विद्यार्थांना प्रगत करणारा अवलिया शिक्षक

अक्षर ओळख होण्याच्या वयात इथले विद्यार्थी १० व १२ वीची कोणत्याही विषयाची पुस्तकं धडाधड वाचतात, पाठय पुस्तकातील सगळ्या कविता मुखोद्गत आहेत, कोणताही अवघड शब्द लीलया आणि सुंदर हस्ताक्षरात फळ्यावर लिहितात, उन्हाळ्याच्या सुट्टीतही शाळा सुरु असते, ग्रामीण भागात शाळा असूनही या डिजिटल शाळेतील सर्वच विद्याथी १०० टक्के प्रगत आहेत. हे चित्र आहे, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील तरोडा जिल्हा परिषद शाळेचं. 

८० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेलं हे तरोडा गाव.  लोकसंख्या ७५०. डोंगराळ भाग. कोरडवाहू शेती हा इथला मुख्य व्यवसाय. त्यातही शेतीची कामं संपली की बहुतेक गावकरी ऊसतोडणीसाठी गाव सोडतात. आणि गावात राहतात ती म्हातारी माणसं आणि लहान शाळकरी मुलं. इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असलेल्या या शाळेत ४५ पटसंख्या आहे ४५ आणि शिक्षक दोन. त्यापैकी एक आहेत देविदास गुंजकर. या गुंजकर सरांनीच शाळेतील शैक्षणिक वातावरणच बदलून टाकलं. गुंजकर या शाळेत आले ते २०१५ साली. पहिली आणि दुसरीचा वर्ग त्यांना मिळाला आणि सुरु झालं आनंददायी शिक्षण.
या वर्गातील मुलं अ, आ, इ, ई अशी मुळाक्षरं गिरवत नाहीत तर विविध शैक्षणिक साहित्याच्या मदतीने थेट वाचायलाच शिकतात. शंख, शिंपले, विविध फळांच्या बिया, टाकाऊ बॉटल्स, रंगीबेरंगी दगड-गोटे, तक्ते, चित्रपट्ट्या, गणितीय उपकरणं आदींपासून गुंजकर यांनीच हे साहित्य तयार केलं आहे. इथले शिक्षक खुर्चीवर बसून शिकवीत नाहीत तर विद्यार्थ्यांच्यात खाली जमिनीवर बसून शिकवितात. 


देविदास गुंजकर सांगतात, “तुम्ही विद्यार्थ्यांना जलद शिकविलं तर ते हळू शिकतील आणि हळू शिकविले तर ते जलद शिकतील.” ते पुढे सांगतात, ” कोणताही विद्यार्थी अप्रगत नसतो. त्याला शिकविण्याची गरज नसते तर त्याच्यात असलेली क्षमता विकसित करणं हे चांगल्या शिक्षकांचं काम आहे. शिक्षक हा मुलांना शिकवीत नाही तर त्यांच्या सोबत राहून त्यांच्याकडून चांगलं काढून घेतो.”
या शाळेची आणि गुंजकर यांची कीर्ती दूरवर पोहोचलेली आहे. ही शाळा आणि सरांचं शिकवणं पाहण्यासाठी हिंगोली, वाशीम, नांदेड, परभणी, यवतमाळ, बीड या जिल्ह्यातील सुमारे ५००० हजार शिक्षकांनी शाळेला भेट दिली आहेत. प्रादेशिक शिक्षण सचिव पुरुषोत्तम भापकर, प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनीही भेटी दिल्या आहेत. एखादा शिक्षक समर्पित भावनेने कसं उत्तम काम करू शकतो याचं देविदास गुंजकर उदाहरण ठरोत.