चिमुकल्या हातांनी देव झळाळतो..!

औरंगाबाद शहरातल्या सेवन हिल चौकातून सूतगिरणी चौकाकडे निघालं की डाव्या बाजूला वेगवेगळ्या मुर्त्या बनवणाऱ्या अनेक झोपड्या आहेत. बांबूच्या आधार देऊन, वर बेगड टाकून बनवलेल्या तकलादू झोपड्या… पण याच झोपड्यांमध्ये चिमुकल्या हातांचा एक चित्रकलाकार आकार घेताेय. मूर्तीवर रंगाचा सफाईदारपणे हात फिरवणारा हा चिमुरडा आहे जितेंद्र बसनाराम सोलंकी मूळ राजस्थानातला, पण याच्या जन्मापूर्वीच कधीतरी याचे वडील रोजगाराच्या शोधत महाराष्ट्रात निघून आलेले. जीतेंद्र हा मूळ बंजारा समाजतला, त्याची घरातली भाषा गोरमाटी त्यामुळे इथे मराठी भाषेत शिक्षण देणाऱ्या पालिकेच्या शाळेशी त्याचं काही जमलं नाही… 

दुसरी पर्यंत कसतरी ढकलपास झाला नि दुसरीत शाळेला त्याने जय सेवालाल केलं… काही दिवस भंगार वेचून कुटुंबाला मदत केली. पण तो व्यवसाय फारसा न रुचल्याने त्याने मूर्त्यांच्या झोपड्यांमधला कलरचा ब्रश हातात घेतला… आता चांगलं वळण लागलंय त्याच्या हाताला… दिवसाकाठी दहा ते 12 छोट्या आणि पाच ते सहा मोठ्या मुर्त्या तो रंगवतो… सुरुवातीला पांढरा कलर मारून घेऊन त्यावर बेसिक कलर मारायचा नि मग मूर्तीला लेकरसारखं गोंजारत नक्षीदार रंग द्यायचा… जीतेंद्र या मूर्त्यांना इतक्या तन्मयतेने रंगवतो की चूक व्हायला त्याच्याकडे चॅनसच नाही. आता वय वर्ष फक्त बारा असलेला हा कलाकार इतक्या सफाईदारपणे मुर्त्या रंगवतो की जर याला तांत्रिक शिक्षण मिळालं तर चित्रकलेच्या क्षेत्रात नाव काढील पण आज तरी चित्रकला याचा छंद नसून आहे ते फक्त उवजीविकेच साधन… याला वर्षाकाठी या मुर्त्या रंगवण्याचे 30 हजार रुपये मिळतात…  आता सात महिने झालेत त्याला या सात महिन्याच्या काळात किती मुर्त्या रंगवल्या असतील याने हे यालाही आठवत नाही.

“पुढे चालून काय व्हायचंय तुला” असा प्रश्न विचारला तर तो “बस अच्छा पेंटर बन जाऊं” इतकी माफक अपेक्षा व्यक्त करतो तो…  आयुष्याकडून खूप कमी मागणाऱ्या या मुलाच्या नशिबात पुढे काय मांडून ठेवलंय हे देवालाच माहीत पण सध्या तरी देवाला झळकवनं त्याचा सुंदर मेकअप करणं हे याच्या चिमुकल्या हातात आहे…