पत्रकारांचं दत्तक गाव- वांद्री

गाव वांद्री. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. लोकवस्ती सुमारे बाराशे. ३ ऑगस्ट रोजी इथे एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमात आमदार उदय सामंत यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली. यातले अडीच लाख गावातल्या शाळादुरुस्तीसाठी अडीच लाख ग्रामस्थांनी सुचवलेल्या उपक्रमांसाठी. ही रक्कम एव्हाना मंजुरदेखील झाली आहे. जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनीही गावात महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांसाठी निधी देण्याचं जाहीर केलं. 

हे कोणी घडवून आणलं? जिल्ह्यातल्या पत्रकारांनी.

वांद्री गावाचा कायापालट करण्यासाठी पत्रकार पुढे सरसावले आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुक्याच्या शाखेनं हे गाव दत्तक घेतलं आहे.
लोकप्रतिनिधींच्या मदतीनं गावात मूलभूत सुविधा राबवण्यात येणार आहेत. कुपोषण दूर करणं, गावात आरोग्यविषयक सुविधा निर्माण करणं, गावाच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणं अशी विविध कामं पत्रकार परिषदेनं डोळ्यासमोर ठेवली आहेत. वांद्री हे जिल्ह्यातलं एकमेव दारूमुक्त गाव. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातही गावानं पारितोषिक मिळवलं आहे.
हे गाव एक चांगलं रोल मॉडेल ठरावं, अशा पध्दतीनं काम केलं जाणार आहेत. विशेष म्हणजे, सर्व उपक्रमांत ग्रामस्थांचा सहभाग असणारच आहे, असं परिषदेचे जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू आणि तालुकाध्यक्ष राजेश शेळके यांनी सांगितलं. या पासून प्रेरणा घेत पत्रकार परिषदेची रोहा शाखाही असा उपक्रम राबवणार आहे.


परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांच्यासह सर्व वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, वांद्री ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. वांद्री गावच्या सरपंच अनिषा नागवेकर म्हणाल्या, “पत्रकारांनी पुढाकार घेतला की लोकांची कामं वेगाने होतात. आमच्या भागातल्या पत्रकारांचं आम्हाला कौतुक वाटतं.”