प्रयोगशील लक्ष्मीबाई!

लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे आपल्या शेतात राबत होत्या. उमरखेडचे आमदा‍र राजेंद्र नजरधने लक्ष्मीबाईंना शोधत त्यांच्या शेतात पोहचले. महाराष्ट्र शासनाने लक्ष्मीबाईंची ‘जिजामाता कृषीभूषण’ पुरस्कारासाठी निवड केल्याची बातमी त्यांनी लक्ष्मीबाईंना सांगितली. “शेतात प्रामाणिकपणे राबणाऱ्या सेवाव्रतीचा शासनाने सन्मान केल्याची बातमीही शेतात राबतानाच कळावी, यापेक्षा मोठा आनंद कोणता असावा,” अशी प्रतिक्रिया लक्ष्मीबाईंनी व्यक्त केली. नुकतंच ११ जुलै रोजी मुंबई येथे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लक्ष्मीबाईंना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या प्रयोगशीलतेची ही गोष्ट.


जिल्हा यवतमाळ. येथील महागाव तालुक्यातील सवना गावच्या लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर. घरी कोरडवाहू शेती. प्रपंच चालवताना दमछाक नेहमीचीच. यावर उपाय शोधायला सुरुवात केली लक्ष्मीबाईंनी. १९९५ मध्ये त्यांनी पती बापूजींच्या मदतीने शेतात विहीर खोदली. हीच लक्ष्मीबाईंच्या प्रयोगांची सुरूवात. ऊस लावला. त्यासाठी कृषीतज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि ऊसाचं विक्रमी उत्पन्न मिळवलं. २००५ मध्ये अंजीर शेतीचा प्रयोग. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून रोपं आणली. अडीच एकरात त्याची लागवड केली.अंजीराच्या झाडांपासून ७ व्या वर्षी उत्पन्न सुरू होतं. पण २०१०च्या दुष्काळात झाडं वाळली. अंजीर शेती फसल्याने त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. मात्र त्या डगमगल्या नाही. त्यानंतर त्यांनी गुलाब शेतीचा प्रयोग केला. एक एकरात अडीच हजार गुलाबाची कलमं लावली. सहा महिन्यातच गुलाब शेतीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यांच्या शेतातून दररोज नागपूर, नांदेड, यवतमाळ, पुसदच्या मार्केटला फुलं जाऊ लागली. खर्च वजा जाता त्यांना मासिक २५ ते ३० हजार रुपयांचं उत्पन्न सुरू झालं.
लक्ष्मीबाईंचा आत्मविश्वास वाढला. पुढचं पाऊल होतं केळीच्या शेतीचं. एक हेक्टर क्षेत्रात केळी लागवडीला सुरुवात झाली. आज ८ एकर शेती केळीने व्यापली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून १०० हेक्टर क्षेत्रात केळीची यशस्वी लागवड त्यांनी केली. आता त्यांचं शेत इतर शेतकऱ्यांसाठी ‘मॉडेल फार्म’ झालं आहे. “प्रयोगशील शेतीत पारंपरिक शेतीपेक्षा कष्ट अधिक. मात्र परिश्रमाशिवाय आणि रिस्क घेतल्याशिवाय यश मिळत नाही”, असं लक्ष्मीबाई सांगतात. शेतीमुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. आर्थिक स्थिती सुधारली असंही त्यांनी सांगितलं.
त्यांचा मुलगा, संभाजी पुण्यात कृषी विषयात बीएससी करतो आहे. तर दुसरा मुलगा तानाजी विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर क्लब, येथे प्रशिक्षण घेतो आहे. मुलगी शिवानी बारावीत आहे. तर, पती बापूजी हे राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहेत.
शेती म्हणजे नुकसान या सध्याच्या समजालाच लक्ष्मीबाईंनी छेद दिला आहे. त्यासाठी हवेत कष्ट आणि कल्पकता हेही त्यांनी दाखवून दिलं आहे