३०६ मुलींच्या बारशाचं वंडर

“हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा,
पाळण्याच्या मधोमध, फिरतो खेळणा”
रंगीबेरंगी सजवलेल्या मांडवामधून सूर ऐकू येत होते. पण, इथं कोणा एका बाळाचा नामकरणाचा कार्यक्रम सुरू नव्हता. तर हे दृश्य होतं ३०६ मुलींच्या सामुदायिक नामकरण सोहळ्याचं. मुलींच्या या सामुदायिक नामकरण सोहळ्याची लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली.
बीडच्या स्व झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नववर्षाच्या स्वागतानिमित्त राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, व्याख्यानं, आरोग्यशिबीर, सामुदायिक विवाह सोहळा आयोजित के्लं जातं. मागील वर्षीपासून यात नवजात बालिकांच्या सामुदायिक नामकरण सोहळ्याची भर पडली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड म्हणाले, “स्त्री पुरुष जन्मदर आकडेवारीत बीड जिल्हा सर्वाधिक पिछाडीवर असल्याचं काही वर्षांपूर्वी जाहीर झालं होतं. स्त्रीभ्रू्ण हत्या रोखून स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी त्यानंतर बीड जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविण्यात आले. स्त्रीजन्माचं स्वागत करण्याच्या उपक्रमातही सहभाग घ्यावा, असं वाटू लागलं. त्यातूनच मुलींच्या बारशाच्या आयोजनाची कल्पना सुचली. पहिल्या वर्षी (२०१७) साधारण १०० मुलींच्या बारशाचं नियोजन होतं. मात्र ही नावनोंदणी वाढत जाऊन १४४ झाली. त्यामुळे यावर्षी आम्ही तीनशे मुलींच्या बारशाचं उद्दिष्ट ठरवलं. तर, तब्बल ३०६ मुलींचं यावर्षी सामुदायिक बारसं झालं. या नामकरण सोहळ्यासाठी १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर याकाळात जन्मलेल्या मुलींची नोंदणी केली जाते.”


या बारशाच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आईला साडीचोळी दिली जाते. छोट्या मुलीला नवीन पाळणा, पैंजण, खेळणी वगैरे साहित्य मोफत दिलं जातं. यंदाच्या सोहळ्याने खटोड प्रतिष्ठानला वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवता आलं. राजयोग फाउंडेशन, कुटे ग्रुपचे सदस्य तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, भरतबुवा रामदासी यांच्यासह बीड परिसरातील आबाल वृद्ध या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आता पुढच्या वर्षी ५०१ कन्यांचा सामुदायिक नामकरण सोहळा आयोजित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवण्याच्या मनोदय संयोजकांनी बोलून दाखवला.