शांती नॉर्मन. राहायला जर्मनीत. जन्म १९७४ चा,परभणीतल्या सरकारी दवाखान्यात. जन्मदात्रीनं बेवारस सोडून दिलं. पुण्यातल्या अनाथालयानं संगोपन केलं आणि एका जर्मन दाम्पत्याकडे दत्तक दिलं. आयुष्य मार्गी लागलं.
आपल्या जन्माचा शोध घेण्याची इच्छा शांतीला होती. पुण्याच्या अनाथालयातून माहिती घेऊन ती परभणीत पोहोचली. इथं भेट झाली विकल्प इंडियाचे संचालक सारंग साळवी आणि समन्वयक लता साळवी यांच्याशी. लता विकल्प इंडियाच्या माध्यमातून मुलं, महिला, वंचितांसाठी काम करणाऱ्या. गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या. त्यांच्याबरोबर काम करण्याची विशेषतः अनाथ मुलामुलींसाठी काम करण्याची इच्छा शांतीनं व्यक्त केली. यातून आकाराला आलं ‘ प्रोजेक्ट शांती-जर्मनी’.

तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या हस्ते ८ मार्च २०१४ ला प्रकल्पाचं उदघाटन झालं. प्रकल्पासाठी लतांनी स्वतः ची एक एकर जमीन दिली.
शांती जर्मनीत खासगी नोकरीबरोबरच नृत्य-गाण्याचे शो करतात. यातून आणि जर्मनीतल्या नागरिकांकडून मिळणारी देणगीचीे रक्कम परभणीला पाठवतात. यातून लता यांनी २०० महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला. शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या गरजू १५० महिलांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत केली. १७ युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली. शाळाबाह्यप्रवण १२० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. ८० मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन शहरात ३ ठिकाणी त्यांच्यासाठी नियमित मार्गदर्शन वर्गाची सोय केली.
कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता हे काम सुरू आहे.