गौताळा आज मोकळा श्वास घेत आहे…

औरंगाबाद शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर वसलेलं गौताळा अभयारण्य. सातमाळ्याचे उंच डोंगर, दऱ्या ,आकाशाला भिडणारी असंख्य झाडं, नाले, झरे आणि तळ्यांनी औरंगाबाद – जळगाव सीमेवरचं हे समृद्ध जंगल. 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी. नीलगायी, बिबट्या, अस्वल, हरीण, तरस, लांडगे, रानडुक्कर या जंगलाचं वैशिष्ठय. आणखी एक विशेष म्हणजे हे जंगल पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त आहे. 

याचं श्रेय वनाधिकारी रत्नाकर नागपूरकर यांना. राज्यात प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा होताच नागपूरकर यांनीही जंगलात तातडीनं अंमलबजावणी सुरू केली. प्लॅस्टिक जंगलात न्यायला पूर्णपणे बंदी. पाण्याच्या बाटल्यांसाठी 10 रुपये डिपॉझिट. आत जाताना वॉचमनला बाटल्या दाखवायच्या, कुपन घ्यायचं. परत आल्यावर नेलेल्या सगळ्या बाटल्या परत आणून दाखवायच्या आणि डिपॉझिट परत घ्यायचं. यामुळे प्लॅस्टिकचा नवीन कचरा थांबला.

जंगलात आधीचा कचरा वेचण्यासाठी नागपूरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जंगल अक्षरशः पिंजून काढलं. या मोहिमेत प्लॅस्टिकच्या तब्बल 15 हजार बाटल्या जमा झाल्या. त्या प्लॅस्टिक कचरावेचकांकडे देण्यात येत आहे. त्यातून त्यांचंही अर्थार्जन होत आहे.
जंगलाची नीट पाखरण करणारे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गौताळा आज मोकळा श्वास घेत आहे. असं करणं शक्य आहे, बघा.