कृषी पर्यटन आलं, भविष्य घडू लागलं

एखाद्या फार्मवर बैलगाडी, ट्रक्टर सैर करायची, हुरडा खायचा किंवा क्वचित कुणाच्या शेतात खास भातलावणीसाठी जायचं, ही झाली शहरात राहणाऱ्यांसाठी शेताची ओळख. आणि शहराच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा झाला किफायतशीर व्यवसाय. सध्या पुण्या-मुंबईच्या आसपास तर अशा ऍग्रो टुरिझमचं पेवच फुटलेलं आहे. 


या शहरांपासून कोसो दूर असलेलं चंद्रपूर. इथल्या राजुरा गावातल्या चार तरुणांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग त्यांच्या गावातच सुरु केला आहे. त्यातून त्यांनी बेरोजगारीवर मात केलीच शिवाय लोकांसमोर आदर्शही निर्माण केला आहे. सुहास आसेकर, नितीन मुसळे, रिंकू मरस्कोल्हे, रुपेश शिवणकर ही त्यांची नावे. नितीन सांगतात, पश्चिम महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठे वलय आहे़ दरवर्षी आम्ही काही मित्र पश्चिम महाराष्ट्रात फिरायला जायचो. त्यावेळी तिकडील कृषी पर्यटनाला आवर्जुन भेट द्यायचो. विदर्भात मात्र, कृषी पर्यटनाविषयी शेतकरी फारसे जागृत नाहीत. त्यामुळे विदर्भात असा काही प्रयोग करता येईल का? हे आमच्या मनात होते. एका मित्राची पडिक जमीन होती. तिथं हा प्रयोग करायचा असे ठरलं आणि त्यासाठी आम्ही चौघे एकत्र आलो. अजूनही कामं सुरू आहेत. मात्र, आमचे कृषी पर्यटन पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, येथे अनेक नागरिक पर्यटनाचा आनंद लुटायला येऊ लागले आहेत.


एकीकडे चांगले पीक होत नाही, पिकाला भाव नाही, कर्ज कसे फेडायचे ही विवंचना. तरीही शेतकऱ्यांना या युवकांनी शेतीविकासाचा धडा दिला. आणि त्यातून रोजगारही उपलब्ध केला आहे. 
आज अनेक पर्यटक त्यांनी फुलविलेल्या शेतीत पर्यटनाला जात आहेत. या तरूणांकडे शिक्षण आहे. पण नोकरी नाही़. मग नुसतेच रडत बसण्यापेक्षा काही तरी नवीन करून दाखवायचे या उद्देशाने त्यांनी एकत्र येत पडिक शेत विकत घेतलं. राजुरापासून आठ किमीवरच्या चनाखा येथे त्यांनी शेती घेतली. इथंच आल्याचं विक्रमी उत्पादन घेतलं आणि बाकी शेतकऱ्यांचं लक्ष या मुलांकडे वेधलं गेलं. मग याच शेतीला त्यांनी कृषी पर्यटनाची साथ दिली. शेतात त्यांनी लहान मुलांकरिता बैलबंडीची सैर, झाडावरील झुले, कॉर्न पार्टी असा उपक्रम राबवून शेताला पर्यटनाचे स्थळ बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसाठी खेळण्याचे मैदान, मोठ्यासाठी खेळण्याचे साहित्य, मचाण अशा गोष्टी शेतात तयार केल्या आहेत. बच्चेकंपनीसह मोठेही या शेतात पर्यटनासाठी येत आहेत. 
पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेतले जाते. शिवाय शेतात हुर्डा पार्टी, जेवण आदी तयार करून दिले जाते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ कृषी पर्यटनाकडे वाढला आहे. आणि या तरुणांना रोजगारही गवसला आहे.

– प्रशांत देवतळे