यावर्षी नेहासुद्धा आली सहलीला!

जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया.
2016 साली आमच्या मोहगाव तिल्लीच्या शाळेची सहल नागपूरच्या ‘फन अन्ड फूड पार्क’ मध्ये गेली होती. विद्यार्थ्यांनी वॉटर पार्क खूप एन्जॉय केला. तिथून परतल्यावर मी आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत सहलीत केलेल्या मजेविषयी बोलत होतो. सहलीला आलेले विद्यार्थी मजा रंगवून सांगत होते, तर येऊ न शकलेले विद्यार्थी डोळे विस्फारुन ऐकत होते. “मला तर वाटतंय की दरवर्षी जावं तिथं सहलीला!” असं मी बोललो आणि वर्गात विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या.
त्या विद्यार्थ्यांमध्ये नेहाही होती. ती एकीकडे टाळ्या वाजवत होती, तर दुसरीकडे तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ” नेहा, बेटा काय झालं? ” मी नेहाला विचारलं. ती म्हणाली, सर, मलाही सहलीला यायचं होतं. पण मला घरून पैसे नाय मिळाले. मीपण मजा केली असती खूप’. असं म्हणून ती हुंदके देऊ लागली. मी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि “पुढच्या वर्षी तुलासुद्धा सहलीला नेणार” असं आश्वासन देऊन तिला शांत केलं.
यापुढे वर्गासमोर आठवडाभर तरी सहलीचा विषय काढायचा नाही असा निश्चय मी केला. नेहासारखी जी मुलं गरिबीमुळे सहलीला येऊ शकली नाहीत, त्यांना नक्कीच वाईट वाटत असणार. नेहाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. सहलीला जावंसं वाटणं साहजिक आहे. पण ग्रामीण भागात हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश पालकांना सहलीसाठी एकरकमी चार-पाचशे रुपये देणं कठीण जातं.
मी सतत नेहाचाच विचार करत होतो. आनंद मिळवणं हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकाला सहलीला येता यायला हवं, असं माझं मन मला सांगत होतं. शेवटी हा विषय मी माझ्या वर्गासमोर काढला. त्यासाठी विद्यार्थ्यांनीच उपाय सुचवला- सहलीसाठीचे पैसे वर्षभर आधी साठविण्याचा आणि त्यातून सुरु झाला- पिकनिक फंड.
मी विद्यार्थ्यांना सांगितलं, “तुम्हांला महिन्यातून एकदा- दोनदा खाऊसाठी मिळणारे 10-20 रुपये आणि अधून मधून येणाऱ्या पाहुण्यांनी दिलेले 25-50 रुपये फंडात जमा करा. मात्र या फंडासाठी पैसे द्याच असा हट्ट घरी करायचा नाही, जेवढे पैसे सहज मिळतील ते जमा करायचे.” ही कल्पना झकास लागू पडली. खाऊचे पैसे पिकनिक फंडात जमा होऊ लागले. त्यामुळे बाहेरचं अरबट चरबट खाणं थांबलं. शिवाय फेब्रुवारी 2017 पर्यंत फंडात तब्बल 13 हजार रुपये जमा झाले.
विशेष म्हणजे नेहानेसुद्धा या फंडात जवळपास चारेकशे रूपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी नेहाला दिलेलं वचन आम्हांला पूर्ण करता आलं. यावर्षी ३५ विद्यार्थ्यांनी छत्तीसगडच्या भिलाईमधील ‘मैत्री बागे’ला भेट दिली. बागेमधील हिरवळ, फुले, संगीताच्या तालावर डोलणारी कारंजी, छोटीशी टॉय ट्रेन याचा आनंद मुलांनी घेतला. यापूर्वी कधीच सहलीला न आलेल्या नेहा आणि तिच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला आनंद मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो.