सप्तखंजेरीचा आगळा नाद

नागपूरच्या तुषार सूर्यवंशीची ही गोष्ट. एक भाऊ, एक बहीण आणि आई-वडील असा छोटा परिवार. घरातील वातावरण धार्मिक. त्यामुळे धार्मिकतेचा संस्कार पक्का झाला. लहानपणापासूनच तुषार भजन आणि कीर्तनात रमायचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे विचार त्याच्या बालमनावर कोरले गेले. वयाच्या ११ व्या वर्षी भगतसिंह यांच्या जीवनावरील चित्रपट त्याने बघितला. त्यातूनच देशासाठी आपण सुद्धा काहीतरी करावं अशी संकल्पना मनात आली आणि सातवीत शिकत असतानाच त्याने सप्तखंजेरी घेऊन कीर्तनाला सुरूवात केली. खंजेरी हे वाद्य कनार्टकातील. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यामुळे हे खंजेरी वाद्य सर्वपरिचित झालं. तुकडोजी महाराज यांनी खंजेरी भजनाच्या माध्यमातून जनजागृती केली.
‘खं’ म्हणजे आकाश, ‘जरी’ म्हणजे त्याचा नाद. म्हणजेच ज्याचा आवाज आकाशातील ढगासारखा येतो त्यास खंजेरी असं म्हटलं जातं. विदर्भातील सत्यपाल महाराज यांनी सर्वात प्रथम एकाच वेळेस सात खंजेरी वाजवून ही आधुनिक सप्तखंजेरी परंपरा उदयास आणली. सत्यपाल महाराज, इंजी भाऊ थुटे यांच्या सीडी, केसेट्स बघून बघून तुषारने हे वाद्य वाजवण्यास सुरुवात केली. आधी तर घरातील डबे, वेगवेगळी भांडी वाजवत बसायचा. एक दिवस मात्र त्यानं खरोखरच खंजेरी वाद्य विकत आणलं आणि गंमत म्हणून तो वाजवू लागला. आणि या गमती जमतीत आणलेल्या वाद्याने त्याच्या आयुष्याची वाटच बदलली. तिथूनच त्याचा सप्तखंजेरीचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीला जी खंजेरी तो स्वत:च्या मनोरंजनासाठी वाजवत होता तीच खंजेरी आता तो प्रबोधनासाठी वाजवत आहे. 


तुषार म्हणतो, “कीर्तनात जे आम्ही बोलतो त्या प्रकारे प्रथम आपल्या जीवनात वागण्याचा यथायोग्य प्रयत्न करीत असतो. म्हणूनच माझ्या आजोबांचं निधन झालं तेव्हा आम्ही त्यांचं नेत्रदान केलं. आता मी स्वत: देखील देहदान करण्याचा संकल्प केला आहे.”
कीर्तनातून देहदान, नेत्रदान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, निर्मलगाव यासारख्या विषयांवर तुषार प्रबोधन करत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आणि भारतीय संविधान हे त्याच्या कार्यक्रमाचे आधार ग्रंथ. अनेकदा कार्यक्रमात लोक कीर्तन ऐकल्यावर व्यसनमुक्तीचा तर कोणी रक्तदान, देहदानाचा संकल्प करीत असतात. एकंदरीत सप्तखंजेरी हे नुसते वाद्य नसून ते परिवर्तनाचं फार मोठं माध्यम ठरत असल्याचं तुषारचं म्हणणं आहे. संपूर्ण महाराष्ट्र, तसेच आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब इत्यादी प्रांतात आपल्या सप्तखंजेरी प्रबोधनाचे कार्यक्रम त्याने सादर केले आहेत. शाळा, कॉलेज, अनाथालय, वृद्धाश्रम, कारागृहात देखील त्याचे खंजेरी वाद्य आणि कीर्तन प्रसिद्ध आहेत. ठिकठिकाणी १८०० च्यावर त्याच्या कीर्तनाचे कार्यक्रम झालेले आहेत.. 
विदर्भ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार, महाराष्ट्ररत्न पुरस्कार, नागपूर भूषण पुरस्कार, युवा कलारत्न पुरस्कार, फुले-शाहु-आंबेडकर समता पुरस्कार, असे एकूण ४५ पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाचा संत चोखामेळा पुरस्कार त्याला जाहीर झाला आहे. 
तुषार सूर्यवंशी संपर्क क्र. – ८००७३८५९९७ / ९४२२१२७३८९
 सप्तखंजिरीचा नाद अनुभवण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या.
https://www.facebook.com/sampark.net.in/videos/370690207078697/