रॉबिन हूड आर्मीची गोष्ट

झोपडपट्टी, पालांवरची मुले भौतिक सुखापासून, शहरातल्या सुखैनेव जीवनापासून कोसो दूर असतात. नशिबी आलेल्या दारिद्र्यात जगताना त्यांना शहरी जीवनाचे नेहमीच कुतूहल असते. मूलभूत गरजाही भागत नसलेल्या या वर्गाला आलिशान गाड्या, हॉटेलचा अनुभव मिळणे दुर्मिळच. पण, रॉबिन हूड आर्मीने ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली. अंधाऱ्या झोपडीत वास्तव्य करणाऱ्या अशा मुला-मुलींना आलिशान गाड्यातून सफर घडवलीच. शिवाय चांगल्या प्रतीच्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद चाखण्याची संधीही दिली. 

उस्मानाबाद शहरातली ही रॉबिन हूड आर्मी. समाजातील गरीब भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करण्यासाठी पुढाकार घेणारी ही जागतिक स्तरावरील संघटना. होतकरू, सामाजिक जाणिवा असलेले तरुण आठवड्यातून एक वेळ गरीब व्यक्तींना जमेल तेवढं अन्नदान करतात. संघटनेला अध्यक्ष वा पदाधिकारी असत नाही. उस्मानाबाद शहरात या संघटनेने काम सुरू केलं आहे.


शहरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सांजा चौकाजवळ कुडमुडे जोशी समाजाची वस्ती आहे. पालावर वास्तव्य करणाऱ्या या वस्तीतील २० मुला-मुलींची या आर्मीने निवड केली. त्यांना रविवारी बीएमडब्ल्यू, ऑडी, फॉर्च्युनर अशा अलिशान गाड्यांमधून फिरवून आणलं. त्यांना बार्शी रोडवरील निसर्गरम्य हातलादेवी डोंगरावर नेलं. निसर्गरम्य परिसर, मनमोहक फुलं, ससे-मोरांचा सहवास अनुभवल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाची हिरवळ पसरली. दोन-तीन तास परिसरात फिरुन झाल्यावर हातलादेवीच्या सभामंडपात या मुलांनी आपल्या अंगातील विविध सुप्त गुण दाखवून आम्हीही कमी नाही हे दाखवून दिलं. काहींनी डान्स केला तर काहींनी गाणी म्हटली. नंतर हातलादेवीवरून नामांकित अॅपल हॉटेलकडे मोटारी वळल्या. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मुलांचं स्वागत केलं. त्यानंतर मुलांनी हॉटेलमधील पंचपक्वान्नाचा यथेच्छ आस्वाद घेतला. वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळाल्याचा मनस्वी आनंद मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. केवळ स्वप्नात आणि कल्पनेत पाहिलेल्या गोष्टी काही काळ का होईना रॉबिन हूड आर्मीने सत्यात उतरवल्या.
या उपक्रमासाठी अॅड विलास चौरे यांनी आर्थिक मदत केली तर राहुल गवळी, किरण गुरव यांनी स्वत:च्या गाड्या दिल्या. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रॉबिन हूड आर्मीच्या अक्षय माने, अॅड. मिलिंद कुलकर्णी, प्रा.मनोज डोलारे, सलमान शेख, सुरज मस्के, अक्षय सराफ, आकाश घंटे, आनंद जाधव, रणजीत माळाळे, आमीन काझी, नवज्योत शिंगाडे, नितीन देशमुख, अॅड.अविनाश गरड, अभिजीत लष्करे,रोहन लष्करे, रोहित लष्करे या रॉबिन्सनी परिश्रम घेतले.