स्वच्छतेची सुरूवात, स्वत:पासून

नागपूरमधल्या रामदास पेठ इथल्या वंदना मुजुमदार. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना. शहरात स्वच्छतेसाठी काहीतरी करण्याची निकड वाटत होती. वंदना यांच्या भगिनी कल्पना केंकरे भोपाळमध्ये राहायला. त्यांनी तिथे आय क्लीन भोपाळ गट सुरू करून शहरातल्या विविध ठिकाणांची साफसफाई सुरू केली होती. वंदना यांनी बहिणीपासून प्रेरणा घेतली. सोबत चार -पाच महिला. त्यातून साधारण चार वर्षांपूर्वी आकाराला आला आय क्लीन नागपूर गट. त्यांचं काम पाहून एकेक जण स्वयंप्रेरणेनं त्यात सहभागी होऊ लागला. 

गेल्या चार वर्षांपासून शाळा, महाविद्यालयं, बस स्टॉप्स, रेल्वे स्थानक, सार्वजनिक शौचालयं, अशा विविध ठिकाणी गटानं काम करायला सुरुवात केली. भिंती स्वच्छ केल्या. पण पुन्हा त्या अस्वच्छ झाल्या तर हा प्रश्न होताच. मग त्या पांढऱ्या रंगानं रंगवल्या. वारली चित्रकला महाराष्ट्राचं भूषण. ती या भिंतींवर साकारण्यात आली. अशा १५० हून अधिक जागांचं सुशोभीकरण गटानं केलं आहे. आता १४० ते १५० जण या गटात आहेत.

३० ते ४० जण नियमित काम करणारे. वयोगट सात वर्षांपासून ७५ वर्षांपर्यंत. आपली रोजची कामं, शाळा-कॉलेज सांभाळून दर रविवारी हा गट नागपूरमध्ये कुठे ना कुठे काम करताना दिसतो. काम करताना लहान-मोठा भेद नसतो. सगळे जण एका पातळीवर येऊन काम करतात. ज्या कोणाला काम करायची इच्छा असेल त्या सर्वांसाठी गट खुला आहे.