सविता बदलली; बोलू लागली

वडाळा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला साधारण ३ किलोमीटरवर गणेश नगर नावाची एक मोठी वस्ती आहे. मुंबईतल्या या मोठ्या वस्ती म्हणजे जणू एक नगरच! इथं असंख्य लोकं स्थायिक होतात, छोटी मोठी दुकानं असतात, कुणी मोबाईल रिपेअर करतं, काही भाजी विकतं, कुणी टॅक्सी चालवतं आणि अशाप्रकारे या विशाल शहराला विविध सेवा पुरविणारे सारेच असतात. अशा वेळेस एक प्रश्न पडतो, तो म्हणजे, इथं शिक्षणाचं वातावरण कसं निर्माण करायचं? कारण इथल्या समस्याही तितक्याच जटिल असतात. 


२००७ मध्ये जेव्हा ‘प्रथम’ने गणेश नगरचा ‘सर्व्हे’ केला. त्यात आढळलं की, इथली मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. पण त्यांना वाचण्याची गोडी लागायला हवी आणि त्यांनी शाळेत योग्य पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना पुस्तकं आणि त्यांना शिकण्यात रुची निर्माण होईल अशी सामग्री देणारा ‘लायब्ररी कार्यक्रम’ तिथं सुरु करायचं ठरलं. आणि नुकतीच बारावी झालेली सविता धानवे त्यांना भेटली. “त्या वेळेस मी कुणाशी जास्त बोलत नसे, इतकंच काय, मी हा आसपासचा परिसर देखील पूर्णपणे बघितला नव्हता”, ती सांगते. 
‘सर्व्हे’मुळे सविताचा आत्मविश्वास वाढू लागला. कारण त्यात लोकांशी प्रत्यक्ष बोलणं होत असे. तेव्हा इतकं कळलं की गणेश नगरमध्ये इंग्रजी पुस्तकांची मागणी वाढत होती आणि लोकांचा एकंदर कल हा मुलांना खाजगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पाठविण्याकडे होता. मात्र, इंग्लिश माध्यमात जाणाऱ्या बऱ्याच मुलांना शाळेत प्रगती करण्यात बरेच अडथळे येत होते. त्यामुळे सवितावर अशा मुलांना विशेष शिकवणी देण्याची जबाबदारी देण्यात आली. कुणाशी फार न बोलणारी सविता आता मुलांशी, त्यांच्या पालकांशी आणि महानगरपालिकेच्या शाळा-शिक्षकांशी बोलू लागली होती. अगदी आत्मविश्वासाने! हे काम करताना मात्र, तिला आणि प्रथमला अजून एका गोष्टीची जाणीव झाली. अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी खाजगी इंग्लिश माध्यमातील शाळांची वाट धरली होती खरी, पण सुरुवातीला मुलांना एका इंटरव्हूला सामोरं जावं लागायचं. आणि इथं इंग्लिश व्यवस्थित नसल्यामुळे बऱ्याच मुलांना इथं प्रवेश मिळत नसे. ह्या पार्श्वभूमीवर सविताला बालवाडी सुरु करण्यास सांगितलं गेलं. 
“मी बालवाडी सुरु करते आहे असं लोकांना सांगितलं तेव्हा माझ्याकडे पहिल्याच दिवशी ६० मुलं दाखल झाली! मग मला त्यांच्या दोन तुकड्या कराव्या लागल्या,” ती आनंदाने सांगते. पण ह्या बालवाडीचा मुलांना फायदा मात्र झाला. तिथं शिकणाऱ्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश मिळू लागला. कारण, आता ते इंटरव्ह्यूसाठी योग्य पद्धतीने तयार झाले होते.
सविताने २०१७ ह्या वर्षी ‘प्रथम’ मध्ये काम करायची १० वर्ष पूर्ण केली. मात्र, आता ती स्वतःची बालवाडी सुरु करणार आहे. दहा वर्षांपूर्वी कुणाशी विशेष न बोलणारी आणि आजूबाजूचा परिसरही नीट माहिती नसणारी सविता आज स्वतःची बालवाडी सुरु करणार आहे.