पालघर जिल्ह्यातल्या कल्लाळे इथला कल्पेश विलास दौडा. जन्मतःच दोन्हीही हात नाहीत. मात्र त्याचा कुठेही बाऊ नाही. शिकायची जात्याच आवड. जिद्दीनं तो अक्षरं गिरवायला शिकला. संपूर्ण लिखाण तो पायानेच करतो. पायानेच गोलंदाजी करत क्रिकेटचीही आवड त्यानं जोपासली आहे . बोईसरजवळच्या बेटेगाव इथं आदिवासी विकास प्रकल्पाची त्याची आश्रमशाळा. शाळा तीन किलोमीटरवर. जायला रस्ता नाही. दररोजची सहा किलोमीटर ये-जा.

पावसाळ्यात तर चिखल तुडवत शाळा गाठायची.घर कुडाचं. घरात आई-वडील दोन बहिणी. कमावणारे वडील एकटेच. बोईसरमधल्या कारखान्यात १२ तास ड्युटी. दारिद्र्यरेषेखालच्या यादीत त्यांचं नाव नाही. सरकारी योजना अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मात्र, परिस्थितीचा त्याच्याकडून, कुटुंबाकडून कोणताही बाऊ नाही. परिस्थितीवर मात करून कल्पेशनं यंदा दहावीच्या परीक्षेत ७५. ४० टक्के घवघवीत यश मिळवलं आहे. आता तरी त्याला त्याच्या हक्काची मदत मिळावी, असे प्रयत्न करायला हवेत.