दुष्काळग्रस्त मुलांची भागवली तहान-भूक

लातूर जिल्ह्यात दुष्काळात पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हाने सर्वांचीच होरपळ होत आहे. या दुष्काळाने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांचे तर बालपणच हरवले आहे. ग्रामीण भागात विशेषत: बंजारा तांड्यांवरील मुलांची तर अधिकच दयनीय अवस्था आहे.
तांड्यांवर शासनामार्फत चालविले जाणारे हंगामी वसतीगृह बंद केल्यामुळे आणि दुष्काळात कुटुंबाला जगवायचे कसे, या चिंतेने माय-बापासह निम्मी कुटुंबे मजुरीसाठी मुंबई, पुण्यात गेल्याने या मुलांना सकस जेवणही मिळत नाही. अशा परिस्थितीत अंगभर कपडे नसलेल्या, बोडक्या डोक्याने कळशी, हंडा व घागरी घेऊन पाण्यासाठी उन्हातान्हात पळापळ करताना ही मुले दिसतात. 

फोटोतील दृश्य आहे रेणापूर आणि चाकूर तालुक्यातीलबंजारा तांड्यांवरचे. लहान मुलांच्या प्रश्नावर देशपातळीवर काम करणारी मुंबई येथील क्राय संस्था आणि बालहक्क, महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या
पानगाव येथील कलापंढरी या सामाजिक संस्थेची नजर पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करणाऱ्या लहान मुलांवर पडली. तेव्हा त्यांना वाटले की, आपण या मुलांसाठी, त्यांचे बालपण सावरण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.
कलापंढरी संस्थेचे बी.पी. सूर्यवंशी व क्रायचे कुमार निलेंदू, निर्मल परमार यांनी रेणापूर आणि चाकूर तालुक्यातील प्रत्येकी पाच तांड्यांवरील
लहान मुलांसाठी मोफत शुद्ध पिण्याचे पाणी आणि दररोज एकवेळचे सकस जेवण (वरण,भात, भाजी आणि चपाती ) देण्याचा उपक्रम १३ मे पासून सुरू केला. तो अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमातून रेणापूर तालुक्यातील बिटरगाव तांडा, सेवानगर तांडा, दामोदर तांडा, खणी तांडा, गरसुळी तांडा अशा पाच
तांड्यांवरील एकूण २९० मुले आणि चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा, गणेशनगर तांडा, फतरूनाईक तांडा, शंकरनगर तांडा, बोकनगाव तांड्यांवरील एकूण ४१८ बालकांना मोफत जेवण आणि मोफत शुद्ध पाण्याचे जार दररोज दिले जात आहेत. ज्या तांड्यावर जेवण दिले जाते, तिथे पाच लोकांची कमिटी नेमून सर्व व्यवस्था पाहिली जाते. जेवण बनविण्यासाठी त्या त्या तांड्यावरीलच दोन महिलांची नियुक्ती केली आहे.

या कामासाठी समन्वयिका सविता कुलकर्णी त्यांचे सहकारी गौतम दुरेवाले, रामभाऊ उफाडे आणि क्राय संस्थेचे कार्यकर्ते योगदान देत आहेत. कलापंढरी संस्था गेल्या १५ वर्षांपासून क्रायसोबत काम करीत आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यात ही संस्था बालहक्क, महिलांच्या प्रश्नांवर काम करीत आहे. त्याअंतर्गत बालगट, किशोरी गटाच्या माध्यमातून बाल संवाद, चर्चा, वस्तीशाळा, मुलांमध्ये जागृती, संरक्षणासह विविध विषयावर काम करीत आहे. या शिवाय पाणलोट क्षेत्रासंबंधीचे प्रशिक्षण, तसेच बालहक्क अभियानाचे कामही ही संस्था करीत आहे. लोकांचे स्थलांतर थांबावे यासाठी, आपल्या गावीच रोजगार कसा मिळवू शकतो, स्थलांतराचे धोके काय आहेत, याबद्दलही जाणीव जागृती केली जाते.
सामाजिक बांधिलकीतून आणि बंजारा तांड्यांवरील मुलांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या दोन सामाजिक संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. यातून या मुलांचे बालपण
जोपासण्यास मदत होत आहे.