आम्ही ‘मोठ्ठ्या’ साहेबांना भेटलो!

शाळेची सहल म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी. शक्यतो या सहली जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी जातात. पण गडचिरोलीतील लेखा (मेंढा) गावातील जिल्हा परिषद शाळेची सहल मात्र यावर्षी हटके ठरली. कारण यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयांना शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली. 

सर्वसामान्यांनासुद्धा जिल्हापरिषद किंवा महानगरपालिकेत जाऊन काम करून घ्यायचे म्हटले तर कठीणच वाटते. ती भली मोठी इमारत, कामासाठी योग्य भाषेत अर्ज करणे, ‘मोठ्ठे साहेब’ म्हणजेच अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या सह्या करून आणणे, हे बहुतांश जणांना वैतागवाणे काम वाटते. आजची मुले ही उद्याचे जबाबदार नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना प्रशासकीय संस्थांच्या कार्याची चांगली ओळख व्हावी यासाठी शाळेने या आगळ्या सहलीचे नियोजन केले.
दिनांक 10 जानेवारी 2017 रोजी लेखा जि.प. शाळेतील विद्यार्थी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना भेटून दिवसभराचा कार्यक्रम आखला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राला (NIC) दिलेली भेट विशेष रंगली. देशाच्या विज्ञान आणि माहिती- तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली एनआयसी किती महत्त्वाचे काम करीत आहे, हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.

देशातील बहुतांश शासकीय विभाग, जिल्हापरिषदा आणि महानगरपालिकांच्या वेबसाईट या संबंधित एनआयसी केंद्रानेच तयार केलेल्या असतात. तसेच प्रशासकीय कामासाठी आवश्यक असणारी इमेल सेवा, राज्याच्या मुख्यालयांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सेवाही एनआयसी पुरविते. याशिवाय गडचिरोलीतील सर्व जमिनींचे सातबारा उतारे ऑनलाईन झालेले आहेत. शिवाय देशभरातील हरविलेल्या बालकांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या ‘नॅशनल चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ची माहितीही मुलांना मिळाली.
त्यानंतर नियोजनानुसार विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मा. शांतनू गोयल साहेबांच्या दालनात पोहोचले. गोयल सरांनी विद्यार्थ्यांसोबत सुमारे अर्धा तास मनसोक्त गप्पा मारल्या. तुम्ही कुठून आलात? कितवीत शिकता? तुमच्या कुटुंबाची शेती आहे का? असे अनेक प्रश्न गोयल साहेबांनी विचारले. त्यांच्या दालनात असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या नकाशावर विद्यार्थ्यांनी आपला धानोरा तालुका आणि लेखा गाव बरोबर दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी केलेल्या नकाशावाचनाबद्दल गोयल साहेबांनी त्यांना शाबासकी दिली. 
सीईओंनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे नाव, शिक्षण, कामाचे स्वरुप आणि गोयल साहेबांचे वडील काय करतात, याबद्दल माहिती विचारली. सीईओंनी त्यांच्या इतर प्रश्नांची उत्तरे दिली मात्र स्वत:चे नाव न सांगता विद्यार्थ्यांना एक आव्हान दिले. “या दालनात प्रवेश करण्याआधी माझे नाव बाहेरील पाटीवर मराठीत लिहिलेले होते आणि आपण बसलो आहोत तिथेही माझे नाव इंग्रजीमधे लिहिलेले आहे. ते नाव जे विद्यार्थी शोधून काढतील त्यांना माझ्याकडून 50 रुपयांचे बक्षीस!! ” आव्हान जाहीर होण्याचा अवकाश की जवळपास सात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी हात वर करून उत्तर दिलेसुद्धा- शांतनू गोयल! विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर सीईओ खुष झाले आणि त्यांनी शाबासकी देत सात विद्यार्थ्यांच्या बक्षिसाचे 350 रुपये शिक्षकांकडे दिले.
यानंतर शिक्षकांनी मुलांसाठी मिठाई मागवली आणि मग ती मिठाई आणि घरुन आणलेल्या डब्यांवर ताव मारुन मुलं घरी परत गेली.