… आणि रडणारी अदिती शिकू लागली!

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आमची बहिरामकोटक जिल्हा परिषद शाळा. आमच्या शाळेत अदिती पाटील नावाची एक मुलगी पहिलीत दाखल झाली होती तेव्हाची गोष्ट.
अदिती शाळेत बसायला तयारच नसायची. शाळेत आली की सारखी रडायची, घरी जायचा हट्ट करायची नाहीतरी कोपऱ्यात गप्प बसून राहायची. अगदी मधल्या सुट्टीतसुद्धा इतर मुलांसोबत खेळत नसे, कुणासोबत मिसळत नसे. तिच्या रडण्यामुळे आणि चिडचिड्या स्वभावामुळे इतर मुलं तिला चिडवायची, त्यामुळे अदिती जास्तच कोषात जात होती.

मला सुरूवातीला वाटलं, पहिलीत बसताना मुलं त्रास देतातच, कारण त्यांना शाळेची फारशी सवय नसते. पण हळूहळू लक्षात आलं की शाळेतली बाकीची मुलं दोन महिन्यात धूळपाटीत अक्षरे गिरवायला लागली, पण अदितीला मात्र त्यात साध्या रेघोट्याही ओढाव्या वाटायच्या नाहीत. अदिती गतिमंद आहे, हे माझ्या लक्षात आलं. तिला शाळेत टिकविण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे नाहीतर अदिती कायमची शाळेपासून दूर जाईल आणि शाळाबाह्य होईल, हे उमगलं.
अदितीला शिक्षणाची गोडी लावायची असेल तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिकवून चालणार नाही. तिच्या आवडीप्रमाणे तिला गोष्टी पुरवायला हव्यात. तिच्या गतीनं, तिच्या कलानं घ्यायला हवं हे जाणवलं. तिच्यासाठी वेगळं काय करता येईल याचा मी विचार करू लागलो. दरम्यान सातत्याने तिच्याशी संवाद, तिला प्रेमाने थोपटणं, शाळेतले रंगीत शैक्षणिक साहित्य खेळायला देणं सुरू ठेवलं. एके दिवशी असाच तिला शाळेचा अल्बम पाहायला दिला. तिला तो खूप आवडला, अदिती त्यात रमली. त्यातील व्यक्ती ओळखू लागली आणि मग मला एक युक्ती सुचली.


मी तिच्या घरातील व्यक्ती, वस्तू, प्राणी यांचे फोटो काढून त्यापासून अदितीसाठी एक पुस्तक तयार केलं. त्यामध्ये तिचे आई – वडील, आज्जी- आजोबा, भाऊ- बहीण, तिचं घर, तलाव, होडी असे फोटो चिकटवून हे अभिनव पुस्तक तिच्या समोर ठेवलं. मग त्या फोटोंच्या साहाय्याने तिला मुळाक्षरांची ओळख पटवून देऊ लागलो. अदितीला सर्वसामान्य पुस्तकांतून मुळाक्षरांची ओळख करून द्यायचं म्हटलं तर ते तिला पटलं नसतं. कारण आपल्या पुस्तकांत एक स्त्री लहान मुलाला घेऊन असते अन् त्या पुढे शब्द असतो ‘आई’. सर्वसामान्य मुलांना समजतं की ही ‘आई’ आहे. पण अदितीसाठी आई म्हणजे फक्त आणि फक्त तिचीच आई. अदितीसाठी घर म्हणजे फक्त आणि फक्त तिचं घर.
अदितीला पुस्तक खूप आवडलं कारण तिचं घर, तिचं जग आता शाळेत आलं होतं. तासनतास त्या पुस्तकातील फोटोत, त्या शब्दांत रमून जाऊ लागली. आता ती रोज शाळेत येऊ लागली, शाळेत बसू लागली. ती फोटो वरून मुळाक्षरे, शब्द ओळखू लागली. मग मी तिच्या आईच्या फोटो सोबत ‘आ’ वरून सुरू होणारे आगगाडी, आरसा, आकाश असे शब्द तिला शिकविले. त्यांची चित्रे दाखविली. मग अदिती हळूहळू धूळपाटीवर लेखनाचा सराव करू लागली. अदितीला अक्षर आणि अंकांची ओळख होऊ लागली.
माझा उद्देश सफल झाला, कारण आमची रडणारी अदिती आता शाळेत रमली आहे बरं!