दुष्काळाची दाहकता तरीही रानशिवारात ‘वेळा अमावास्येचा’ उत्साह

शनिवारचा दिवस. मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या. रस्त्यावर शुकशुकाट, बाजारपेठा बंद, शहरात अघोषित संचारबंदी. शहरातले आबालवृद्ध सकाळीच शेतावर रवाना झाले. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना शेतकऱ्यांकडून आग्रहाचं निमंत्रण. निमित्त होतं ‘वेळा अमावास्येचं’. मराठवाड्यात, विशेषतः लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या ‘वेळा अमावस्या’ म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे.


रानशिवारं गर्दीनं फुलून गेली होती. कुणी कारमधून, कुणी हौसेनं बैलगाडीतून शेताच्या बांधावरून फेरफटका मारत होते. सध्या मोजक्या भागातच रब्बीची पिकं डोलत आहेत,दुष्काळाच्या झळामुळे शेतकऱ्यांचे चेहरे कळवंडले आहेत, पण वेळा अमावस्येला काळ्या आईची ओटी भरून पूजा करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि नव्या आशाआकांक्षेची लकेर दिसत होती.या दिवशी शहरी, ग्रामीण भागातलं प्रत्येक कुटुंब वनभोजनाचा आस्वाद घेतं.

आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य. बाजरीचे उंडे,ताकापासून बनवलेले आंबील, हिरव्या मिरचीचा ठेचा,वांग्याचे भरीत,विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांची एकत्रित बनविलेली स्वादिष्ट भाजी,बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी. बच्चे कंपनीसाठी खास बोरं, हरभऱ्याचे डहाळे, वाटाण्याच्या शेंगा यांची मेजवानी.
आंबेजवळगे इथले शेतकरी बाळासाहेब देशमुख यांच्याकडून या परंपरेविषयी माहिती घेतली. ‘’पूर्वापार चालत आलेली ही परंपरा. काळ्या आईची पूजा करून तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न.

शेतात पाच पांडव किंवा पंचमहाभूतं म्हणून पाच दगड मांडले जातात. त्यांना चुन्यानं रंगवून सहकुटुंब पूजा करतात. त्यानंतर एकत्र बसून वनभोजनाचा आस्वाद. परंपरा का , कधी सुरू झाली माहीत नाही, पण मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र यायला चांगलं निमित्त मिळतं. ‘’ काही बुजुर्ग मंडळींच्या मते ही मूळची कर्नाटकची परंपरा. लगतचे जिल्हे असल्यानं लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ती रूढ झाली. या उत्सवाच्या निमित्तानं शहरी नागरिकांना एक दिवस ग्रामीण जीवनाचा आनंद लुटता येतो. मुलांना शेतीची तोंडओळख होते. कायम दुर्लक्षित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे खरंतर उत्सवाच्या निमित्तानं लक्ष वेधलं जाऊ शकतं.