संगमनेरला (जि.अहमदनगर) येणारी प्रत्येक व्यक्ती हमखास नगर रस्त्यावरील स्पेशल पुदिनायुक्त ताकाचा (मठ्ठा) आस्वाद घेतेच. जाता-जाता सोबत पार्सलही घेऊन जाते. सहा वर्षांपूर्वी येथील विजय एकनाथ गुंजाळ यांनी ताकविक्री सुरू केली. आज त्यांच्या पुदिनायुक्त ताकाची ओळख लांबवर पसरली आहे.
शहरालगत वडिलोपार्जित एक एकर जमीन. राजेश, अजित आणि विजय या तीन भावात जमिनीची सामायिक मालकी. या जमिनीत त्यांनी शेवग्याची लागवड केली आहे. त्यातच, आंतरपीक म्हणून पुदिनाही लावला आहे. त्याचाच वापर ते ताकासाठी करतात.

या छोट्या जमिनीच्या तुकड्यात काय भागणार? मग, वडील मजुरी करायचे. आणि तिघा भावांनी वेगवेगळ्या मार्गाने रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. मोठा भाऊ राजेश नगरपालिकेत कार्यालयीन निरीक्षक. मधला विजय. धाकटा अजित भाजीपाला खरेदीविक्रीच्या व्यवसायात. विजय बारावी शिकलेले. त्यांनी 2007 ते 2009 या काळात सेंद्रीय, कंपोस्ट खत तयार करुन त्याची विक्री केली. मात्र, त्यात फारसा जम बसला नाही.

त्यांनी 2012 मध्ये संगमनेरच्याच राजहंस दूध संघाकडून दूध, ताक विक्री आणि अन्य उत्पादनांच्या वितरणाचं काम घेतलं. तेव्हापासून त्यांनी संगमनेर रस्त्यावर ताकविक्रीचं दुकान सुरु केलं. तिथेच प्रयोग म्हणून त्यांनी पुदिनायुक्त ताक विकायचा निर्णय घेतला. विक्री सुरु केली आणि लोकही प्रतिसाद देऊ लागले.
गुंजाळ यांची, आता संगमनेर भागात पुदिनायुक्त ताकविक्रीतून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या भागात पुदिनायुक्त ताक फक्त गुंजाळ यांच्या दुकानातच मिळतं. सुरूवातीला, दररोज साधारण पाच ते दहा लिटर ताकाची विक्री व्हायची, त्यात हळूहळू वाढ झाली. आता, दर दिवसाला साधारण शंभर ते दीडशे लिटर ताकाची विक्री होते. उन्हाळ्यात या ताकाला अधिक मागणी असते. उन्हाळ्यात दिवसाला तीनशे लिटरपर्यत विक्री जाते. आता विजय यांना कुटुंबातले सदस्यही मदत करू लागले आहेत.
ताकात वापरण्यासाठी पुदिन्याचा रस सुरुवातीला मिक्सरमधून काढला जायचा. पाच वर्षापूर्वी रस काढण्यासाठी 27 हजार रुपये खर्च करुन मशीन घेतलं आहे. दररोज साधारण
तीन ते चार किलो पुदिन्याचा रस ताकासाठी लागतो.
पुदिनायुक्त ताकामुळे पचनाला फायदा होतो. डोकं दुखणं थांबतं, उचकी थांबते. त्वचाविकारावर, वजन कमी होण्यासाठी, पोट साफ राहण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी हे पेय फायदेशीर आहे, असं गुंजाळ सांगतात.
“शेतीचं क्षेत्र कमी असल्याची अनेकांना खंत असते. त्यात पाणी नाही. दुष्काळामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मी मात्र एकरभर क्षेत्रातून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. मला त्यात यशही आलं. पुदिनायुक्त ताकविक्रीची या भागात सर्वप्रथम मी सुरुवात केली. आजे हे ताक लोकप्रिय झालं आहे. या सगळ्यात धडपड महत्वाची असते”, असं विजय गुंजाळ सांगतात.”