गुंडेवाडीच्या “पॅड वुमन “अनन्या भालके

जालना जिल्ह्यातलं गुंडेवाडी. जालना शहरापासून 10-12 किलोमीटरवरचं गाव. मराठवाड्यातली पहिली ग्रामपंचायत इथलीच. लोकसंख्या 1750. त्यात 820 महिला. ग्रामसेविका अनन्या भालके नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या रहेदर ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम होता सॅनिटरी नॅपकिन्स ऑटोमॅटिक मशिनच्या उद्घाटनाचा. मशिनचं महत्त्व लक्षात आलं. आपल्या ग्रामपंचायतीतही हा उपक्रम राबवण्याचं कार्यक्रमातच मनाशी पक्कं झालं. 

सरपंच पंचफुला गजर यांनीही ताबडतोब होकार दिला. गावातल्या मुलींनी, महिलांनी स्वागत केलं. पुरुषांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीनं ठराव केला. नाशिकमधल्या कंपनीला मशीनची ऑर्डर देण्यात आली. साधारण दीड महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात मशिन कार्यान्वित करण्यात आलं. कार्यक्रमाला अभिनेत्री निशिगंधा वाड, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती. लज्जा हा स्त्रीचा अलंकार मानला जातो, मात्र आरोग्याच्या बाबतीत तो आपला शत्रू ठरत असल्याचं निशिगंधा ताई म्हणाल्या. स्वच्छता हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. स्वतः च्या, लेकीच्या, वैयक्तिक स्वछतेसाठी, आरोग्यासाठी कानकोंडे होऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.या मशीनचा गावातल्या महिलांना उपयोग होत आहे. एक वेळी 86 मशीन त्यात ठेवता येतात. 5 रुपयांमध्ये 2 नॅपकिन्स मशिनद्वारे मिळतात.