रविना- पायल आता शाळेत चांगल्याच रमल्या आहेत.

महाराष्ट्रातील टोकाचा गडचिरोली जिल्हा. गडचिरोलीपासून १२८ किमि दूरचा अहेरी तालुका. या अहेरीपासून १२ किमि आत वसलेलं मोदुमडगू गाव. गावात एकुलती एक प्राथमिक जिल्हा परिषद शाळा.
मोदुमडगू गावात २०१६च्या जुलैमध्ये भटक्या समाजातलं मावरे कुटुंब दाखल झालं. आपल्या तीन मुली आणि आजींना घेऊन नवरा- बायकोनं एका झोपडीत संसार थाटला. फायबरच्या खुर्च्या आणि छोट्या-मोठ्या वस्तू आसपासच्या गावांमधे विकून ते पोटाची खळगी भरू लागले.


कुटुंब तर गावात राहतंय, पण त्यांच्या मुली मात्र शाळेत येत नाहीत, हे शाळेतील श्रीनिवास गौतम सरांच्या लक्षात आलं. शाळेने साधनव्यक्ती सुषमा खराबे आणि अहेरीच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या हे लक्षात आणून दिलं. सगळ्यांनाच बाब गंभीर वाटली. खराबे मॅडम आणि वैद्य मॅडम यांनी थेट मोदूमडगू गाठलं. गाववेशीजवळच्या मावरे कुटुंबाच्या झोपडीत प्रवेश केला आणि घरात असलेल्या आजींना नाती शाळेत का येत नाहीत, याबद्दल विचारणा केली. “साळा? आमच्या पोरींनी तर जल्मापासून कदी साळंच त्वांडच पाह्यलं नाय. बगा.. त्या कंदीच साळंला गेल्या न्हाईत. आमच्याकडं येवढा पैका न्हाय पोट्ट्यांना साळंत पाठवाया!” आजींचं उत्तर. 

आजींकडून आणखीही कळलं की, मावरे कुटुंब मूळचं चंद्रपूरमधल्या नागभीड तालुक्यातलं, बहुरूपी समाजातलं. पण पारंपरिक बहुरूपी कलेवर पोट भरत नाही, म्हणून आता फायबरच्या वस्तू विकण्याच्या व्यवसायाकडे वळलं होतं. मात्र आपण गरीब आहोत, म्हणून नाती शाळेत जाऊ शकत नाहीत, हा आजींचा गैरसमज होता. गटशिक्षणाधिकारी वैद्य मॅडम यांनी आजींना समजावलं. प्रत्येक मुलामुलीने शिक्षण घेतलं पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. देशात ‘शिक्षण हक्क कायदा’ मंजूर झाला आहे. योग्य शिक्षण घेतलं तर मोठेपणी गरिबीत राहावं लागणार नाही. शिकून मुली स्वतः कमवू शकतील…हे त्यांनी आजींना सांगितलं. शेजारी शांत उभ्या असलेल्या आजीच्या नाती रविना आणि पायल मॅडमचं बोलणं ऐकत होत्या. खराबे मॅडमही आजींना समजावत म्हणाल्या, “आजी, मुलींना शाळेत पाठविण्यासाठी पैसे लागत नाहीत. मुलींना गणवेष मिळतो. शाळेत दुपारी जेवायलाही मिळतं. मुलींचं शिक्षण सरकारकडून मोफत होतं. दप्तर, पुस्तकं सगळं आम्हीच देऊ. तुम्हाला कसलाच खरच येणार नाही… ”मॅडमचं बोलणं ऐकून आजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. मुलींचे डोळे लकाकायला लागले.. “आमाला खरंच नवीन कापडं मिळतील साळंत आलो तर? जर नवीन कापडं मिळणार असतील तर आमी आजपासूनच साळंला येतो.” रविना आणि पायल एका सुरात म्हणाल्या.
खराबे मॅडमना खूपच आनंद झाला. मुलींना घेऊन त्या ताबडतोब दुकानात गेल्या आणि त्यांनी दोन नवे गणवेश खरेदी केले. मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन रविना आणि पायल यांना शाळेत समारंभपूर्वक दाखल करून घेण्यात आलं. नातींच्या शाळाप्रवेशाच्या प्रसंगी आजी हजर होत्या. मुलींचं कौतुक आणि त्यांना मिळालेला नवाकोरा गणवेश पाहून आजींचे डोळे पाणावले.
सुरूवातीला लाजणाऱ्या रविना- पायल आता शाळेत चांगल्याच रमल्या आहेत.
लेखक – नकुल लांजेवार, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसबी, तालुका आरमोरी, गडचिरोली.