‘दशावतारी’ मुली

२० मे २०१८. मसुरे शाळा नंबर १ मधल्या विद्यार्थिनींच्या ‘भक्तीमहिमा’ या नाटकाचा २९ वा प्रयोग रंगला होता. ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातली. आणि हे नाटक दशावतारी. तेही ११ ते १४ वयोगटातल्या मुलींनी केलेलं.शंकराची भक्ती करून पाताळकेतू अमरत्वाचं वरदान मिळवतो. पुढे, अमरत्वाचा गर्व होऊन प्रजेवर अत्याचार करतो. प्रजारक्षणासाठी राजा चंद्रसेन आणि युवराज सत्यव्रत पाताळकेतूबरोबर युद्ध करतात. पाताळकेतू त्यांचा पराभव करतो. शेवटी राजाला नारदमुनी सांगतात की, पाताळकेतूचं मरण आदिमायेच्या हातूनच होईल. अखेरीस, आदिमाया प्रसन्न होते आणि पाताळकेतूचा नाश करते. हे या नाटकाचं कथानक. लेखक दत्तप्रसाद पेडणेकर. दिग्दर्शक विनोद कदम. निर्माता बाळासाहेब गोसावी.या नाटकाने बरेच विक्रम केले. दशावतार हा सिंधुदुर्गातला लोकप्रिय लोककला प्रकार. प्रत्येक गावी, ग्रामदेवतेच्या जत्रेत विविध दशावतारी मंडळं आपआपली कला सादर करतात. आजवर पुरूष कलावंतांनी जपलेला जिल्ह्याचा हा सांस्कृतिक वारसा आता या मुलींनी पुढे नेणं, हे खासच.

या नाटकाच्या २७ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या पहिल्या प्रयोगाला मुलींना तब्बल ६५ हजाराची रोख बक्षिसं प्रेक्षकांकडून मिळाली. या रकमेतून शाळेतल्या गरीब मुलांचा शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्च करायचा, त्यांचे वाढदिवसही साजरे करायचे, असं ठरवून नाट्यसंचाने आजवर २९ नाट्यप्रयोग केले.
नारदाची भूमिका करणार्‍या वैभवीने स्वतःला मिळालेल्या पंचवीस हजाराच्या बक्षिसाच्या रक्कमेत घरचे पाच हजार घालून शाळेतल्या रंगमंच उभारणीला हातभार लावला. चिंतनी या विद्यार्थिनीने स्वतःला मिळालेल्या बक्षिसातून शाळेला समई भेट म्हणून दिली. एकत्रित मिळालेल्या रकमेतून शाळेतल्या मुलांना पंचवीस हजाराच्या वह्यांचं वाटप केलं. सर्व खर्च भागून शिल्लक राहिलेल्या एक लाख रुपयांतून शाळेतल्या होतकरू मुलांना मदत करायची, असंही कलाकार मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी ठरवलं आहे.


नाटकात काम करणार्‍या संचिताने तिला मिळालेली ५ हजाराची रक्कम आपल्या वडिलांकडे दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण, एवढी मोठी एकत्रित रक्कम त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. आपल्या मुलीने अभिनयाच्या जोरावर मिळवलेले ५ हजार त्या कुटुंबासाठी लाख मोलाचे होते .
मसुरे केंद्रशाळेने श्रेया शिंगरे ,निकिता बागवे, कोमल गोलतकर, रिया गिरकर, संचिता जाधव, समृद्धी शेडगे, स्नेहल बागवे, वैभवी पेडणेकर, चिंतनी पेडणेकर, वैष्णवी दळवी, निशा सोलकर या ‘दशावतारी’ विद्यार्थिनींचा सत्कारही केला. या मुलींनी नाट्यकला सादर केली म्हणून त्यांचं कौतुकच. आणि मिळालेली बक्षिसाची सगळी रक्कम त्यांनी शाळेला, शाळेतल्या गरजू मुलामुलींना देऊ केली यासाठी खूप खूप कौतुक.