निवृत्तिनंतरची आगळी लढाई

नागपूर शहर. इथले डाॅ.रवी वानखेडे. स्क्वाॅड्रन लिडर म्हणून 10 वर्षे एयरफोर्समध्ये काम केल्यानंतर 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. परंतु आता पुढे काय? अशी अस्वस्थताही होतीच. पेन्शन मिळणारच होती, त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न नव्हता. परंतु सदैव कामात व्यस्त असणाऱ्या फौजीला निवृत्तीनंतरचे आयुष्य त्रासदायक वाटत होतं. निरोप समारंभाच्या दिवशी एका मित्राने भारतीय वंशाच्या नायझेरीयन डाॅक्टरसोबत ओळख करून दिली. ही भेट डाॅ. वानखेडे यांच्या आयुष्यातील टर्नींग पाॅईट. त्यांनी डाॅ. वानखेडे यांना नायझेरीयाला बोलावून घेतलं. इंटरव्हयु झाला. त्यांच्या हाताखाली पॅथाॅलाॅजी व ब्लडबँकेवर अभ्यास करत काम सुरू झालं. नंतर वानखेडे मायदेशी परतले. आणि त्यांनी रामदासपेठेत स्वतःची पहिली ब्लडबँक व पॅथालाॅजी सुरू केली. या पॅथालाॅजीच्या माध्यमातून प्लाझमा आणि रेड सेल्स फेकून न देता त्याचाही वापर करता येतो, हे डाॅ. रवी वानखेडे यांनी इतरांना पटवून दिलं.
याच काळात 2009 मध्ये डाॅक्टर वानखेडे यांनी त्यांच्या प्रिय मित्राला आपली किडनी दान करून त्याला मृत्युच्या दारातून ओढून काढलं. त्यावेळी त्यांच्या किडनीदानाची खबर सर्वत्र पसरली होती.

राष्ट्रपती भवनाकडूनही ही दखल घेण्यात आली होती. सत्कारासह त्यांना सहकुटूंब भेटण्याची 10 मिनिटाची वेळ नियोजित करण्यात आली होती. परंतु, नियोजित वेळेपेक्षा त्यांच्यात अर्धा तास जास्त चर्चा रंगली. 
एक दिवस इंडिया टूडे वृत्तपत्रात चेन्नई येथील मोहन फाऊंडेशनविषयी माहिती त्यांच्या वाचनात आली. उत्सुकता वाटून त्यांनी संस्थेला फोन केला. आणि त्यांना थेट तिथल्या सेमीनारचं आमंत्रण मिळालं. या सेमीनारमध्ये इतर राज्यातील 13 सदस्य हजर होते. परतल्याानंतर डाॅ. वानखेडे यांनी मोहन फाऊडेंशनचं कार्य नागपूर शहरात सुरू केलं. मोहन म्हणजे M – Multi, O – Organ, H – Harvesting, A – Aid, N – Network
मृतशरीरातील काही उपयोगी अवयवांचा दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी वापर करणे म्हणजेच अवयवदान करणे. आपल्या शरीरात एकूण 25 ते 30 टिशू असतात, जे आपण दान करू शकतो. याकरीता जनजागृती करून लोकांमधील गैरसमजूती दूर करणे, अवयवदानासाठी समाजाला प्रेरीत करणे, त्यांचे मार्गदर्शन करणे हे मोहन फाऊंडेशनचे कार्य. नागपूर शहरात 2013 पासून त्यांनी मोहन फाऊंडेशनच्या कार्याला सुरुवात केली. अवयवदान, नेत्रदान, देहदान हे विषय समाजाच्या पचनी न पडणारे. अशात अवयवदान वा देहदान करून आत्म्याला शांती मिळणार नाही, वगैरे भ्रामक गोष्टी जास्त प्रचारात होत्या. तरी पहिल्याच वर्षी डाॅ. वानखेडे यांनी ब्रेनडेड झालेल्या अमितसिंग या 19 वर्षीय तरुणाच्या नातेवाईकांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळविलं. नागपुरातील ती पहिली अवयवदान प्रक्रिया. विविध काॅलेज, आॅफिस, क्लब्स् इत्यादी ठिकाणी जनजागृती करत डाॅक्टरांनी त्यांच्याकडून अवयवदानाचे फाॅर्म भरून घेतले. 


त्यानंतर मात्र हे प्रमाण वाढू लागलं. 2013 मध्ये एक, 14 मध्ये 3 असं करत आता 2018 मध्ये 18 केसेसमध्ये अवयवदान घडलं. डाॅ. वानेखेडे यांच्या या कामाची शासनाने दखल घेतली आहे. नागपूर शहरातील मेडिकल काॅलेजमध्ये Zonal Transplant Coordination Centre या स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. त्याची जबाबदारी शासनाने डाॅ. वानखेडे यांच्याकडे सोपवली आहे. सरांच्या या प्रयत्नांमुळेच नागपूरमध्ये ग्रीन कॅरीडॉर सुरू झाला आहे. 
भारतात जवळपास दरवर्षी 2 लक्ष रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असते. 50 हजार ह्रदय तर 30 हजार लिवरची गरज असते. प्रत्यक्षात सहा हजार किडनी, 15 हजार ह्रदय तर फक्त 1500 लिवर उपलब्ध होतात.
डाॅक्टर सांगतात, “जिवंत असतांना एक मूत्रपिंड व यकृताचा काही भाग दान करता येतो. हदय बंद पडून मृत्यु झाल्यास अवयवदान करता येत नाही. परंतु 6 तासाच्या आत नेत्रदान, त्वचादान करता येतं. अवयवदान फक्त मेंदू मृत्यु झाल्यास करू शकतो. असे रूग्ण आधीपासूनच व्हेंटिलेटरवर असल्यास हदय काही तास किंवा काही दिवस कार्यरत असते. डाॅक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर आणि नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर अशा रूग्णांकडून 8 अवयवांचं दान घेऊ शकतो. दोन मूत्रपिंड, हदय, यकृत, पॅन क्रियाज इत्यादी शिवाय नेत्रदान आणि त्वचादान सुध्दा करू शकतात. मागच्या वर्षी पूर्णच्या पूर्ण एक हात जसाच तसा दान करण्यात आला आहे.”
नुकतंच नागपूर शहरात पहिल्यांदाच फुफ्फुस दान करण्यात आलं आहे. 33 वर्षीय ब्रेनडेड युवकाने आपलं फुफ्फुसच नाही तर हदय, लिवर, दोन किडन्या सुध्दा दान केल्या आहेत. 
डाॅ. रवि वानखेडे यांच्या मते, अवयवदानाचं प्रमाण वाढलं असलं तरी ही संख्या खूपच अल्प आहे. महाराष्ट्रात तर हे प्रमाण फारच कमी आहे. आजही धर्म व अंधविश्वासामुळे लोक पुढं येत नाहीत. सगळेच धर्म अवयवदानाची अनुमती देत असतांना आम्ही मात्र आजही मागासलेलो आहेात. ‘धर्म म्हणजे माणुसकी’ हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मृत्युनंतर अवयवदान केलं तर माणूस मेल्यानंतर सुध्दा कित्येक माणसामध्ये जिवंत राहू शकतो, आपल्या दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून …!
संपर्कासाठी –
e-donar नावाचे अॅप डाऊनलोड करता येईल. 
हेल्पलाईन – 1800.103.7100 
वेबसाईट – www.mohanfoundation.org
ईमेल आयडी – raviwankhede@gmail.com