्यास बंदी; तिथं त्या जातीच्या मुलाने थेट आंतरधर्मीय विवाह करावा हे कुणालाही पटलं नाही. रणजीतचे वडील रेवणसिंग, आई कौशल्या यांनीही रणजीतच्या विवाहाबद्दल नाराजी दाखविली. समाज आपल्याला काय म्हणेल या भीतीने त्यांनी त्याला घरातून बेदखल केलं. हीच परिस्थिती वैशालीकडे होतीच. तिने एका घटस्फोटीत व्यक्तीशी लग्न केल्याने तिलाही नातेवाईकांनी बरंच काही सुनावलं. रूढीचं हे आव्हान स्वीकारून रणजीत आणि वैशाली राजपूत परिवारातून बाहेर पडले. 


विवाह पार पडला. पण, नातेवाईक, समाज आई वडीलांना सतत टोमणे मारत असल्याने आई वडिलांनी घराबाहेर पडणं बंद केलं. याचं दु:ख रणजीतला कोसत होतं. समाजाने त्या दोघांना खाजगी कार्यक्रमात बोलवणंही बंद केलं. जणू काही अघोषित वाळीतं टाकलं.
मध्यंतरी, रणजीतच्या लहान भावाला बाळ झालं. तेव्हा त्याची बायको शासकीय रुग्णालयात उपचाराला होती. वैशालीचं कार्यालय आणि दवाखान्यातल्या त्या खोलीत केवळ एका भिंतच अंतर. तरीही ती बाळाला पाहायला जाऊ शकत नव्हती. रणजीत म्हणतो, “वैशाली से वह दूरी केवल चंद कदमों की थी, किंतू फासला हजारो मिलों का था l मन मारकर वैशाली दूर से ही यह सब देखती इसका उसे बहोत दुख होताl”
रणजीत आणि वैशालीचं सुशील आचरण, परिवाराशी असलेला स्नेह पाहता आता विरोधाची धार हळूहळू बोथट होत चालली आहे. रणजीत आणि वैशालीच्या संसारावर ‘रूद्रायणी’ नावाचं गोंडस फुलंही उमललं आहे.