आम्हाला लहाने नावाचा मोठा माणूस बघायचा आहे !

गंगाराम, वय ५०. पाच वर्षांचे असताना त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसणं बंद झालं. तपासणीनंतर त्यांच्या डोळ्यांमधील बाहुली उलटी असल्याने ते कायमचे अंध झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. गेली ४५ वर्षे गंगाराम अंध म्हणून जगत होते. २१ डिसेंबरची सकाळ त्यांच्यासाठी प्रकाश घेऊन आली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील मोख येथील गंगाराम पवारच नव्हे तर, त्यांच्यासारख्या दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या तब्बल १५० अंधांना अशी नवी दृष्टी मिळाली.


१९ ते २४ डिसेंबरपर्यंत यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. शासनाच्या अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी चार दिवसात तब्बल ८११ नेत्रशस्त्रक्रिया केल्या.
शिबिरात, मोतीबिंदू झालेले व पूर्ण आंधळे असणारे परंतु शस्त्रक्रियेनंतर ज्यांना दृष्टी येऊ शकते अशा दीड हजार रूग्णांची निवड करण्यात आली. लहाने यांना जे. जे. रूग्णालय मुंबई येथील नेत्र विभाग प्रमुख डॉ. रागिनी पारेख व त्यांच्या ४० नेत्रतज्ज्ञांच्या चमूने सहकार्य केलं. या शिबिरात डॉ. तात्याराव लहाने यांनी १ लाख ६५ हजार नेत्रशस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. तर डॉ. रागिनी पारेख यांनी ८५ हजार नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा पल्ला गाठला. या शिबिराबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, “डॉ. लहाने यांच्या हातून नेत्रशस्त्रक्रिया व्हावी, अशी प्रत्येक रूग्णाची इच्छा असते. पंरतु, गरीब रूग्ण मुंबईला जाऊन शस्त्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने यांनीच यवतमाळ येथे येऊन ही सेवा द्यावी, अशी विनंती आम्ही केली. तीन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर डॉ. लहाने यांची वेळ मिळाली.” रुग्णांची ने-आण करणे, त्यांच्या भोजन, निवासासह औषधं, काळे गॉगल, नंबरचे चष्मे ही सर्व जबाबदारी त्यांनी घेतली. 

दारव्हा तालुक्यातील प्रियंका ही नववीतील विद्यार्थिनी दोन वर्षांपूर्वी डोळ्यात तार खुपसली गेल्याने दृष्टीहीन झाली होती. शिबिरात प्रियंकाची शस्त्रक्रिया झाली. अधू झालेल्या डोळ्याने तिला चक्क दिसायला लागलं. याविषयी लहाने म्हणाले, “अंधांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने व्रत म्हणून आपण नेत्रशस्त्रक्रिया करतो. वृद्ध, गरीब रूग्णांकडे पैसे नसतात. त्यामुळे ते मोतीबिंदू किंवा डोळ्यांना काही इजा झाल्यानंतर उपचार महागडे असतील म्हणून दवाखान्यात जात नाहीत. यामुळे ग्रामीण भागात मोतीबिंदूरूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. अशा वेळी एक नेत्रतज्ज्ञ म्हणून त्यांच्यावर मोफत उपचार, नेत्रशस्त्रक्रिया करणं ही आमची जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक डोळस माणसाने नेत्रदानाचा संकल्प केला तर भारतात एकही अंध शिल्लक राहणार नाही.”

“अशा शिबिरात बहुतांश शेतकरी, शेतमजूर, भूमीहीन, गरीब रूग्ण येतात. त्यांची तपासणी करून त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची खरी अडचण कळते. त्यामुळे या रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर मनस्वी समाधान मिळते. मोतीबिंदू हा साधारण वृद्धापकाळात होतो. याच वयात वृद्धांना आधाराची खरी गरज असते. अशा शस्त्रक्रिया शिबिरातून तो आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची निष्काम भावनेने सेवा करून त्यांचा सन्मान जपावा, असा उपदेशही डॉ.लहाने शिबिरादरम्यान रूग्ण व उपस्थित नातेवाईकांना आवर्जून करतात.
शस्त्रक्रियेनंतर दृष्टी आलेल्या रूग्णांना डॉक्टर विचारतात, “सर्वांत पहिलं काय पहायचं आहे? किंवा कोणाला बघायचं आहे? या प्रश्नाला प्रत्येक रूग्णाच्या मुखातून एकच नाव निघतं, ‘आम्हाला लहाने नावाचा मोठा माणूस बघायचा आहे!’