प्लास्टिक कचऱ्यापासून सुटका? हो, शक्य आहे !

राज्यातील पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी चंद्रपूरची ओळख़. कारण सीएसटीपीएस हा पॉवर प्लांट, शहराच्या चारही बाजूला असलेल्या कोळसा खाणी आणि औद्योगिकीकरण. चंद्रपूर शहर अनेक वर्षांपासून विषारी प्रदूषणाचा सामना करीत आहे़. आता यात भर पडली आहे ती प्लास्टिक कचऱ्याची. चंद्रपुरात रोज ५ ते ६ टन प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. शिवाय मनपाच्या डम्पिंग यार्डवर २० वर्षांपासूनचा हजारो टन प्लास्टिक कचरा पडलेला आहे. यावर तोडगा काढण्याचा महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. आज एका डॉक्टरने यावर उपाय शोधला आहे. 

बालमुकुंद पालिवाल हे त्याचं नाव. पेशाने भूलतज्ञ. वैद्यकीय पेशातील असल्याने प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामांची जाणीव त्यांना होतीच. त्यांनी मनपासमोर प्लास्टिक पुन:प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. मनपाने प्रस्ताव स्वीकारताच डम्पिंग यार्डवर प्लास्टिक पुन:प्रक्रिया केंद्र (प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट) सुरू करण्यात आले. त्यामुळे प्लास्टिकच्या पुन:प्रकियासोबतच अनेक गरीब कुटुंबातील मुलांना, प्लास्टिक गोळा करणाऱ्या महिला, पुरुषांना नगदी रोजगार मिळाला आहे. 


पुन:प्रक्रियेनंतर आकर्षक पेपर वेट, बेंचेस, टाईल्स, चेंबर कवर्स, पेव्हिंग ब्लॉक बनविले जाणार आहेत. सिमेंट, लोखंड आणि लाकूड याला पर्याय म्हणून प्लास्टिक कचऱ्यापासून तयार होणाऱ्या साहित्यांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिका या साहित्यांचा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला वापर करणार असून, प्लास्टिक विटापासून संरक्षक भिंत बांधणार असल्याचे आयुक्त सांगतात. डॉ़ पालिवाल यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या केंद्रामुळे चंद्रपुरातील प्लास्टिकच्या समस्येवर कायमस्वरुपी ‘उपचारा’सोबतच डम्पिंग यार्डमध्ये हजारो टन पडलेल्या प्लास्टिकचीही समस्या मिटणार आहे. 
डॉ़ पालिवाल यांनी बल्लारपूर येथेही हा प्रयोग राबविला आहे. तेथून आता विविध साहित्याचे उत्पादन होत असून, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने बल्लारपूरच शहराची प्लॉस्टिक कचऱ्यापासून बऱ्यापैकी सुटका झाली आहे.


‘मनपाच्या दोन शाळांत प्लास्टिक बँक स्थापन करण्यात आली आहे. तसेच घराघरातून गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यातूनही प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. या युनिटमुळे प्लास्टिक कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करता येणार असल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

कुरकुरे, खर्रापन्नी, व्यावसायिकांकडून होत असलेला प्लास्टिक वापर आणि अन्य पॅकिंगसाहित्य यामुळे प्लास्टिकची समस्या अधिक तीव्र होत आहे. मात्र, प्लास्टिकवर पुनप्रक्रिया करून वेगवेगळे साहित्य करता येणे शक्य असल्याने या समस्येवर मात करता येऊ शकते, असे डॉ. पालीवाल म्हणतात.

– प्रशांत देवतळे