सौर पॅनलच्या उदयोगातून भरारी

वर्धा जिल्ह्यातल्या केळझर इथल्या शेतकरी कुटुंबातले सुनील गुंडे आणि सचिन ढोणे. दोघांकडे विद्युत अभियांत्रिकीची पदविका. पुणे आणि नंतर नागपूर इथं चांगल्या पगाराची नोकरी. ”आपल्याकडे बुद्धी आहे, श्रम करण्याची तयारी आहे, तर दुसऱ्यासाठी का राबावं? सौर पॅनल बसवण्याचा स्वतःचाच व्यवसाय सुरू केला तर अधिक प्रगती होऊ शकेल ”, असं सुनील यांना वाटत होतं. त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. सचिनही साथीला आले. २०१५ मध्ये दोघांनी एस अॅंड एस फ्युचर एनर्जी ट्रेडिंग कंपनी सुरू केली. 


जमवलेले पैसे थोडे – थोडे वापरत काम सुरू केलं. मिळेल ते काम स्वीकारलं . कठोर परिश्रम सुरू होते. पण तरीही उद्योग पुढे नेण्यासाठी भांडवलाची आवश्यकता होतीच. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानं दोघांच्याही घरचे नाराज. मग प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी सुनील यांनी केळझरच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अर्ज केला. उद्योगाचा व्यवस्थित प्रस्ताव. कामाप्रति बांधिलकी. बँकेनं ३लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं. 


लगेचच वनविभागाचं सौर पथदिवे बसवण्याचं कामही मिळालं. त्यानंतर दोघांनी मागे वळून बघितलंच नाही. 
नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचं ४० लाख रुपयांचं आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेशमधलं काम मिळालं. कामातली तत्परता, बांधिलकी, श्रम करण्याची तयारी आणि तत्पर सेवा या व्यावसायिक गुणांमुळे कामं मिळत गेली.

आज कंपनीकडे केवळ महाराष्ट्रातलीच नव्हे तर उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातली सौर पॅनल बसविण्याची काम आहेत. आज कंपनीची उलाढाल आहे १ कोटी. 3 वर्षातच आयएसओ मानांकनही. 
कामाला २ विद्युत अभियंते, ५ तांत्रिक सहाय्यक, आणि कार्यक्षेत्रातले मदतनीस असे १० कर्मचारी. डिसेंबर २०१७ मध्ये वर्धेत आॅफिस सुरू केलं. तेव्हा पहिल्यांदा कुटुंबियांनी शाबासकीची थाप दिली.