भांडाभांडीत कधी एकजण दुसर्या व्यक्तीला रागारागाने म्हणतो, तू माझ्यासाठी मेलास. किंवा मर जा. पुन्हा तोंड दाखवू नकोस. आणि समजा एखाद्याला खरंच नेहमी, जिवंतपणीच, अगदी रोजच स्मशानात जावं लागत असेल, तर? पण रोजच स्मशानात कुणाला कशासाठी जावं लागत असेल?

ही गोष्ट मुंबईतली. कांदिवली पूर्व इथल्या चव्हाण वाडी, वडारपाडा, हनुमान नगर या वस्त्यांची. इथल्या रहिवाशांना, जास्त करून स्त्रियांना रोज प्रातर्विधीसाठी जवळच्या स्मशानात जावं लागायचं. स्मशान म्हटलं की दुःख आणि भय. अशा ठिकाणी रोजच्या रोज नाईलाजाने जावं लागणं किती क्लेशकारक! या मुंबई शहरात लोकांना असंच काय काय भोगावं लागतं, कशाकशाला सामोरं जावं लागतं.
६०० ते ७०० लोकवस्तीचा हा विभाग. १९७२ पासून हे लोक इथे राहात आहेत. तेव्हापासूनच शौचालय व्यवस्था नव्हती. बारा वर्षांपूर्वी इथे हिंदू स्मशानभूमी बांधल्यापासून महिला स्मशानभूमीतल्या शौचालयांचा वापर करु लागल्या. त्या आधी या लोकांना उघड्यावरच जावं लागायचं. कार्यकर्ते सुनिल शिंदे यांनी सांगितलं की उघड्यावर गेलेले रहीवासी प्रभाकर आचार्य यांना साप चावला. ते जखमी झाले. वडारपाड्याच्या स्त्रियांकडून समजलं की त्यांना रात्री-अपरात्री नैसर्गिक विधींसाठी खूप काही सोसावं लागायचं. त्या म्हणाल्या, “काही वर्षं तर आम्ही चार फूट उंच भिंत पार करून शौचालयासाठी जात असू. घरात आलेल्या पाहुण्यांनाही शौचालय, अंघोळीसाठी स्मशानात नेणं, याहून लाजीरवाणी गोष्ट कोणती?

अनेक लोकप्रतिनिधी आले, गेले पण लोकांसाठी साध्या शौचलयाची सोय नव्हती. मात्र, २१ नोव्हेंबरला, या रहिवाशांना त्यांच्या हक्काचं टॉयलेट मिळालं. कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदारनिधीतून ही सुविधा उभी राहिली.

अतुल भातखळकर म्हणाले, “ही समस्या घेऊन लोक आले, तेव्हा मनाला चटका बसला. वस्तीतल्या महिला आणि लहान मुलांचा विचार करून मन खंतावलं. कोणत्याही परिस्थितीत इथे टॉयलेट बांधायचं, लोकांची या त्रासातून सुटका करायची असा निश्चय केला. कार्यकर्ते कामाला लागले. आमदारनिधीतून आम्ही इथे टॉयलेट उभारलं. लोकांची रोजची स्मशानवारी आता संपली. आणखी एका चांगल्या कामाचं पुष्प जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण केल्याची भावना माझ्या मनात आहे.”
इथं राहाणारे लोक देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेले. यातले ६० टक्के रिक्षाचालक आहेत. काहीजण वाशी-ठाणे खदन कामात मजुरी करणारे, ट्रकचालक आहेत. “१९७२ पासून आमच्या विभागात अनेक पक्ष आले, गेले. पण आमचा शौचालयाचा प्रश्न कोणी विचारात घेतला नाही. आमदार अतुल भातखळकर यांनी आमची निकड समजून आमच्या वस्तीकरीता सार्वजनिक शौचालय बांधून दिलं”, रहिवासी समाधानाने सांगतात.