कन्याजन्माचा उत्सव करणारं रुग्णालय

रंगबेरंगी फुग्यांची सजावट, महिलांची लगबग, फुलांचे गुच्छ, मिठाईचं वाटप. हा माहोल आहे बीड जिल्हा रुग्णालयातल्या प्रसूतीकक्षातला.. कन्याजन्माचं या रूग्णालयात असं स्वागत केलं जातं. यासाठी खास दालनच रूग्णालयात तयार केलं आहे.नऊ वर्षांपूर्वी देशात सर्वात कमी स्त्री जन्मदर आणि स्त्री भ्रूणहत्यांची उघड झालेली प्रकरणं यामुळे बीड जिल्हा चर्चेत होता. त्यावेळी सुरू झालेली स्त्री जन्माबाबतची जनजागृती आजही सुरूच आहे. बीड जिल्हा रूग्णालयानेही कन्याजन्माचा उत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सन २०१८-१९ मध्ये जिल्हा रुग्णालयात सुमारे साडेचार हजार मुलींचा जन्म झाला आहे. शासकीय योजनांतून काही मदतही पात्र लाभार्थ्यांना होत आहे.


जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक थोरात म्हणतात, “९ वर्षांनंतर आज परिस्थिती बदलली आहे. ७०० पर्यंत गेलेला स्त्री जन्मदर ९३८ पर्यंत आला आहे. परंतु, अजूनही ‘मुलगी नको’ ही मानसिकता आहेच. त्यामुळेच, जनजागृती सुरूच ठेवावी लागते. म्हणूनच मुलगी झाल्याचा आनंद रुग्णालयातच साजरा करण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. प्रसूतीकक्षाजवळ एक दालन सजवून ठेवलेलं असतं. मुलगी जन्माला आली की त्या जोडप्याला या दालनात नेलं जातं. तिथं त्यांचा सत्कार केला जातो. मिठाई दिली जाते. हे सगळं आमच्या अधिपरिचारिका विजया सांगळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर परिचारिका करतात. ही कृती छोटी असली तरी मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचा संदेश देणारी आहे.”
नुकताच (14 मे) मोहिनी नाईकवाडे यांनी जिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यांचं हे पहिलंच अपत्य. कुटुंबियांच्याही आधी जिल्हा रुग्णालयाने या बाळाचे केलेले स्वागत हा एक सुखद अनुभव असल्याचं मोहिनी यांनी सांगितलं.
अधिपरिचारिका विजया सांगळे सांगत होत्या, “मुलगा झाला की अनेकदा प्रसूतीकक्षात नातेवाईकांकडून पेढे, मिठाईवाटप होतं. पण मुलगी झाल्यावर हे घडतंच, असं नाही. यातूनच मुलीबाबत नकाेशी मानसिकता सहज लक्षात येते. हेच चित्र बदलण्यासाठी कन्याजन्माचाही उत्सव व्हावा, ही कल्पना पुढं आली. आता रोज हा उत्सव साजरा होत आहे.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुखदेव राठोड म्हणाले, “एखाद्या दांपत्याला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या चेह-यावर नाराजीचे भाव दिसायचे. पण, मुलगी होताच उत्सव साजरा होत असल्याने आता त्यांच्या चेह-यावर आनंद दिसतो. मुलींच्या एकत्रित नामकरणाचा उपक्रमही रूग्णालय आणि स्व. झूंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या वतीने राबवला जातो. विविध उपक्रमातून स्त्रीजन्माचं स्वागत करा असा संदेश दिला जात आहे.”