धुळे इथलं प्रांताधिकारी कार्यालय. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कार्यालय परिसरातील एक एकर क्षेत्रात तब्बल १०८ झाडं लावली आणि जगवलीही आहेत. ठराविक चौकटीत काम न करता बँक आणि सेवाभावी संस्थांच्या सामाजिक निधीतून त्यांनी प्रांताधिकार कार्यालयात हिरवळीचे बेट उभारायला सुरुवात केली आहे.
मागील वर्षी हा वृक्ष लागवड उपक्रम सुरु झाला. मिसाळ यांनी विचारपूर्वक आणि स्थानिक वातावरणाला साजेशा रोपांची निवड केली. अमलताश, सिसव, शिरीष, बदाम पिंपळ, वड, निंब, सप्तपर्णी अशी बहुरंगी, सावली देणारी, शोभा वाढवणारी झाडं लावली. झाडं लावताना भविष्यात ती तोडली जाणार नाहीत असं नियोजन करूनच रोपांची लागवड करण्यात आली आहे.
हे सर्व वृक्ष पाच ते दहा फुटांपर्यंत वाढले आहेत. झाडं जगवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच त्यांनी उभारली आहे. प्रत्येक झाडाला पिंजरा, सिमिंटचे कुंडे बांधण्यात आले असून ठिबक सिंचनाची सुविधाही केली आहे. एक एकर परिसरातील १२ कार्यालयांसमोर १०८ झाड डौलाने उभी आहेत.
विशेष म्हणजे, मिसाळ यांनी कृषीतज्ञांचा सल्ला घेऊन झाडांना फवारणी आणि खतांचे डोस दिले आहेत. प्रांताधिकारी मिसाळ आणि त्यांचे सहकारी नायब तहसीलदार या संपूर्ण परिसरात दर आठवड्याला फेरफटका मारतात आणि झाडांच्या वाढीचा आढावा घेतात. एरवी सरकारी योजनांचा बोऱ्या वाजतो असं आपण म्हणतो. पण,धुळ्यात या कार्यालयात झाडं लावण्याची योजना मनापासून राबवल्याबद्दल नागरिकही समाधान व्यक्त करतात. सरकारी कार्यालयात छोट्या रोपांची झाडं बनविण्याचा हा “मिसाळ पॅटर्न” इतरांनीही अनुकरणात आणावा असाच आहे.