कहाणी घुंगरापलीकडली…

भंडारा जिल्ह्यातल्या आसगावच्या रोहितची ही गोष्ट. वय १५. अंगकाठीने अगदी सुदृढ आणि गोबऱ्या गालांचा. सर्वांचा लाडका. एकुलता एक. त्यामुळे आई-वडिलांचाही लाडका. ‘वाजले की बारा’ या गाण्यावर त्याने शाळेचा मंच दणाणून टाकला. चिमुकला रोहित आनंदराव कोरे एका दिवसात पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला. 


त्याला लहानपणापासून नृत्याची आवड. तो पाचवीत असतानाच त्याच्या पहिल्या लावणीला लोकांची वाहवा मिळाली. तिथूनच सुरु झाला त्याच्या लावणीनृत्याचा प्रवास. कुठलंही प्रशिक्षण न घेता ठसकेबाज लावणीच्या स्पर्धात तो भाग घेऊ लागला. लावणी हा प्रकार मुलीनींच करावयाचा असतो असा संकेत असलेल्या समाजात त्याने लावणी करण्यास सुरुवात केली.
छोट्या मोठ्या कार्यक्रमातून स्टेजवर येत राहिला. एक-एक करत त्याच्या तब्बल एकवीस लावण्या तयार झाल्या. २०१४ च्या जिल्हा ग्रंथोत्सवात शहरातल्या मान्यवर शाळांच्या सादरीकरणात रोहितला लावणीचं विशेष पारितोषिक मिळालं. 

घरातली हलाखी, वडील आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेले, आई मोलमजुरी करून घरखर्च भागवत असे. रोहितच्या लावणीसादरीकरणातून घरात पैसे येऊ लागले. बाहेर खिल्ली उडवणं सुरूच होतं. लोक घरात येऊन ‘तो उद्या नाच्या होईल’ असं सांगून आईला विचलित करू लागले. याची धास्ती घेऊन एक दिवस आईने घुंगरू आणि नृत्याचे सर्व साहित्य रागाच्या भरात जाळून टाकलं. रोहित हतबल झाला, रडला, खचून गेला. त्याची सगळी स्वप्नं जळून खाक झाली होती. 
रोहितला त्याच्या धमन्यांतलं नृत्य जपायचं होतं. आईच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूचं खापरही रोहितच्या माथी फुटलं. घराचा आधारच गेला. वडील अंथरुणावर. खर्च भागवायचा कसा? वडीलांची जबाबदारी रोहितवर आली. या सगळ्यातून रोहित पुन्हा उभा राहिला आहे. भीक मागण्यापेक्षा अंगी असलेल्या कलेचा सन्मान करत उदरनिर्वाह करायचा निर्णय आता त्याने घेतला आहे. 
रोहितचं हे दहावीचं वर्ष. तो म्हणतो, “अभ्यास करून चांगले गुण मिळवून दहावी उत्तीर्ण होईन. आणि पुढचं शिक्षण घेत कलेच्या क्षेत्रातच मी उंच भरारी घेईन”. त्याची हिंमत निश्चितच दाद देण्यासारखी आहे.