सहा हजार कुटुंब धूरमुक्त!

महिला सुखी झाली की तिचं कुटुंब सुखी समाधानी होत. म्हणूनच चुलीच्या धुरात कोंडमारा होणाऱ्या गावाकडील महिलांना बायोगॅसच महत्त्व भगीरथ प्रतिष्ठानने पटवून दिलं. भगीरथचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर सांगतात, “आजचा युवक खेडं सोडून शहराकडे जातो. तो शेती दुय्य्म मानतो. आपली जमीन विकून नोकरीसाठी शहराकडे धावणाऱ्या युवकांना आपल्याच गावी रोजगार मिळाला पाहिजे. गावागावातील युवकांनी आपलं गाव समृद्ध केलं पाहिजे. आहे त्या साधन सामुग्रीचा वापर करून आपणच आपल्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण केला पाहिजे. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि या निसर्गाचाच आपलं जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग केला पाहिजे”, या विचाराने भगीरथ प्रतिष्ठान प्रेरित झाले आहे. 


कुडाळ तालुक्यात गावोगाव फिरून भगीरथने युवकांना एकत्र केलं. त्यांना केवळ तत्वज्ञानाचे डोस न पाजता त्यांनी कुक्कुट, शेळी आणि गोपालन यासाठी आर्थिक मदतही केली आहे. इथंच न थांबता त्यांनी गावातील गवंड्याना बायोगॅस बांधणीचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं. त्यामुळे आज प्रतिष्ठानकडे पन्नास प्रशिक्षित बायोगॅस बांधणारे गवंडी आहेत. दर दिवशी गावोगावी जाऊन बायोगॅस बांधणीचे काम ते करतात. 
दोन गायी वा दोन गुरे असतील तर त्यांच्या मलमूत्रांपासून बायोगॅस निर्मिती करता येते. त्यातून पाच माणसांचं जेवण तयार होऊ शकतं. आणि उरलेलं मलमूत्र शेणखत म्हणून शेतीसाठी वापरता येतं. म्हणजेच गुरे-ढोरे ही शेती आणि दुधासाठीच नाही तर माणसांसाठी बारमाही उपयुक्त आहेत. हेच देवधर यांनी लोकांच्या लक्षात आणून दिलं. हे पटलं त्या दिवसापासून बायोगॅससाठी सबसिडी किती? असा प्रश्न लोक विचारत नाहीत; तर आम्हाला बायोगॅससाठी कर्ज किती देताय? हा प्रश्न विचारला जात असल्याचं देवधर सांगतात. हाच कोकणी माणूस सरकारच्या सबसिडीला न भुलता कर्ज घेऊन बायोगॅस बांधतो; ही कोकणचा माणूस स्वावलंबी होण्याची नांदी आहे, असंही ते पुढं म्हणतात.
बायोगॅसचं महत्त्व लोकांना आणि महिला वर्गाला पटलेलं आहे. लोक जागृतीचं काम भगीरथ प्रतिष्ठानने केलेलं आहे. त्यामुळे लोक आता स्वतःहून पुढाकार घेऊन आपलं घर धूरमुक्त करताना दिसतात. येत्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावं धूरमुक्त होतील. तो दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा असेल असं भगीरथ प्रतिष्ठानला वाटतं.