देहदानाच्या जागृतीसाठी वाहून घेतलेले जोशीकाका

“मृतदेह नाशवंत होण्याआधी जर तो कोणाच्या कामी येत असेल, तर कित्येक लोकांना त्याचा फायदा होतो. अवयवदानामुळे मरणासन्न लोकांना जीवनप्राप्ती होते तर देहदानामुळे पुढील पिढीतल्या डॉक्टर्सना अभ्यासाकरता मदत होते. म्हणजे दोन्ही दानांमधून समाजाला आपण मदत करतो”, जोशीकाका सांगतात. पूर्वी डोंबिवलीला आणि सध्या ठाण्यात राहणारे ७७ वर्षांचे विनायक जोशी. स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या जोशीकाकांनी अवयवदान आणि देहदानाच्या जागृतीसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. जोशींसह समविचारी व्यक्ती डोंबिवलीत एकत्र आल्या. त्यांनी 1987 मध्ये दधिची देहदान मंडळाची स्थापना केली. 15 ज्येष्ठ नागरिकांची कार्यकारिणी संस्थेचं काम पाहते. संस्थेचे सभासद आहेत चार हजार. आतापर्यंत संस्थेच्या ८०० सभासदांनी देहदान केलं आहे.

कर्णोपकर्णी माहिती कळलेले लोक संस्थेशी किंवा जोशीकाकांशी संपर्क साधतात. मग याविषयीच्या कायदेशीर आणि इतर प्रक्रियेची माहिती ते देतात. कार्यशाळांतून या माहितीचा प्रसार करण्यात येतो. सर्व सभासदांना त्यांच्या वाढदिवसापूर्वी शुभेच्छापत्र पाठवून संस्था त्यांच्या संपर्कात राहते. संस्थेचं त्रैमासिक आहे. यात कायदेशीर माहितीसोबत, डॉक्टरांचे लेख, एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या इच्छेचा मान राखत देहदान केलं असल्यास याची माहिती या त्रैमासिकात असते.


जोशीकाकांना एकच खंत वाटते ती म्हणजे, बऱ्याचदा मृत व्यक्तीने देहदानाविषयी अर्ज भरल्याची माहिती नातेवाईकांना नसते. किंवा माहिती असल्यासही ते गैरसमजुतीमुळे देहदान न करता पारंपरिक अंत्यसंस्कार करतात. काही नातेवाईक सभासदाच्या मृत्यूविषयी संस्थेला कळवत नाहीत.
देहदानअर्जाची प्रक्रिया सोपी आहे. अर्जावर दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात. यातील किमान एकजण रक्ताचा नातेवाईक असावा लागतो. अर्जदाराचे 2 फोटो, नाव, पत्ता आणि फोन नंबर याची माहिती दिल्यावर आपल्याला एक नोंदणी क्रमांक दिला जातो. ठाणे विभागातील अर्जांची नोंद कळवा हॉस्पिटलमध्ये तर मुंबईतल्या अर्जांची नोंद जे.जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात येते.
दधिची संस्थेसोबतच विनायक जोशी द फेडरेशन ऑफ ऑरगन अँड बॉडी डोनेशन, बँक कर्मचारी मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, विवाहपूर्व समुपदेशन, मसाप डोंबिवली, कोमसाप अत्रे सांस्कृतिक कट्टा अशा विविध संस्थांशी जोडलेले आहेत.