रत्नागिरीतल्या रुग्णांना आता न्यूरोसर्जरीसाठी कोल्हापूर- मुंबई गाठायची गरज नाही

रत्नागिरीचं जिल्हा शासकीय रुग्णालय. गेल्याच महिन्यात लांजा इथल्या रुग्णावर मणक्यावरची पहिली शस्त्रक्रिया रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडली. यापूर्वी रुग्णालयात मणक्यावरच्या काही शस्त्रक्रिया झाल्या आहेत मात्र त्याही खूपच कमी आणि बाहेरच्या तज्ज्ञांकडून झालेल्या. रुग्णालयातल्या तज्ज्ञाकडून झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया. ती केली डॉ श्रीविजय फडके यांनी. गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयात अशा ११ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ”लहानपणापासूनच मला डॉक्टर व्हायचं होतं. वडील अनिरुद्ध हेसुद्धा डॉक्टर. ते करत असलेली रुग्णसेवा पाहून आपोआपच या क्षेत्राबद्दल आस्था निर्माण झाली.” न्यूरोसर्जन डॉ श्रीविजय सांगत होते. ” ग्रामीण भागातले कितीतरी गरीब रुग्ण इथे उपचारासाठी येतात. मात्र न्यूरोसर्जन नसल्यामुळे त्यांना कोल्हपूर, मुंबईला पाठवावं लागत असल्याचं कानावर आलं होतं. जिथे लहानाचा मोठा झालो तिथे रुग्णसेवा करून काही प्रमाणात ऋणनिर्देश व्यक्त करावे असं वाटलं.”


डॉ श्रीविजय दापोलीचे. शाळा- महाविद्यालयात गुणवत्तायादीत. एमबीबीएस, एमएस, एमसीएच. वर्ष २०१८ मध्ये न्यूरोसर्जरीत कोलकाता विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. कोलकाता इथं तीन वर्षात ५०० शस्त्रक्रिया. शक्य तितक्या कमी पैशात रुग्णसेवा देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. न्यूरोसर्जरीसाठी लागणारी साधनसामग्री रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे श्रीविजय यांनी स्वतः ती आणली. साधनसामग्री नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होता कामा नये असं त्यांना वाटतं. साधनसामग्रींसाठी पाठपुरावा ते करत आहेत.