केल्याने मार्केटिंग…

पॉम..पॉम…पॉम… हॉर्नचा आवाज येतो. घरा-घरातील स्त्री-पुरूष ताजी भाजी खरेदी करण्यासाठी गडबडीने घराबाहेर येतात. चवळी, गवार, वांगी, टमॉटो, भेंडी, कोथींबीर अशी ताजी, स्वच्छ भाजी आणणाऱ्या गोविंद पांडुरंग गणगे यांच्या सायकलभोवती क्षणात गर्दी होते. आणि पाहता पाहता सगळी भाजी संपून जाते. 

नांदेड शहराच्या जवळच वसलेलं सायाळ गाव. येथील गोविंद पांडूरंग गणगे वीस वर्षापासून शेती आणि भाजीविक्रीचा व्यवसाय करत आहेत. सुरुवात झाली ती केवळ दीड एकर जमिनीतून. तुटपुंज्या उत्पन्नावर गोविंदरावांचे आई-वेडील, भाऊ, पत्नी, मुलं असं आठ-दहाजणांचं कुटुंब जगत होतं. गोविंदराव थोरले, त्यामुळे कुटुंबाला हालाखीतून बाहेर काढण्याची त्यांची तळमळ. पण दीड एकर शेतीतून किती आणि काय होणार? एकदा त्यांचे मामा हैद्राबादला निघाले होते. सोबत गोविंदालाही घेतलं. आंध्रप्रदेशच्या राजधानीत जायचा अनुभव गोविंदासाठी नवाच ठरला. मामाचं काम चालू राहिलं आणि सोबत महानगरातील लोकांच्या हालचाली, उद्योग-धंदा गोविंदाला पाहायला मिळाला. एका ठिकाणी काही लोक सायकलवर टोपलीतून भाजी विकताना दिसले. गोविंदाला कळलं की, ते शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतातील भाजी ते सायकलवर आणून विकत आहेत. यात त्यांना चांगला फायदाही होतो. ही कल्पनाच गोविंदाला मनापासून भावली. आपणही आपल्या दीड एकरात भाजी लावायची आणि ती नांदेडला जाऊन विकायची, हे तिथंच ठरलं. घरीही सगळ्यांनी कल्पना उचलून धरली. सगळं घर झटून कामाला लागलं. 

हा काळ होता 20 वर्षापूर्वीचा. लोक तेव्हा आठवडी बाजारातून भाजी खरेदी करत. नांदेडची तेव्हाची लोकसंख्याही तशी कमीच. पण शहर वाढू लागलं होतं. मोठ्या कुटुंबांची संख्या कमी होऊन ‘हम दो, हमारे दो’ संस्कृती नांदेड शहरात उदयास येत होती. नोकरदारांना बाजारहाटासाठी सवड मिळत नव्हती. त्याचवेळी गोविंदने नवी कोरी सायकल खरेदी केली. त्यावर टोपली ठेवण्यासाठी कॅरिअर बसवलं. शेतातल्या ताज्या भाज्या भरल्या आणि गल्लीतून भाजी विक्रीस सुरूवात केली. सायकलवर भाजी ही कल्पना नांदेडवासीयांसाठी नवीनच. त्यामुळे लोक कुतुहलाने पाहत. पण त्याची रोज ताजी, स्वच्छ भाजी पाहतापाहता गृहिणींमध्ये लोकप्रिय झाली. 


भाजीविक्रीच्या कमाईतून गोविंदने आणखी दीड एकर जमीन घेतली. घर बांधलं. गाडी घेतली. त्यांचा मोठा मुलगा शुभमं पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे. तर धाकटा वैभव बारावीला आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्चदेखील ते शेती आणि भाजीच्या व्यवसायावर समर्थपणे पेलत आहेत.
गोविंद गणगे म्हणाले, “मी पहाटे चार वाजता कामाला सुरुवात करतो. एक एकरात सिझनप्रमाणे भाज्या लावतो. देखभालीचं काम आई-वडिल, पत्नी, भाऊ सांभाळतात. भाजी तोडण्यासाठी दोन बाया 100 रूपये रोजाने आहेत. पहाटे सर्व भाजीपाला घेऊन नांदेडला येतो. जास्तीचा भाजीपाला बिटावर विकून टाकतो. आता माझे स्वतःचे काही ग्राहक आहेत. या भाजीपाला विक्रीत मला खर्च वजा जाता रोज 700 ते 800 रूपये इतका फायदा मिळतो. तसंच उर्वरित दोन एकरात गहु, ऊस, केळी यासारख्या पिकांचं चांगलं उत्पादन मिळतं. वर्षाकाठी सात-आठ लाखाची उलाढाल होते. तर तीन-चार लाख रूपयांचा फायदा मिळतो.”
शेती व्यवसायाला जोड म्हणून गणगे यांनी भाजी विक्री सुरु केली. कल्पकता, जिद्द, चिकाटी, मेहनतीमुळे या सामान्य शेतकर्‍याचं सगळं जीवन बदलून गेलं. एक साधा शेतकरी मार्केटींगची कौशल्यं शिकून प्रगती करतो, हे उत्तम उदाहरण ठरावं.