द पष्टेपाडा पॅटर्न!!

एक छोटीशी रंगीबेरंगी शाळा, मुलांच्या पाठीवरुन दप्तराचं ओझं गायब, प्रत्येकाच्या हाती स्वत:चा टॅब!! सराईतपणे टॅबवर बोटं चालवत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचा गृहपाठसुद्धा ऑनलाईनच तपासला जातो आणि त्यांना मेलवर उत्तर पाठवलं जातं. एकदम परदेशातली वाटते ना ही शाळा? पण नाही, ही आहे ठाणे जिल्ह्यातील पष्टेपाडा डिजिटल जिल्हा परिषद शाळा!

शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरची ही शाळा घडवली संदीप गुंड या शिक्षकाने. संदीप सर या शाळेत रुजू झाले तेव्हा शाळा गळक्या छपराची होती. बहुतांश विद्यार्थी शाळेकडे फिरकायचेच नाहीत. अगदी गुंड सरांनाही इथं नोकरी करायला नकोच असं वाटत होतं. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तशी विनंती केली आणि चांगलं काम करण्यासाठी एखाद्या चांगल्या शाळेत नेमणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘चांगलं काम करायचं असेल तर हीच शाळा सुधारुन दाखव’ असं आव्हान दिलं आणि मग घडला पष्टेपाड्याचा कायापालट!
संदीप सर मनापासून शिकविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मुलं शाळेत यायचीच नाहीत. मुलं नेमकी जातात तरी कुठं याचा शोध घेतला आणि सरांना कळालं की गावातला एकुलता एक टीव्ही पाहण्यासाठी पाटलांच्या घरात मुलं गर्दी करतात. टीव्हीवर कोणत्याही भाषेत काहीही चालू असलं तरी मुलांना फरक पडत नाही, त्यांना फक्त टीव्ही हवा असतो. शिवाय त्यांना मोबाईलवरचे गेम्स, फोटो काढणं हे सुद्धा आवडतं हे सरांच्या लक्षात आले. मुलांचे स्क्रिनप्रतीचं वेड लक्षात आलं आणि सरांनी मग शाळेत कॉम्प्युटर आणायचा ठरवला.

”कॉम्प्युटरची युक्ती चांगलीच यशस्वी ठरली. मुलं कॉम्प्युटरच्या ओढीनं दररोज शाळेत येऊ लागली. मी मुलांना मुक्तपणे कॉम्प्युटर हाताळू द्यायचो. पेंटसारखं साधं सॉफ्टवेअर, वेगवेगळे शैक्षणिक गेम्स, मराठी आणि इंग्रजी बडबडगीतं आम्ही डाऊनलोड करुन घेतली. शिवाय त्यांच्या अभ्यासाला पूरक ठरतील असे व्हिडिओज, गेम्स, इंटरअक्टिव्ह सॉफ्टवेअर यांचाही वापर सुरु केला आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागली.

हे सगळं त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावं, म्हणून संदीप सरांनी गावात एक सभा घेतली. त्यात मुलांचा अभ्यासात वाढत चाललेला रस, भविष्यकाळातील कॉम्प्युरचे महत्त्व, शाळासुधारणेसाठी राबविण्याचे प्रकल्प याविषयी ते बोलत होते. आणि तेवढ्यात एका मोलमजुरी करणाऱ्या आजीबाईंनी चुरगाळलेल्या 50-100 च्या नोटा टेबलवर ठेवत शाळेला एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. संदीप सर सांगतात, “त्या आजीबाईंच्या मदतीने मी भारावूनच गेलो. कारण हातावर पोट असणाऱ्या या आजीबाईंचे कोणतंच नातवंड शाळेत शिकत नव्हतं, तरीही गावाच्या भल्यासाठी म्हणून त्यांनी मदत दिली.”
आणि मग मदतीचा ओघच सुरु झाला. गावातल्या पेंटर्सने रात्र- रात्र जागून शाळा सुंदर रंगवून दिली, पुण्याच्या श्रद्धा शहा यांनी आपल्या लग्नाचे रिसेप्शन रद्द करुन शाळेला चार लाखांची मदत दिली. ज्यातून संपूर्ण शाळेसाठी सरांनी टॅब खरेदी केले. संदीप सर एवढ्यावरच थांबले नाहीत. आपल्या शाळेप्रमाणे इतरही शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी राज्यभरात ‘प्रेरणा सहविचार सभां’च्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन सुरु केले आहे. त्यातून महाराष्ट्रातल्या 11,200 शाळा लोकसहभागातून 110 कोटी रुपये मिळवत डिजिटल झालेल्या आहेत.