१३ गृहिणींचा ‘टुगेदरनेस’

ठाण्यातल्या गृहिणी उज्ज्वला बागवाडे यांनी बीडमध्ये नागरगोजे दाम्पत्यानं ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या शांतिवन संस्थेला भेट दिली. तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात उज्ज्वलाताईंना जाणवलं की संस्थेला अन्नधान्याची मोठीच चणचण आहे. ठाण्यातल्या मैत्रिणींशी या संदर्भात गप्पा मारतामारता धान्यबँकेची कल्पना सुचली आणि २ डिसेंबर २०१५ ला १३ मैत्रिणींनी मिळून We Together ग्रुप ची स्थापना झाली. ठाणे आणि कर्जतमधल्या या सख्यांनी प्रत्येकी चार सदस्य जोडत जोडत साखळी पद्धतीनं बँक विस्तारली. आज या बँकेचे सदस्य आहेत ४५०. शांतीवनासोबत श्रद्धा फाउंडेशन आणि सेवाश्रम या संस्थांनाही धान्यबँक मदत करते. आतापर्यंत धान्य बँकेने १६ हजार किलोपेक्षा जास्त धान्य संस्थांना पोहचवलं आहे. किमान ५ महिन्यांच्या अन्नधान्याची गरज यातून पूर्ण होत आहे. अन्नधान्याच्या गरजेची कायम काळजी घेतली जाईल हा विश्वास हा ग्रुप संस्थांना देतो. 

धान्यबॅंके सदस्य प्रत्येकी एक किलो धान्य आणि जमल्यास स्वयंपाकाकरिता लागणारं इतर जिन्नस देतात. ज्यांना धान्य देता येणं जमत नाही, त्यांच्याकरता रोख रकमेचा पर्याय ठेवला आहे. जमा झालेल्या रकमेचंही धान्यच विकत घेऊन दिलं जातं. किमान ५० रुपये किंवा १ किलो धान्य अशी आखणी आहे. त्यामुळे सर्व थरातील लोकांना यात सहभागी होता येतं. उज्ज्वलाताईंच्या सोसायटीत घरकाम करणाऱ्या २ मैत्रिणीही या साखळीत आहेत. सभासदांना संस्थांकडून देणगीची पावती दिली जाते. दर तिमाहीतून एकदा या बँकेत धान्य आणि रोख रक्कम जमा करायची असते. साधारण आठवडाभराचा अवधी दिला जातो. मुख्य सभासद आपल्या साखळीतील लोकांना डिपॉझीट करण्याचा कालावधी कळवते. 

जमा झालेलं सर्व धान्य कर्जतच्या श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. जमा झालेल्या रक्कमेतून घाऊक बाजारातून संस्थांच्या गरजेनुसार धान्य, साबण आणि इतर जिन्नस खरेदी केले जातात. जमा रक्कमेतील 40 टक्के रक्कमेचं सामान श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. श्रद्धा फाऊंडेशनची गाडी येऊन त्यांचं सामान घेऊन जाते. शांतीवनाकरता अहमदनगरच्या एका होलसेल व्यापाऱ्याकडून सामानाची खरेदी करण्यात येते. शांतीवनाच्या वाट्याची 60 टक्के रक्कम किती आहे, हे त्यांना कळवण्यात येतं. त्या रकमेचं सामान संस्था आणते आणि मग धान्यबँक सामानाचे पैसे भरते .


दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी ‘We Together’ च्या तेरा जणी जमतात आणि बँक आणखी सक्षम कशी होईल यावर चर्चा करतात. उज्ज्वलाताई सांगतात, आपण फक्त गृहिणी आहोत. आपल्याला काही करता येणार नाही असा विचार कोणीही करू नये. गृहिणींच्याच पुढाकारामुळे या साखळीशी माणसं जोडली जात आहेत आणि कित्येकांच्या भुकेची सोय होत आहे. गेल्या दोन वर्षात कितीतरी गृहिणींना आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास या साखळीमुळे आला आहे.