‘सावली’ची आयडाॅल

आई-वडिलांनी लहानपणीच साथ सोडलेली. त्यामुळे अनाथपणाचा शिक्का. जवळच कुणीच नाही. अहमदनगर येथील ‘सावली’ अनाथालयात राहणाऱ्या रेश्माची (नाव बदलण्यात आले आहे) ही व्यथा. सावत्र आईशी होणाऱ्या वादामुळे वडिलांनी तिसरीत शिकणाऱ्या लहानग्या रेश्माला ‘सावली’मध्ये सोडले. तिच्या पालकांशी संस्थेने वारंवार संपर्क साधला परंतु त्यांचा प्रतिसाद आला नाही. आईवडिलांच्या आठवणींमधून रेश्माला बाहेर काढण्याचे काम ‘सावली’ चे संस्थापक नितेश बनसोडे यांनी केले. मन रमवण्यासाठी ती गायला लागली. बनसोडे सांगतात, ‘तिच्या आवाजातील गुणवत्ता समजली. आणि आम्ही आठवड्यातून एकदा गायन वर्गाचे आयोजन केले, यासाठी मनोहर इंगळे सरांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले’. सोबतच रेश्माने घेतलेली मेहनत कामी आली आणि ‘इंडियन आयडाॅल’ च्या अंतिम ५० पर्यत रेश्माला पोहोचता आले.

रेश्माला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सावली’ मधील प्रिती, सपना, कृष्णा, शेखर इत्यादि मित्रमंडळी हजर होती. इंडियन आयडाॅल’ साठी केलेला अहमदनगर ते मुंबई प्रवास, मुंबई मधील गगनचुंबी इमारती आणि एकूणच प्रवासाबद्दल बोलताना रेश्मा म्हणते, “अंतिम फेरीपर्यत पोहोचण्यास जरी अपयश आले तरी, श्रेया घोषाल यांच्यापुढे गाण्याचा आनंद काही औरच होता, क्षणभरासाठी मी माझे दु:खच विसरुन गेले”. शाळा, अभ्यास, शेतीकाम यातून फारसा वेळ मिळत नसल्याने रोज सायंकाळी चालणारा ‘परिपाठ’ हाच तिच्यासाठी सराव असायचा असेही तिने सांगितले. शिवाय स्वत:ची पार्श्वभूमी कुठेही तिच्या मार्गात आड आली नाही. उलट ’सावली’ मधील मायेची ऊब या सर्व प्रवासात प्रेरणा ठरल्याचे ती सांगते.


रेश्मा सध्या नूतन कन्या विद्यालयात १० वीत आहे. सध्या परीक्षा असल्याने ती अभ्यासात मग्न असते. पण अभ्यासाचा तणाव घालवण्यासाठी ती ‘जाने मन तू खूब है’ हे ‘इंडियन आयडाॅल’ मध्ये तिने म्हटलेले गाणे गुणगुणत असते.