प्रथमेशची राॅकेटझेप

प्रथमेशच्या अद्वितीय यशाची बातमी मिळताचक्षणी त्याला भेटण्याची उत्सुकता वाटली. क्षणात फोन करून मी त्याच्याशी भेट ठरवली. मीही काल दुपारी तीन वाजता पवईत पोचले. मला नेण्यासाठी स्वत: प्रथमेशच आला होता. अरूंद गल्ल्यांतून वाट काढत, फक्त एकच व्यक्ती कशीबशी उभी राहू शकते, अशा ठिकाणी पोचलो. इथेच त्याच्या छोट्या घरात एक पलंग आणि त्याच्यासमोर किचन. प्रलंगाला लागूनच एक खिडकी आणि खिडकीत प्रथमेशची अभ्यासाची पुस्तकं. गेली पंचवीस वर्ष इथे रहाणा-या प्रथमेशने अवकाशालालाच गवसणी घातली आहे. त्याची, भारत सरकारच्या इस्रो (Indian space research organisation) या अवकाशसंशोधन संस्थेत शास्त्रज्ञ या पदासाठी निवड झाली आहे. या पदासाठी मुंबईतून निवडला गेलेला तो पहिला विद्यार्थी. इस्रोमध्ये प्रवेश करून त्याने गरूडझेपच नव्हे, चक्क रॉकेटझेप घेतली आहे.

प्रथमेशचा इस्रोपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रथमेशचे वडील सोमा हिरवे हे मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक, आई गृहिणी, लहान भाऊ बारावीत आहे. प्रथमेशचं शालेय शिक्षण पवईच्या मिलिंद विद्यालयात झालं. त्याला दहावीत ७७.५३ टक्के गुण मिळलले. वडिलांनी कलचाचणी करवून घेतली तेव्हा तज्ज्ञांनी त्याला कलाशाखेकडे जाण्याचं सुचवलं. प्रथमेशने मात्र इंजिनिअर बनण्याचाच दृढ निश्चय केला होता. विलेपार्ल्यातल्या भगुभाई मफतलाल पाॅलिटेक्निकमध्ये २००७ मध्ये त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. 

दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे सुरूवातीला त्याला इंजिनिअरिंगचे इंग्रजी भाषेतलेले धडे समजणं कठीण जायचं. मात्र तिथल्या प्राध्यापकांनी प्रथमेशला इंग्रजी वाचनाची आवड लावून त्याची ही अडचण दूर केली. ८४ टक्के मिळवून महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीतून तो दुसरा आला.


एल अँड टी स्वीच गिअर अाणि टाटा पाॅवर या कंपन्यांमध्ये त्याने वर्षभर इंटर्नशिप केली. एल अँड टीमधील अन्वेष दाससरांनी डिप्लाेमावर अवलंबून न राहता पुढे शिकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नवी मुंबईच्या श्रीमती इंदिरा गांधी काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंगमधून २०१४ मध्ये पदवी संपादन केली. पदवीत मुंबई विद्यापीठातून २५व्या रँकने उत्तीर्ण झाला.
पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशपरिक्षांची तयारी करण्यासाठी हैदराबादच्या ‘एसीई इंजिनिअरिंग अकॅडमी’ या संस्थेत प्रवेश घेतला. त्याचबरोबर देशपातळीवर घेतलेल्या जाणाऱ्या विविध स्पर्धापरिक्षांची तयारीही सुरू केली. पण त्याला इस्रोबद्दल जास्त आकर्षण असल्याने त्यानेे याच परिक्षेवर जास्त भर दिला.
पहिल्याच प्रयत्नात, इस्रोच्या प्रवेशपरीक्षेत संपूर्ण भारतातून दुसरा येऊनही केवळ एकच पद उपलब्ध असल्याने त्याची निवड हाेऊ शकली नाही. मात्र जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत त्याने या वर्षीच्या मे महिन्यात पुन्हा परीक्षा दिली. यावेळी ९ जागांसाठी १६ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. नोव्हेंबरमध्ये परीक्षेचा निकाल लागला आणि त्याची इस्रोमध्ये निवड झाली. 
प्रथमेशची आई म्हणाली, “मी फार काही शिकलेली नाहीये. मला कळत नाही की माझ्या लेकराने नक्की काय यश मिळवलं. मी त्याला वेळेवर खाऊपिऊ घातलं.” त्याचे वडील म्हणाले, “तो देशातील अनेक मुलांन मध्ये पहिला आला एवढंच कळलं.”
जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता यामुळे यशाआड येणा-या सर्व अडथळ्यांवर मात करता येते, याचं लखलखीत उदाहरण म्हणजे प्रथमेश. 
प्रथमेश म्हणाला, “समस्यांपेक्षा आपलं साहस मोठं असतं. जीवनात समस्या नेहमी येतच राहणार. आपण त्यावर मात करत राहायचं.”