गंगाखेडचे गाडगेबाबा

अंगात जाकीट, हातात माईक आणि स्वच्छता वा व्यसनमुक्तीचा संदेश देणारा एखादा फलक, खांद्याला छोटे लाऊडस्पिकर अडकवलेली एक व्यक्ती गंगाखेड (जि परभणी) शहरात, तालुक्यातल्या गावागावात पायी फिरत असते. हे, आधुनिक गाडगेबाबा म्हणजेच विनायक पवार गुरूजी ! शहरातल्या श्री व्यंकटेश विद्यालयात 19 वर्षांपासून कार्यरत असलेले कलाशिक्षक. आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी 2004 पासून व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पदरमोड करत जनजागृती मोहीम हाती घेतली. उद्देश एकच. लोकप्रबोधन. शाळेची वेळ संपली की, ते हे काम सुरू करतात. सुरूवातीला अक्षरशः वेड्यात काढल्यानंतर आता त्यांच्या कार्याची गंभीर दखल नागरिकांनी घेतली आहे.


सार्वजनिक ठिकाणी शौचास बसू नका, घरी शौचालय बांधा, मद्यपान करू नका, महिलांवर अन्याय करू नका, त्यांचा मान ठेवा, जातीभेद करू नका, रक्तदान- नेत्रदान व देहदान करा, पशूहत्या करू नका, विजेची बचत करा व वेळेवर वीजभरणा करा अशाप्रकारचे अनेक संदेश देणार्‍या पवार गुरूजींनी ओळख स्वच्छतादूत म्हणून झाली आहे. शहर आणि तालुक्यात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी, महापुरुषांच्या जयंतीत, यात्रेत, लग्‍नकार्यात त्यांचा हा प्रबोधनाचा अखंड जागर सुरू असतो. त्याशिवाय प्रशासकीय आणि शालेय जनजागृती रॅलीत मानपानाची अपेक्षा न ठेवता त्यांचं स्वतःहून हजर राहाणंहीे आता गंगाखेडकरांच्या सवयीचं झालं आहे. विनायक पवार गुरूजींनी आतापर्यंत, परभणी जिल्हयातील 80 गावांमध्ये जाऊन प्रबोधन केलं आहे.
तालुक्यातलं मुळी हे त्यांचे जन्मगाव. ते हागणदारीमुक्त करण्यात ग्रामपंचायतीसह पवार गुरूजींचा मोठा वाटा आहे. गुरुजींच्या प्रयत्नांमुळे गंगाखेड आणि सोनपेठ तालुक्यातल्या पडेगाव, वडगाव, निळा, मुळी, वंदन, झोला-पिंप्री, आवलगाव या गावांमध्ये स्वछता सुधारणांना सुरुवात झाली.
पवार गुरूजींना श्री व्यंकटेश विद्यालय, प्रबुद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान व जिजाऊ सावित्री जन्मोत्सव मंडळांनी गौरवलं आहे. कुठल्याही शासकीय पुरस्कारासाठी प्रस्ताव न देणारा हा ध्येयवेडा शिक्षक समाजसुधारणेचं काम करतो आहे.
समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य महापुरुषांनी केले असले, तरी पुढील उत्तरदायित्व आपलं आहे. महापुरुषांचा विचार केवळ वाचून, ऐकून किंवा लिहून जमणार नाही तर तो आचरणात आणणं, त्याची सुरूवात स्वत:पासून करणं गरजेचं आहे. मी तोच प्रयत्न करत आहे, असं पवार गुरूजी म्हणतात.