तुम्ही आवाज द्या;भाऊ बनून पाठीशी राहू’

माळेगाव इंजिनीअरिंग कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनीदिला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधारउस्मानाबाद, दि.20: पावसाअभावी हातची गेलेली पीके बघून धीर खचलेल्या काही शेतकऱ्यांनी परिस्थितीपुढे शरणागत होऊन आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग निवडला. मात्र, त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊ नये, यासाठी दातृत्वाचे हजारो हात पुढे आले. परिस्थितीला घाबरायचं नाही, तर त्याला सामोरं जात लढायचं , असा मायेचा आधार देत त्यांनी या कुटुंबियांना दिलासा दिला. त्याचबरोबर, आत्महत्येसारखा मर्ग स्वीकारु नका, असा संदेशही त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरीराजाला दिला. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थी आणि मित्र परिवाराने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सांसारिक कामासाठी आणि उदरनिर्वाहासाठी मदत करुन या कुटुंबियांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा कायमस्वरुपी मार्ग उपलब्ध करुन दिला. ‘तुम्ही आवाज द्या, तुमचे भाऊ बनून पाठीशी राहू’ असा विश्वास या मित्रांनी या कुटुंबियांना दिला.येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सामाजिक संवेदना जागविणारा कार्यक्रम झाला. सतत चार वर्षे टंचाई अनुभवणाऱ्या उस्मानाबादकरांसाठी ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासनासोबत सारा समाज तुमच्या पाठीशी आहे’ असा अनुभव देणारा हा कार्यक्रम ठरला. व्हॉटस् ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माळेगावच्या या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा खरोखरच सामाजिक आशयासाठी उपयोग करता येतो, याची जणू प्रचितीच दिली. उस्मानाबाद व मराठवाड्यातील बातम्या वाचून व पाहून या ग्रुपमधील मित्रांची सामाजिक संवेदना जागली आणि आपणही काहीतरी केले पाहिजे, असा विचार करत त्यांनी जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे मदत करुन त्यांना नवी उभारी घेण्यासाठी प्रेरणाच दिली आणि हिंमत न हारण्याचा संदेशही दिला.

कुणाला शेळ्या तर कुणाला कुक्कुटपक्षी, कुणाला पिठाची गिरणी तर कुणाला चक्क संगणक अशी त्या कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी मदत केली. नितीन करडेकर, संजय सावंत, आनंद गादेकर, विजय जमदाडे, सुधीर रणनवरे, किशोर बोराटे, ईश्वर दौंडकर, विजय तावरे, संपत खोमणे, नरेंद्र देशमुख, अजित वग्गा, धनराज काळभोर, संदीप कुंजीर आणिप्रवीण घोरपडे अशी या सहकाऱ्यांची नावे. कॉलेजमधून उत्तीर्ण होऊन प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत. मात्र, व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून एकत्र येत आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीचं भान राखत या सगळ्यांनीच सामाजिक बांधीलकी अशी अनोख्या पद्धतीने जपली त्याचबरोबर, आणखी काही मदत लागली तर सांगा, असा आधाराचा शब्दही दिला. त्यांच्या या शब्दामुळे कुटुंबातील महिलेच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू त्यांच्याबद्दलची जणू कृतज्ञताच व्यक्त करत होता. केवळ आत्महत्याग्रस्त कुटुंबियच नाहीत तर उद्याचं भविष्य घडविण्यासाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतीअभावी अडचण येतेय, हे जाणून या मित्रांनी शासकीय तंत्रनिकेतनातील 12 विद्यार्थ्यांनाही प्रत्येकी 3 हजार याप्रमाणे पुस्तकेआणि शैक्षणिक खर्चासाठी मदत दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत या मित्रांनी या मदतीचे वाटप या कुटुंबियांना केले.यावेळी बोलताना श्री. तांबे यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करताना त्यांनी दाखविलेले दातृत्व खूप मोठे असल्याचे आवर्जून सांगितले. या 14 कुटुंबियांना दिलेली ही मदत त्यांना कायमस्वरुपी आधार ठरेल आणि त्यांना आर्थिक बळ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री. करडेकर यांनी प्रास्ताविकात, या मदतीमागची भूमिका आणि भावना व्यक्त केली. सहज गप्पांतून उलगडत गेलेले सामाजिक बांधीलकीचे पदर आणि चीन, जपान आणि अमेरिकेतही असणाऱ्या मित्रांनी मदतीद्वारे नोंदविलेला सहभाग हा या कुटुंबियांना आधार वाटेल, असा आहे. आमची मदत पुरेसी नसली तरी ही सेवा रुजू करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन श्री. करडेकर यांनी केले.यावेळी उपस्थितांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीनेही एका महिलेने मनोगत व्यक्त केले. या मदतीमुळे भक्कम आधार मिळाल्याचे सांगत यापुढे अविचारा थारा नाही, असा विश्वास तिने दिला. एका विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले. तुमच्या मदतीमुळे सक्षम होण्यास मदत होईल. जेव्हा मोठा होईल, तेव्हाही तुमच्यासारखाच समाजाचा आधार बनेन, अशी भावना त्याने व्यक्त केली तेव्हा सभागृहही हेलावले.या माळेगाव येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. रवींद्र लगदिवे, विनय सारंग, नागनाथ कुबेर, सुप्रिया शेटे यांनी मदत केली. याशिवाय, उस्मानाबादचे तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव,
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, कृषी मंडळ अधिकारी श्री. सस्ते आदींनी मदत केली.