शाळाबाह्य मंगेश नववीत गेला!

२०१८ मध्ये शाळेतील एका विद्यार्थिनीचे खाते काढत असताना मागील बाजून ‘जाधव सर’ अशी हाक ऐकू आली, मागे वळून पाहतो तर तो १५-१६ वर्षांचा मुलगा पुढे येत म्हणाला ‘सर मी मंग्या!’ मंग्या, म्हणताच मी चार वर्षे मागे गेलो आणि आठवला डोंगराची अवघड वाट माझ्या शाळेत दररोज जिद्दीने शाळेत येणारा विद्यार्थी- मंगेश!! आज मंगेश नववीत शिकतोय.
माझे मन भूतकाळात गेले आणि आठवला रायगड जिल्ह्यातील पालेखुर्दच्या आदिवासी पाड्यावर राहणारा मंगेश आणि त्याचा परिवार. साधारण एप्रिल २०११ ची गोष्ट असेल, मंगेशचे कुटुंब स्थलांतरित होऊन आमच्या शाळेच्या परिसरात आले. मंगेश तेव्हा साधारण ७वर्षांचा होता. खूप उनाडक्या करायचा, पण शाळेत मात्र यायचा नाही.

मात्र मंग्या शाळा सुटताना येतो आणि खिडकीतून डोकावून आमच्या कविता, गप्पा ऐकतो हे मला कळलं. मग मी शेवटचा तास खेळाचा घेऊ लागलो, आडून- आडून बघणारा मंग्या खेळायला आमच्या विद्यार्थ्यांसोबत येऊ लागला. आणि मग हळूहळू माझ्याशी बोलायला लागला. मग मी एकदा त्याला विचारले, “काय रे मंग्या? कोणत्या शाळेत होतास, कितवीला होतास?” त्याने मला कातकरी बोलीत उत्तर दिले, “गुर्जी मा शाळमा कदवा नाही गेहल, आम्ही समंदा जन धंद्यांमा हता.”(म्हणजे, मी शाळेत कधीच गेलो नाही आम्ही सर्वजण कोळसा कामासाठी स्थलांतरित होतो.)
मंग्या शाळाबाह्य होता खरा, पण त्याला शाळा आवडते हे माझ्या लक्षात येत होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्या झोपडीत त्याच्या पालकांना भेटायला गेलो तर त्याचे वडील दारूच्या नशेत झोपलेले होते, मग त्याच्या आईशी बोलून मंगेशला शाळेत पाठविण्यासाठी त्यांना तयार केलं. शाळाबाह्य मंग्याला शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप दुसरी इयत्तेत प्रवेश दिला. आणि ‘मंग्या’चा कागदोपत्री ‘मंगेश संतोष जाधव’ झाला.


त्यानंतर मंगेशने कधीच शाळा बुडविल्याचे मला आठवत नाही. तो दररोज शाळेत यायचा, अभ्यास करायचा, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. पण एकेदिवशी मंगेशच्या वडिलांनी दारूसाठी वाडीत चोरी केली आणि ते रंगेहाथ पकडले गेले. गावकीने त्यांना वाडीपासून दूर राहण्याची शिक्षा दिली आणि मंगेशच्या कुटुंबाला वाडी सोडून दूर शेतात राहायला जावं लागलं. 
हे सगळं ऐकून मला फार वाईट वाटलं. त्याच्या व्यसनी वडिलांमुळे अभ्यासात हुशार असणाऱ्या मंगेशवर ही वेळ आली होती. आता तो पुन्हा शाळाबाह्य होतो की काय अशी भीती मला वाटू लागली.
दुसरा दिवस उजाडला, मंगेश शाळेत आलेलाच नव्हता. तेवढ्यात बाहेरून एक विद्यार्थी ओरडत आला, “गुर्जी, गुर्जी मंग्या शाळेत येतोय, तो बघा लांब डोंगर चढून वर येतोय” असे तो मुलगा म्हणाला. माझा विश्वासच बसेना कारण हा डोंगर चढायला बराच अवघड होता. सर्व मुलं तर आनंदाने नाचायला लागली. मंगेशच्या शाळेत येण्याने आम्हांला फार आनंद झाला, “मंग्या कसा रे आलास?” असं विचारल्यावर तो उत्तरला, “गुर्जी, बापाने चोरी केली बगा, हाकलून दिलं आमाला वाडीतून. पण मी शाळेला येणार, शाळा आवडती मला. आलो दीड तास चालत हा डोंगर चढून!! मला मंगेशच्या जिद्दीचं फार कौतुक वाटलं. – गजानन जाधव, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा संतोषनगर, ता.रोहा, जिल्हा रायगड.