कोवळी पानगळ रोखणारा प्रशंसनीय उपक्रम

राजकीय पक्षांची सामाजिक बांधिलकी हा तसा वादविषय. अनेक नेते समाजकारणाच्या मार्गाने राजकारणात स्थिरावतात आणि समाजकारण विसरतात, असंही दिसतं. म्हणूनच जी नेतेमंडळी, राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते सामाजिक समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतात त्यांची आवर्जून नोंद घ्यायला हवी. 

यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात कुपोषणामुळे होणारी कोवळी पानगळ रोखण्यासाठी गेली २० वर्षे शिवसेना प्रयत्नरत आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यात शिवसैनिक हा उपक्रम राबवितात.या उपक्रमात आतापर्यंत ५० हजारावर बालकांना लाभ झाला आहे. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हा शिवसेनेचा मूळ पाया! तोच धागा पकडून यवतमाळ जिल्ह्याचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख व राज्याचे विद्यमान महसूल राज्यमंत्री व यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कल्पनेतून आणि पुढाकाराने सुरू झालेला हा कुपोषित बालकांसाठीचा उपक्रम.काय आहे हा उपक्रम? “२० वर्षांपूर्वी पुसद तालुक्यातून कुपोषित बालकांना दूध व प्रोटिन पावडर, व्हिटॅमिनची औषधे व इतर पोषण आहार पुरविण्यास पक्षाने प्रारंभ केला. तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात हा उपक्रम सुरू आहे”, असे संजय राठोड म्हणाले. शून्य ते चौदा वयोगटातील बालकांना पोषणआहार मिळावा आणि कुपोषणाच्या रूपाने होणारी कोवळी पानगळ थांबावी यासाठी शिवसैनिक प्रयत्नरत आहेत. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आरोग्यतपासणी केली जाते आणि उपचारांसह त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उच्च प्रतीची दूध, प्रोटिन पावडर, व्हिटॅमिन औषधे यांचे नियमितपणे मोफत वितरण केले जाते. राजगिरा लाडू व तत्सम पोषणआहारही दिला जातो.


अज्ञान, निरक्षरता, स्थलांतरण, लवकर लग्न होऊन मुलं होणे, आदिवासी कुमारी माता, जास्त अपत्य संख्या, बाल संगोपनात निष्काळजीपणा, आरोग्यसेवांची कमतरता, काही प्रथा-कुप्रथा, व्यसनांचा अतिरेक, दुर्गम परिसरातील असुविधा, अंधश्रद्धा अशा कारणश्रुंखलेपायी यवतमाळ जिल्ह्यात कुपोषणाची तीव्रता अद्यापही आहे. ती कमी व्हावी हा शिवसेनेचा प्रयत्न आहे. कोणत्याही सरकारी सहाय्याशिवाय शिवसैनिक कुपोषणमुक्तीसाठी पोषणआहाराचा हा अभिनव उपक्रम राबवित आहेत. माँ आरोग्यसेवा समिती ट्रस्ट, समाजातील दानशूर व्यक्ती, डॉक्टर, आरोग्य संघटना, शिवसेना पदाधिकारी आणि स्वतः पालकमंत्री संजय राठोड हे सर्व मिळून हा खर्च करतात.

नामदार संजय राठोड म्हणाले, “दरवर्षी आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत असल्याचं लक्षात आल्यानंतर अशा बालकांना औषध-उपचारांसह पोषणआहार पुरविण्याचं ठरवलं. आरोग्यतपासणी शिबिर घेऊन कुपोषणाच्या चारही श्रेणीतील प्रत्येक बालकाचं रिपोर्टकार्ड तयार करून त्या आधारे वर्षभर त्या बालकांची नियमित आरोग्यतपासणी करून त्याच्या नोंदीही ठेवल्या जात आहेत.”“बालकांचे योग्य पोषण झाले तरच उद्याची पिढी सुदृढ राहील. त्यासाठी कोणीतरी सामाजिक उत्तरदायित्व निभावलं पाहिजे. तीच भूमिका आम्ही शिवसैनिक पार पाडत आहोत”, असे ना. संजय राठोड सांगतात. या सामाजिक उपक्रमात समाजातील सर्वच घटकांनी योगदान दिले पाहिजे, अशी प्रतिक्रियाही ना. संजय राठोड यांनी व्यक्त केली.एखाद्या राजकीय पक्षाचा सामाजिक उपक्रम सलग दोन दशके; तोही सरकारी अनुदानाशिवाय अविरत सुरु राहणे, हे प्रशंसनीय आहे. आतापर्यंत ५० हजारांवर कुपोषित बालकांना लाभ झालेल्या या उपक्रमाची म्हणूनच दखल घेणं आवश्यक ठरतं.
अन्य राजकीय पक्षांच्याही वैशिष्ट्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमांची दखल घ्यायला आम्हाला आवडेलच.