१९ व्या वर्षीच स्वतःची आयटी कंपनी

हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ. तिथला अतुल कापसे. कुटुंबाची तीन एकर कोरडवाहू शेती. परिस्थिती बेताचीच. अतुलचा मोठा भाऊ कष्टानं शिक्षक झाला. शिक्षणाचं महत्त्व त्यानं अतुलवर बिंबवलं. अतुलचं शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतलं. कॉम्प्युटरची खूप आवड . मात्र 12 वी पर्यंत कॉम्पुटर फारसा हाताळायलाही मिळाला नव्हता. औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात बी.एस्सी. आय. टी. ला प्रवेश घेतल्यानंतर ओळख झाली वेदांत जहागिरदार, आकाश पाथरकर, सोनीक जाधव आणि सागर महेर या मित्रांशी.

माहिती तंत्रज्ञानाविषयी असलेल्या समान आवडीतूनच स्वप्न जन्माला आलं. मित्रांच्या लॅपटॉपवरून भरपूर शिकता आलं. कॉलेजमध्ये वेबसाईट करण्याचं शिकता शिकता कळत गेलं की औरंगाबादमध्ये व्यवसायिकांचं प्रमाण तर बरंच आहे पण त्यांच्या वेबसाईट बनवणारे पुण्या-मुंबईचे. त्यांना स्थानिक पातळीवर वेबसाईट तयार करून देण्याचा विचार घोळू लागला.
त्याच सुमाराला खालसा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची वेबसाईट करण्याचं काम मिळालं. या पहिल्या कामातून मिळालेल्या पैशाच्या आधारे दुसऱ्या वर्षाला असतानाच या पाच मित्रांनी मिळून सुरू केली कोडींग व्हिजन्स इन्फोटेक ही आय.टी. कंपनी. भांडवल फक्त पाच लॅपटॉप आणि अफाट मेहनत करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी. कॉलेज सुटल्यानंतर एका खोलीत कामाला सुरुवात व्हायची.अवघ्या चार वर्षात कंपनीनं ३७० वेबसाईट, १२० कंपन्यांचं सॉफ्टवेअर्स आणि २० अँड्राईड अॅप्स तयार केले. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल आहे ३० लाख रुपये. राज्यातली विविध सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती ,शाळा आणि परदेशी कंपन्यांसाठीही काम चालतं . परदेशी कंपन्या प्रामुख्यानं स्पेन, दुबई, कॅनडा, पेरू, सेंट फ्रांसीस्को इथल्या. आता औरंगाबादसह पुण्यातही कंपनीचं सुसज्ज कार्यालय आहे. या ठिकाणी १६ जणांना रोजगार दिला आहे, सोबतच सिंपलीसीटी क्रिएशन टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीशीही करार. इथं ४० जण काम करतात. जीएसटी लागू होताच या मित्रांनी सीएंसोबत चर्चा करून जीएसटी बिलिंगचे सॉफ्टवेअर तयार केलं. त्याला कंपन्यांसह व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


अतुल आणि मित्रांनी २०१५ साली औरंगाबादला स्वतःची प्रशिक्षण संस्थाही सुरू केली. यातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. अतुल आणि मित्रांना महाविद्यालयं , विद्यापीठांमधून तज्ज्ञ म्हणून बोलावलं जातं. अतुल आणि मित्रांनी सध्या एम. एस्सी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आहे. कंपनीचा अधिकाधिक विस्तार करून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे.